प्रासंगिक : दानशूर समाजसेवक भागोजीशेठ कीर

223

>>संदेश मयेकर<<

मुंबईसह महाराष्ट्रात जुन्या काळातील एक दानशूर समाजसेवक  अशी प्रतिमा असलेले भागोजीशेठ कीर यांचा जन्म रत्नागिरीत एका गरीब कुटुंबात 1869 मध्ये झाला. घरचे अत्यंत दारिद्रय़. शिक्षणाची वानवा. छोट्या भागोजीला शिकण्याची इच्छा असली आणि नादारी स्वीकारून शाळेत प्रवेश मिळविला असला तरी परिस्थितीमुळे शाळा कधी सुटेल याचा नेम नव्हता. अखेर एक दिवस वडिलांना आर्थिक मदत करावी या हेतूने भागोजी यांनीही नशीब आजमावण्यासाठी मुंबईत जाण्याचा निर्धार केला. बंदरावर आल्यावर त्यांनी तांडेलला ‘पैसे नसले तरी मुंबईला नशीब काढण्यासाठी जायचे आहे, घेणार का,’ असे विचारले. तांडेलनेही भागोजींना बोटीत घेतले. अशारीतीने वयाच्या 12 व्या वर्षी भागोजींनी मुंबईत पाय ठेवला.

मुंबईत जवळचे कुणी नव्हते, राहायची सोय नव्हती. पोटाची चिंता होती. विवंचनेत असतानाच एका सुताराकडे भागोजी यांना रंधा मारण्याचे काम मिळाले. रोज दोन आणे मजुरी. पोटा पाण्याचा प्रश्न मिटला. रंधा मारत असताना कल्पक डोक्याच्या भागोजीच्या मनात एक कल्पना तरळली. दिवसभर साचलेला लाकडाचा भुसा वाया जातो. जळणासाठी त्याचा वापर होतो. हा भुसा बाजारात जाऊ लागला त्याचेही दोन आणे मिळू लागले.

जिद्द, चिकाटी आणि कष्ट उपसण्याची तयारी या गुणांमुळे भागोजीचे व्यक्तिमत्त्व विकसित होत गेले. त्याचा कष्टाळू स्वभाव एका पारशी गृहस्थाला भावला. भागोजीला आपल्या पदरी ठेवले. हेच ते पालनजी मेस्त्राr ज्यांनी मुंबई शहरात भागोजीला घेऊन उत्तुंग इमारती उभ्या केल्या.

याच काळात मुंबईतील बांधकामाचा उच्चांक गाठला. नाशिक सिक्युरिटी प्रेस, लायन्स गार्डन, सेंट्रल बँक बिल्डिंग, वाडिया बिल्डिंग, माधवजी धरमशी मिल, मफतलाल पार्क, ब्रेबॉन स्टेडियम, इंडियन मर्चंट चेंबर्स, कारवाना बिल्डिंग, मुंबई सेंट्रल रेल्वे स्टेशन, स्टेट बँक ऑफ इंडिया बिल्डिंग, ऍम्बॅसेडर हॉटेल इमारत, ग्वाल्हेर महाराजांचा बंगला अशा अतिभव्य इमारतींचे बांधकाम झाले. समुद्राचे आक्रमण थोपविण्यासाठी बांधलेली क्राँकीट भिंत हा कल्पकता व कर्तृत्वाचा आविष्कार ठरला. या सर्व कार्यात भागोजींचे अनमोल योगदान होते.

भागोजींच्या संकल्प आणि सिद्धीमध्ये फार अंतर नसे. त्यानुसार रत्नागिरीत वरच्या आळीत त्यांनी एक जागा घेतली. 10 मार्च 1929 रोजी करवीरचे शंकराचार्य डॉ. कूर्तकोटी यांच्या हस्ते कोनशीला बसविण्यात आली. याप्रसंगी शंकराचार्यांच्या सत्काराचा पहिला मानकरी एक दलित ठरला. हजारो उपस्थितांनी ‘हिंदू धर्म की जय’ अशी गगनभेदी गर्जना केली. सर्वांच्या भावना उचंबळून आल्या. पुढे मंदिर बांधून झाले. याच पतीत पावन मंदिरात पुढे समाजसेवा आणि सामाजिक समतेचे सेतू उभारले गेले. अस्पृश्योद्धाराचे कार्य वेगात सुरू झाले. अस्पृश्यांसमवेतसह भोजनाचे कार्यक्रम पार पडू लागले. यामागे प्रेरणा होती स्वातंत्र्यवीर सावरकरांची आणि हे शक्य होत होते भागोजीशेठ कीर यांच्या दानशूरपणामुळे. सहभोजनचे हे वादळ देशभरातच घोंघावले. त्यापाठोपाठ भागोजीशेठ यांनी मंदिरे, धर्मशाळा, आश्रमशाळा, गोशाळा, विद्यालये, महिला विद्यालय, अनाथाश्रम उभे करण्यासाठी लाखो रुपये खर्च केले. या द्रष्टय़ा महापुरुषाने आपल्यानंतर या कार्याची आबाळ होऊ नये म्हणून भागोजी बाळोजी कीर ट्रस्ट स्थापन करून भविष्यकालीन खर्चाची तरतूद केली.

भागोजी शेठना शिक्षण घेता आले नाही याची मनाला बोचणी होती म्हणूनच सुरुवातीस भंडारी मुलांच्या शिक्षणाची सोय व्हावी म्हणून किल्ल्यात छोटेखानी शाळा बांधली व पुढे 250 विद्यार्थ्यांची सोय होईल अशी दुमजली इमारत बांधून दिली. मुलांच्या अन्न वस्त्रासाठीही पैशांची तरतूद केली. अनाथासाठी अनाथाश्रम, महिलांसाठी महिला विद्यालय, ज्ञान मंदिर हॉल रत्नागिरी व ज्ञान मंदिर हॉल माटुंगा असे शिक्षणाचे पवित्र कार्य सुरू केले त्यासाठी हजारोंचा की लाखोंचा खर्च याचे मोजमाप कधी केले नाही.

शिक्षणदान हे त्यांचे असिधारा व्रत होते. गांजलेल्या गोर गरीबांसाठी लुळे, पांगळे, अंध, असाहय़, महारोगींना अन्न, वस्त्र व आसरा मिळावा म्हणून परम दैवत भागेश्वराच्या नावाने मुंबई, आळंदी, वाई येथे धर्मशाळा बांधल्या. रत्नागरीत भागेश्वर मंदिर तसेच मुंबईत राम-मारुती मंदिर, दत्तमंदिर, भगवती मंदिरे बांधून भाविकांची देवदर्शनाची सोय केली. मुंबईत येणाऱ्या सामान्यांच्या खिशाला परवडतील अशा वास्तू म्हणजे भागेश्वर भुवन माटुंगा, भागेश्वर भुवन माहीम, आनंद भुवन 1, आनंद भुवन 2, आगर बाजार दादर, नळबाजार, कुंभारवाडा येथे उभ्या केल्या. या घरांच्या भाडय़ापोटी येणाऱ्या पैशातून त्यांनी उभ्या केलेल्या सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक कार्याचा खर्च भागावा हा हेतू होता. आपल्यानंतरही या कार्यासाठी लागणाऱ्या निधीचा स्त्राsत चालू राहावा, ही केवढी दूरदृष्टी! अशा या दानशूर आणि मानवतावादी समाजसेवकाने 24 फेब्रुवारी 1944 रोजी म्हणजेच महाशिवरात्रीच्या दिवशी जगाचा निरोप घेतला.

आपली प्रतिक्रिया द्या