मंथन – विषाची परीक्षा कशाला?

>> ऍड. प्रतीक राजूरकर

शासकीय स्तरावर सर्पमित्रांना संघटित केल्यास सर्प तस्करी करणाऱया अपप्रवृत्तींविरुद्ध कारवाई करणे अधिक सुलभ होईल. साप हा शेतीचे रक्षण करणारा निसर्गचक्रातील महत्त्वाचा घटक आहे. वन्यजीव संरक्षण कायद्यात सापाला कायदेशीर संरक्षण प्राप्त आहे. सापांची तस्करी व मौजमजा म्हणून नशा करणाऱया अनैतिक व्यसनी श्रीमंतांना सामान्यांचा एकच प्रश्न आहे विषाची परीक्षा कशाला?

हिंदुस्थानात विषारी सर्पाच्या दंशाने होणारे मृत्यू आणि विषाची अवैध तस्करी हे दोन गंभीर विषय दुर्लक्षित आहेत. प्राप्त अहवालानुसार हिंदुस्थानात प्रतिवर्षी 58 हजार व्यक्ती सर्पदंशाने मृत्युमुखी पडतात. गेल्या दोन दशकांत हिंदुस्थानात 1.2 दशलक्ष मृत्यू सर्पदंशाने झाल्याची नोंद आहे, तर लाखो लोकांना अपंगत्व आले आहे. हिंदुस्थानात मण्यार, कोब्रा व वायपर प्रजातींच्या सर्पदंशाने होणारे मृत्यू बहुतांशी ग्रामीण भागात जून ते सप्टेंबर यादरम्यान झाले आहेत. माध्यमात वाघाच्या हल्ल्याची बातमी डरकाळी फोडणारी तर सर्पदंशाची एका चौकटीच्या बिळात प्रकाशित केली जाते. इतक्या मोठय़ा प्रमाणात सर्पदंशाने होणारे मृत्यू माध्यमांनी नेहमीच दुर्लक्षित केले. वाघाचे वलय सर्प, अस्वल या प्राण्यांना नसले तरी त्यांच्या हल्ल्यातून होणारी जीवितहानी मृतक कुटुंबाचे अपरिमित नुकसान करणारी आहे. हिंदुस्थानात दुर्गम अति दुर्गम भागात सर्पदंशावर वेळेत उपचार मिळू न शकणे, वैद्यकीय अधिकाऱयांची अपुरी संख्या, संबंधित औषधांचा पुरेसा साठा नसणे ही जीवितहानी होण्याची प्रमुख कारणे आहेत. सर्पदंशावर काही तासांत उपचार मिळणे गरजेचे असताना अनेकदा अंधश्रद्धेला बळी पडलेल्यांची संख्या मोठय़ा प्रमाणात आहे. दुर्गम अतिदुर्गम भागात बारा महिने आवश्यक औषधांचा साठा उपलब्ध होणे गरजेचे आहे.

एकीकडे अविकसित दुर्गम भागात सर्पदंशातून जगण्याची धडपड सुरू असताना विकसित शहरात मृत जीवन जगण्यासाठी अमली पदार्थ म्हणून सापाचे विष सेवन केल्या जात असल्याच्या घटना सुन्न करणाऱया आहेत. गेल्या काही वर्षांत अनेक प्रतिष्ठत माध्यमात याबाबत बातम्या प्रकाशित झाल्या आहेत. 2014 साली केरळ राज्यात 19 वर्षीय युवकाला अटक झाल्याची नोंद आहे. साप पाळणाऱया व्यक्तीला युवक एका सर्पदंशाचे हजार ते अडीच हजार रुपये मोजायचा. सापाला हलके दाबल्यावर साप युवकाच्या जिभेखाली सौम्य दंश करायचा. दंश केल्याने जी नशा चढायची ती पाच ते सहा दिवस झिंग कायम ठेवायची. 2018 साली Indian Journal of Psychological Medicine या नियतकालिकेत ‘सापांचे विष अमली पदार्थांना पर्याय’ या विषयावर डॉ. असिम मेहरा, डॉ. देबाशिष बसू, डॉ. संदीप ग्रोवर यांचे संशोधन व अहवाल प्रकाशित झाला आहे. या व इतर काही संशोधनातून सापाचे विष काही प्रक्रिया केल्यावर सौम्य करून सेवन केल्याची काही मोजकी निरीक्षणे आहेत. विषप्रयोग करणारे युवक तिशीतले असून समृद्ध कुटुंबाची पार्श्वभूमी असलेले आहेत असे निदर्शनास आले. मुंबई, राजस्थान, दिल्ली येथे असले प्रकार उघडकीस आल्याने गेल्या काही वर्षांत सापांचे विष व्यसनी, तस्करांच्या नसानसांत किती भिनले आहे याचा अंदाज येऊ शकेल.

