ठसा – सोमेश्वर पुसदकर

1580

>> अनिल कुचे

अमरावतीत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जाहीर सभा म्हटली की, सोमेश्वर पुसदकर यांचे नाव ओघाने समोर यायचे. शिवसेनाप्रमुखांच्या जेवढय़ा सभा अमरावतीत झाल्या त्या सर्व सभांचे नियोजन सोमेश्वर पुसदकर यांचेच राहायचे. सभा आटोपल्यानंतर त्याचे बक्षीस काय, तर शिवसेनाप्रमुखांची सोमेश्वर पुसदकर यांच्या पाठीवर पडलेली थाप. ती पडली की, सोमेश्वर यांचा उर भरून यायचा. अमरावतीतील एक कट्टर आणि निष्ठावान शिवसैनिक म्हणून सोमेश्वर पुसदकर यांची शेवटपर्यंत ओळख राहिली. आता 2 ऑगस्टच्या रात्री अचानक त्यांचे निधन झाले आणि फक्त अमरावतीमधीलच नव्हे, तर संपूर्ण विदर्भातीलच जातिवंत शिवसैनिक अत्यंत हळहळला. सोमेश्वर पुसदकर यांचे मोठे बंधू दत्तात्रय पुसदकर 1980-90च्या दशकातले एक निष्ठावंत शिवसैनिक. त्यांचे शिवसेना शाखेचे उद्घाटन करून परत येत असताना निधन झाले. त्यांची जागा नंतर सोमेश्वर पुसदकर यांनी घेतली. बुधवारा परिसरात राहणारे सोमेश्वर पुसदकर निष्ठावंत शिवसैनिक बनले. तेव्हापासून शिवसेनाप्रमुखांपासून नंतर उद्धव ठाकरे व शिवसेनेच्या सर्वच ज्येष्ठ नेत्यांच्या सभा यशस्वी करण्याची जबाबदारी सोमेश्वर पुसदकर यांनीच कायम पार पाडली. त्यांनी केलेले सभेचे नियोजन अत्यंत व्यवस्थित असे. अत्यंत काटेकोर नियोजन आणि त्याची तेवढीच प्रभावी अंमलबजावणी यामुळे त्या सभा गाजतदेखील असत. म्हणूनच शिवसेनाप्रमुखांपासून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, इतर वरिष्ठ शिवसेना नेत्यापर्यंत त्यांचे संबंध अत्यंत जिव्हाळ्याचे झाले होते. ऐन तारुण्यात सोमेश्वर यांनी शिवसेनेसाठी अक्षरशः जिवाचे रान केले. पुन्हा हे करताना पक्षाकडून कुठलेही राजकीय लाभाचे पद मिळावे अशी अपेक्षा ठेवली नाही. शिवसेनाप्रमुख आणि शिवसेना यांवरील निष्ठा हेच त्यांच्यासाठी सर्वात प्राधान्य राहिले. काही मिळाले नाही म्हणून सोमेश्वर यांनी आपली शिवसेनेवरील निष्ठा कमी होऊ दिली नाही. ते शेवटपर्यंत निष्ठावंत ‘शिवसैनिक’ म्हणून काम करत राहिले. लोकसभा किंवा विधानसभेच्या निवडणुका आल्यानंतर प्रत्येक उमेदवाराच्या प्रचाराची जबाबदारी सोमेश्वर पुसदकर सांभाळत. सोमेश्वर हे कधी नाराज झाले नाहीत. एक निष्ठावंत शिवसैनिक म्हणून ते कायम कार्यरत राहिले. आयुष्यात एक वेळ सोमेश्वर नगरसेवक पदासाठी अमरावती मनपाच्या बुधवारा भागातून निवडणुकीच्या रिंगणात उभे होते; परंतु ते विजयी होऊ शकले नाहीत. त्यानंतर सोमेश्वर यांनी कोणतीही निवडणूक लढविली नाही. अनुशेषातील अभ्यासू व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखल्या जाणाऱया बी. टी. देशमुख यांच्याशी त्यांचा संबंध आला. सोमेश्वर यांनी त्यांच्याकडून विदर्भाचा अनुशेष समजून घेतला व त्यांच्यासोबत अनुशेषाच्या लढाईत उतरले. त्यानंतर हेल्पलाइनच्या माध्यमातून सोमेश्वर यांचा संबंध हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचे प्रधान सचिव प्रभाकरराव वैद्य यांच्याशी आला. त्यांच्या माध्यमातून शेतकरी आत्महत्यांच्या प्रश्नात त्यांनी पुढाकार घेतला. त्यांचे खरे सहकारी शिवसैनिक दिनेश बूब यांच्यासोबत त्यांनी ’लव्ह जिहाद’सारख्या संवेदनशील विषयातही लक्ष घातले. सोमेश्वर आणि बूब यांच्या माध्यमातून अशा प्रकरणांत फसलेल्या अनेक मुली सुखरूप बाहेर आल्या. त्यांनी त्यांना त्यांच्या आईवडिलांच्या स्वाधीन केले. त्यामुळेही सोमेश्वर पुसदकर यांच्याबद्दल शिवसैनिकांबरोबरच सामान्य जनतेच्या मनातही प्रेम आणि जिव्हाळा होता. म्हणूनच त्यांच्या निधनामुळे जसे सामान्य शिवसैनिकांना दुःख झाले तसे सामान्य अमरावतीकरांनाही झाले. त्यांच्या मृत्यूची बातमी समजल्यानंतर कोरोनाची अनेक प्रकारची बंधने असतानाही सर्वच राजकीय पक्षांचे प्रमुख नेते, कार्यकर्ते सोमेश्वर यांच्या अंत्यदर्शनासाठी बुधवारा येथे आले होते. त्यातून त्यांचा जनसंपर्क किती मोठा आणि पक्षविरहित होता याची कल्पना येते. अलीकडच्या काही वर्षांत कौटुंबिक जबाबदाऱया ओळखून त्यांनी बांधकाम व्यवसायात प्रवेश केला. तरीदेखील त्यांचे शिवसेनेवरील प्रेम कमी झाले नाही. त्यांचे आकस्मिक निधन सर्वांनाच धक्का देणारे ठरले. शिवसैनिक साधारणतः आक्रमक असतो. एकेकाळी स्व. संजय बंड यांनी आक्रमकपणे शिवसेनेला अमरावती जिह्यात उभे केले. सोमेश्वर हे बंड यांच्याएवढे आक्रमक नव्हते, पण तेवढेच कट्टर, निष्ठावान शिवसैनिक होते. त्यांनी त्यांच्या शांतताप्रिय स्वभावातून शिवसैनिक म्हणून जिह्यात ठसा उमटवला. त्यांचे अचानक जाणे जिह्यातील तमाम शिवसैनिकांना चटका लावणारे ठरले.

आपली प्रतिक्रिया द्या