आभाळमाया – जवळचा तारा

>> वैश्विक  

संपूर्ण  विश्वाची मोजदाद करताना आपण सहजपणे म्हणून जातो की, 13.7 अब्ज वर्षांपूर्वी हे विश्व निर्माण झालं. कारण त्यावेळी ‘बिग बँग’ तथा महाप्रसारण सुरू झालं आणि एका बिंदूत एकवटलेल्या वस्तुमानाचा पिसारा एवढा विराट फुलला. आता त्याच क्षणी काळ आणि अवकाशाची निर्मिती झाली असं मानलं गेल्याने त्यापूर्वी काय होतं? किंवा ‘बिग बँग’ कशातून झालं? हे प्रश्न विचारता आले नाहीत तरी मनात उद्भवतातच. ‘स्टेडी स्टेट’ किंवा ‘स्थिर विश्व’ (खरं तर शाश्वत विश्व) संकल्पनेत महाप्रसारण ही एक अवस्था आहे असं मानलं गेलं, परंतु दीर्घिकांच्या परस्पर दूर जाण्याचे पुरावे हाती आल्यापासून ‘बिग बँग’ या उपरोधिक शब्दाच्याच नावाने प्रसिद्ध झालेली थिअरी आता सर्वमान्य झाली आहे. विश्वनिर्मितीच्या अनेक संकल्पना (थिअरी) नंतर मांडण्यात आल्या. त्याविषयी केव्हातरी सोप्या शब्दांत जाणून घ्यायचा प्रयत्न करू.

विश्वातील तारे हा प्रमुख घटक आहे. अनेक ताऱ्यांच्या दीर्घिका (गॅलॅक्सी) होतात आणि अनेक ताऱ्यांना ग्रहमालाही असतील, पण त्यांचा शक्तीशाली दुर्बिणीतून शोध लागला तरी तिथपर्यंत जाता येईल का? तर आजचं उत्तर तरी ‘नाही’ असंच आहे. ताशी लाख, पाच लाख किलोमीटर वेगाने सुसाट पळणारी अवकाशयानं बनवली तरीही विराट अवकाशी अंतरांपुढे त्यांचा वेग काहीच नाही.

आज आपल्याला सर्वाधिक वेग म्हणून ठाऊक असणारा वेग (स्पीड) आहे प्रकाशाचा. प्रकाश सेकंदाला 3 लाख किलोमीटर या वेगाने ‘धावतो’. अगदी जवळचा असलेला आपला सूर्यतारा तर आपला निर्माता. त्याचाच प्रकाश 15 कोटी किलोमीटर अंतरावरून येण्यासाठी सव्वाआठ मिनिटं लागतात. म्हणजे सूर्य उगवल्यानंतरही सव्वाआठ मिनिटांनीच तो आपल्याला दिसतो. आपल्याच ग्रहमालेतले अनेक ग्रह एक अब्ज किलोमीटर अंतरापलीकडून सूर्याभोवती फिरतात. शनीपासून पुढच्या ग्रहांचं सूर्यापासूनचं अंतर कमालीचं प्रचंड आहे.

अर्थात हे सारं आपल्या परिमाणांच्या किंवा मोजमापाच्या भाषेत. कारण गेल्या अवघ्या दोन शतकांत आपण बैलगाडीपासून रॉकेटपर्यंत पोचलो आहोत. हजारो वर्षे माणसांचा प्रवास इतर प्राण्यांसारखा चालतच व्हायचा. आजही शेतात काम करणारी किंवा दुर्गम खेडय़ातली माणसं बऱ्याच ठिकाणी रोज दहा किलोमीटर चालतात. कालांतराने यंत्रयुग अवतरल्यावर रेल्वे ट्रेन, मोटरकार, बोट, विमान, रॉकेट, अंतराळयान असा प्रवास झाला तो मानवी संस्कृतीच्या अगदी अलीकडच्या टप्प्यात.