सौम्य केलेले सापाचे विष अमली पदार्थ गांजा, हेरॉईन यांच्यापेक्षा अधिक चांगली ‘किक’ देणारे आहे असे काही अभ्यासकांनी नोंदवले आहे. अमली पदार्थांचे व्यसन असणारे पायावर अथवा दंडावर त्याचा प्रयोग करत असल्याचे समोर आले. काही प्रकाशित बातम्यांनुसार मद्यात मिश्रण करून सौम्य केलेले सापाचे विष प्राशन केले जाते. एका अभ्यासातून दहा लिटर मद्यात एक ग्रॅम सापाचे विष मिसळून विषप्रयोग केला जातो. अमली पदार्थांची ‘किक’ कमी होऊ लागल्यावर नव्या विषप्रयोगाला सुरुवात होते. एकदा विषाचे सेवन केल्यास तीन-चार आठवडे विषप्रयोगाचा हँगओव्हर कायम असतो.

ऑक्टोबर 2016 साली पश्चिम बंगालच्या जलपायगुडीतून चार व्यक्तीकडून दहा किलो सापाचे विष पकडण्यात आले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार त्याचे त्याकाळचे बाजार मूल्य 245 कोटी रुपयांच्या घरात होते. (माध्यमांच्या मते त्याचे मूल्य 174 कोटी रुपये होते.) 2018 साली मूळच्या गुजरातचे असलेल्या चार व्यक्तींकडून रायगड पोलिसांनी 850 मिलीलिटर सापांचे विष हस्तगत केले त्याचे बाजार मूल्य 1.70 कोटी असल्याची माहिती प्रकाशित आहे.

वाईल्ड लाइफ ट्रस्ट इंडियाच्या निरीक्षणातून हिंदुस्थानात दरवर्षी चार लाख सापांना पकडून अवैधपणे व्यापार केला जातो. काही मान्यवर अभ्यासकांनी औषधी कंपन्या पकडलेल्या सापाचे विष बेकायदेशीरपणे विकत घेतात असा आरोप केला आहे. हिंदुस्थानी कोब्रा, वायपर, किंग कोब्रा या प्रजातींच्या सापाच्या विषाला चढत्या क्रमाने किंमत दिली जाते.

असंघटित सर्पमित्रांचा समूह मोठय़ा प्रमाणात नागरी वस्तीत साप आढळल्यास जिवाची पर्वा न करता नागरिक व सापाची सुटका करण्यास धावून जातात. काही अभ्यासकांच्या मते सर्पमित्रांच्या समूहात काही विषप्रवृतींचा शिरकाव झाला असल्याचा संशय व्यक्त केला आहे. सर्पमित्रांच्या समाजसेवी वृत्तीचा गैरफायदा घेऊन काही खोटे सर्पमित्र या विषप्रयोगाच्या तस्करीत अग्रेसर असण्याची शक्यता आहे. शासकीय स्तरावर सर्पमित्रांना संघटित केल्यास सर्प तस्करी करणाऱया अपप्रवृत्तींविरुद्ध कारवाई करणे अधिक सुलभ होईल. साप हा शेतीचे रक्षण करणारा निसर्गचक्रातील महत्त्वाचा घटक आहे. वन्यजीव संरक्षण कायद्यात सापाला कायदेशीर संरक्षण प्राप्त आहे. सापांची तस्करी व मौजमजा म्हणून नशा करणाऱया अनैतिक व्यसनी श्रीमंतांना सामान्यांचा एकच प्रश्न आहे विषाची परीक्षा कशाला?

मागील काही वर्षांत सर्प व विषाची तस्करी करणारे मोठय़ा प्रमाणात पकडले गेले आहेत. अवैध तस्करीच्या बाजारपेठेत कोटय़वधी रुपये मूल्यांचे विष जप्त झाले आहे. इतक्या मोठय़ा प्रमाणात हे गुन्हे उघडकीस येऊ लागले याचाच अर्थ साप व विषाची तस्करीचे एक संघटित गुन्हेगारीचे नवे विश्व उदयास आले आहे. देशाच्या प्रत्येक भागात अशी कोटय़वधींची प्रकरणे उघडकीस येऊ लागली आहेत. या वर्षी फेब्रुवारी महिन्यात बिहार राज्यात 12 कोटी मूल्याचे सापांचे विष पकडण्यात आले.

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या