
>> स्पायडरमॅन
सोशल मीडियाचा वापर लोक विविध कारणांसाठी करत असतात. ज्ञान मिळवणे अथवा वाटणे, गप्पागोष्टी, मनोरंजन यांबरोबरच अनेक लोक आपल्या घरगुती अथवा नोकरीच्या ठिकाणावरील व्यथांना वाट मोकळी करून देण्यासाठीदेखील सोशल मीडियाचा वापर करत असतात. कॉर्पोरेट ऑफिस, आयटी किंवा बँक क्षेत्रातील नोकरी म्हणजे जणू काही स्वर्गसुख असते असा अनेकांचा समज असतो, पण दुरून साजिरे वाटणारे हे सर्व प्रत्यक्षात किती तणावाचे आणि परीक्षा पाहणारे असते हे गेल्या चार दिवसांत दोन युजर्सनी कथन केलेल्या त्यांच्या अनुभवाने समोर आले आहे. पहिला अनुभव एका स्त्रीने सोशल मीडियावर कथन केला आहे. ही स्त्री एका प्रख्यात बँकेची कर्मचारी. काही दिवसांपूर्वी तिची आई अचानक आजारी पडली. आईवर काही दिवस उपचार चालू होते. मात्र एका उपचाराच्या वेळी काहीतरी गडबड झाली आणि आईला चुकीचे औषध देण्यात आले. त्या औषधाने आईची प्रकृती आणखी खालावली. आता त्या स्त्रीला आईकडे पूर्ण वेळासाठी लक्ष देण्याची आवश्यकता निर्माण झाली. तिने आपल्या बँक मॅनेजरला तसे कळवले आणि फक्त थोडय़ा दिवसांसाठी रजेची विनंती केली. मात्र त्या माणुसकी नसलेल्या माणसाने तिला ‘‘आई आजारी आहे तर तिला दवाखान्यात किंवा आश्रमात ठेव आणि कामाला ये’’ असे सुनावले. या प्रकाराने धक्का बसलेल्या मुलीने नोकरीपेक्षा आईला महत्त्व दिले आणि कामावर जाण्याचे टाळले. पुढे तिच्यावर दबाव आणून तिला राजीनामा देण्यास भाग पाडण्यात आले.
दुसरा अनुभव एका आयटी कर्मचाऱ्याने सांगितला आहे. त्याने आजारपणामुळे सुट्टीसाठी अर्ज केल्यावर त्याला योग्य ती मेडिकल सर्टिफिकेट देण्यास सांगण्यात आले. त्याने डॉक्टरांकडून ती मिळवून कंपनीला ऑनलाईन सादरदेखील केली. मात्र एवढे केल्यानंतरदेखील त्याच्या मॅनेजरने त्याला त्याच्या मोबाईलचे लाईव्ह लोकेशन शेअर करण्याचा हुकुम सोडला. वैयक्तिक स्वातंत्र्यावरचा हा घाला पाहून तो कर्मचारी मनापासून हादरून गेला आहे. सोशल जगतातून अशा वर्तणुकीवर मोठी टीका होते आहे
































