असं वेगवान जीवन अधिक वेगवान करण्याच्या नादात माणसाच्या हळूहळू लक्षात आलं की, या वेगाला काही मर्यादा आहे आणि ती प्रकाशवेगाची. कारण आपल्या ग्रहमालेत यान पाठवणं तर आपल्याला साध्य झालंय, पण परताऱ्याभोवती ग्रहमाला असल्या आणि त्याच्यावर वस्ती असली तर त्यांना प्रत्यक्ष संपर्क करण्याचा वेग त्यांना धारण करता येणार ना आपल्याला. आता हॉलीवूडच्या सिनेमात दाखवतात तशी ‘फॅन्टॅसी’ काहीही असू शकते. ‘मनोवेगे’ वगैरे कल्पना आपल्याकडेही आहेतच. पण मनोवेगे सशरीर एवढय़ा दूर, प्रकाशाच्या वेगाने जाणं सध्या ज्ञात असलेल्या भौतिकशास्त्राच्या मर्यादेत अशक्यच आहे. तेव्हा आपल्याला अगदी जवळचा असा जो दुसरा तारा आहे तो पृथ्वीच्या दक्षिण गोलार्धातून स्पष्टपणे दिसणाऱ्या नरतुरंग किंवा सेन्टॉरस तारकासमूहातला ‘अल्फा सेंन्टॉरी’ हा तारा.

हा तारा अवकाशातला तिसऱ्या क्रमांकाचा पिवळसर तारा आहे. विशेष म्हणजे हे तीन ताऱ्यांचं त्रिकूट आहे. म्हणजे हे तारे परस्परांभोवती फिरतात. त्याचा शोध 1689 मध्ये हिंदुस्थानातल्या पुद्दुचेरी येथून लागला. रिचार्ड यांनी तो न्याहाळला. हा तारा आपल्यापासून 4.3 प्रकाशवर्षे एवढय़ा अंतरावर आहे. या त्रिकुटातले तारे दुर्बिणीतून दिसू शकतात. त्यापैकी दोन तारे जवळ व एक त्यांच्याभोवती 5 लाख वर्षांत संथपणे फिरतो. हा प्रॉक्झिमा सेन्टॉरी तारा लाल खुजा तारा असून त्याचा व्यास फक्त 64 हजार किलोमीटर भरेल. त्यावर अग्निज्वाला उफाळतात म्हणून त्याला ‘फ्लेअर स्टार’ म्हणतात.

या शेजारच्या ताऱ्याभोवती जर ग्रहमाला असेल आणि तिथे कोणी प्रगत संपर्क योग्य सजीव असतील तर त्याला ‘हॅलो’ म्हणण्यासाठी दोन मार्ग. एक म्हणजे सांकेतिक भाषेत संदेश पाठवून उत्तर मिळवणे पिंवा प्रत्यक्ष तिथे जाणे. आता सांकेतिक रेडिओ संदेशांचा अभ्यास तर सुरूच असतो. ‘त्यांनी कोणी’ असाच संदेश पाठवला असेल का याचीही चाचपणी सुरू असते.

..पण थेट तिथे जायचं म्हटलं तर प्रकाशाच्या वेगाने एक वर्ष म्हणजे 9460 अब्ज किलोमीटर गुणिले चार एवढं किलोमीटर अंतर पार करून जावं लागेल. त्यासाठी तेवढं मजबूत यान, त्याचं इंधन आणि अवकाशयात्रींना जगवणारी शिदोरी या गोष्टींची केवळ कल्पना करून पहा. पृथ्वीवरच चार वर्षे वाटेत कोणतंही खाणं-पिणं मिळणार नाही अशी अट घातली तर चार वर्षे प्रवास करता येईल? कठीणच आहे.

शिवाय प्रश्न आहे तो प्रकाशवेगाचा. तो धारण करणं अशक्य. ते का याचा विचार आपण एका लेखात करू या. पण पुढच्या लेखात आज जशी शेजारी ताऱ्याची माहिती घेतली तशी शेजारच्या दीर्घिकेचीही माहिती घेऊ या. या दीर्घिकेचं अंतर आणि वैशिष्टय़ही आपल्यासाठी विशेष आहे.

[email protected]