
>>वैश्विक<<
गेल्या 15 तारखेला मराठी कालदर्शिकेनुसार शुद्ध पक्षातील अष्टमी होती. आकाशदर्शनाला जमलेल्या आम्हा तीनेकशे जणांना खरं तर स्वच्छ, अंधाऱ्या आकाशाची गरज होती. पण सर्वांच्या सोयीची शनिवारची रात्र धरून आकाशदर्शनाचा कार्यक्रम करायचा तर ‘तिथी’शी थोडी तडजोड करावी लागते. अर्थात अर्धा चंद्र आकाशात असेल तर त्याचंही सुंदर दर्शन दुर्बिणीतून होतं. पहिल्यांदाच हा अनुभव घेणारे चंद्रावरची विवरं, दऱ्या-डोंगर बघून चकित होतात. चंद्राचा परावर्तित प्रकाश (अल्बिडो) किंवा साध्या भाषेत चांदणं असलं की, काव्यरचना निर्माण करणारं वातावरण निर्माण होत असलं तरी निबीड अंधारात दिसणारी असंख्य (सुमारे तीन हजार) ताऱयांची लुकलुक मंदावते. मग चंद्र मावळण्याची वाट पाहावी लागते. हे आधीच ठाऊक असल्याने आम्ही दुर्बिणीतून चंद्रदर्शन घडवून प्रेक्षकांना चंद्राची विशेष माहिती देतो.
परंतु गेल्या वेळच्या कार्यक्रमाचं आकर्षण असणार होतं गेल्या लेखात वर्णन केलेल्या रिटेनन धूमकेतूचं. हा धूमकेतू काही आकाराने मोठय़ा शेपटीचा वगैरे दिसणारा नव्हताच. तरीसुद्धा पूर्वी कधीच धूमकेतू न बघितलेल्या हौशी खगोल प्रेक्षकांसाठी ती उत्तम संधी होती. सध्या ‘दिवस’ लहान आणि ‘रात्री’ मोठय़ा असल्याने सहा-सवासहालाच सूर्य मावळल्यावर लगेच मावळतीच्या आकाशाकडे, मावळणाऱ्या तारकासमूहांकडे दुर्बिणी रोखल्या. कारण धूमकेतू वृषभ राशीच्या पार्श्वभूमीवर थोडय़ा वेळाने अधिक स्पष्ट दिसणार होता. मात्र चंद्रप्रकाशाबरोबरच क्षितिजावरच्या दूरस्थ दिव्यांचा प्रकाश (ग्लो) आणि त्यात भरीला भर म्हणून विरळ ढगांचा अडथळा (हेझ). आकाश पाहायला आलेल्यांची निराशा होऊ शकेल अशी स्थिती, परंतु अशा वेळी आमचे निपुण आकाशदर्शक लेझर टॉर्चच्या मदतीने आकाशातील तारकासमूहांची आधी ओळख करून देतात. विरळ ढगांच्या तावडीतून सुटलेले तारे दाखवत, त्यामागची ‘कॉस्मॉलॉजी’ समजावत आकाशदर्शन सुरूच ठेवतात. मग काही वेळाने वारा सुटल्यावर आकाश स्वच्छ झालं की, आधी वर्णन केलेल्या तारकासमूहांपैकी महत्त्वाच्या ‘अवकाशी वस्तू’ दुर्बिणीद्वारे दाखवल्या जातात. गेली तेहतीस वर्षे आमचे खगोल मंडळाचे कार्यकर्ते ठिकठिकाणी असे कार्यक्रम करीत आहेत.
एकोणीसशे पंच्याऐंशीच्या काळात मुंबईजवळच्या वांगणी गावातून आमच्या संस्थेने कार्यक्रम सुरू केले. त्यावेळचं ‘ते’ एका दृष्टिक्षेपात आपली आकाशगंगा (मिल्की वे) ठळकपणे दाखवणारं आकाश आता उरलेलं नाही. कारण सर्व प्रकारचं वाढतं प्रदूषण आणि बदलतं हवामान. अवकाळी ढगाळ वातावरण आणि पाऊस कधी येईल ते सांगता येत नाही. आता आमचे कार्यक्रम नेरळला होतात, पण मुंबईचे खगोलप्रेमी नोकरी-उद्योगाचा व्याप सांभाळून संध्याकाळी किती लवकर आकाशदर्शनासाठी पोहोचू शकतील याचा अंदाज घेऊन जागा ठरवावी लागते. मंडळाच्या बदलापूरजवळच्या उंबरोली गावातही आमचे कार्यक्रम होतात. पूर्वी वांगणी, आता नेरळ इथे. बाकीची व्यवस्था छानच असते, पण प्रदूषण आणि निसर्गाच्या लहरीने आकाशच ‘हरवत’ चाललं तर काय करायचं?
1964 मध्ये न्यूझीलँडसारख्या छोटय़ा देशाने दक्षिण भागात असलेले ‘टेकापो’ नावाचं गाव खगोल अभ्यासकांसाठी राखून ठेवलं. वास्तविक पृथ्वीच्या उत्तर गोलार्धातून आपल्याला आकाश जेवढं व्यापक प्रमाणावर दिसतं तसं तिथे दक्षिण अक्षांश लक्षात घेता कठीणच. तरीही त्या गावात पोचल्यावर प्रकाश प्रदूषण होणारच नाही याची घेतलेली काळजी आकाशगंगा नजरेत भरताच जाणवते. एका मित्राने त्याच्या न्यूझीलँड दौऱ्यात मुद्दाम ते गाव पाहिलं आणि त्याला वेगळं पर्यटन कम अभ्यास स्थळ पाहिल्याचा आनंद झाला. ‘ऍस्ट्रॉनॉमी टाऊन’ म्हणून युनेस्कोने मान्यता दिलेली अशी गावं जगात कमीच असतील, कारण अवघं जग रात्री उजळवण्याचा वसा माणसानं घेतला आहे.
अंधारही प्रसंगी साजिरा असतो आणि तो अवकाशीचं वैभव फुकट दाखवतो याची जाणीव ठेवून ‘पुस्तकाच्या गावा’सारखं एखादं ‘खगोल-ग्राम’ आपल्याकडेही असायला हरकत नाही. खगोल मंडळासारख्या संस्थांनी त्यासाठी प्रयत्न केले तर सरकारनेही सकारात्मक प्रतिसाद द्यायला हवा. अर्थात ही कल्पना प्रत्यक्षात लगेच उतरेल असं नव्हे, पण असा विचार करायला काय हरकत आहे. एकेकाळी आम्ही दीड-दोन इंच व्यासाच्या छोटय़ा दुर्बिणी घेऊन आकाश पाहायचो. आता दहा-बारा इंच व्यासाच्या दुर्बिणी आहेत, पण आकाशच चकवा देतंय याचा अनुभव अनेकदा येतो. आपलं विश्व जाणून घेण्याचा हा अभ्यासपूर्ण आणि उदात्त छंद आहे. ‘खग्रास सूर्यग्रहण’ पाहिल्यावर शेकडो लोकांच्या डोळय़ांत उमटलेले आनंदाश्रू मी पाहिलेत. ‘फुकट’ उपलब्ध असलेली ही आकाशीची रोषणाई कृत्रिमतेपेक्षा कैक पटींनी तेजस्वी आहे. त्यासाठी प्रदूषणमुक्त खगोल-ग्रामचा विचार व्हावा. ढग येऊन अवकाळी पाऊसच पडला तर गोष्ट वेगळी, पण एरवी तिथून केव्हाही आकाशदर्शन सुस्पष्ट होईल एवढं नक्की.



























































