आभाळमाया – दीर्घिकांचा उदय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> वैश्विक, [email protected]

विश्वजन्मानंतर विराट अवकाशातील घडामोडींनी विलक्षण वेग घेतला. विश्वनिर्मितीच्या आरंभी काही क्षणांत सुरू झालेल्या महाप्रसारणात वायू आणि धूळ यांची निर्मिती होऊन त्यातून लक्षावधी तेजोमेघ आकाराला आले. या ढगांच्या पुंजक्यातून ताऱयांनी जन्म घेतला आणि त्या ताऱयांचे जे विशाल तसेच विविध आकारांचे समूह तयार झाले, त्या म्हणजेच दीर्घिका किंवा गॅलेक्सी. बहुतेक प्रत्येक दीर्घिकेच्या केंद्रस्थानी एक शक्तीशाली कृष्णविवर आहे आणि त्याभोवती दीर्घिकेतील समस्त तारे आणि काही ताऱयांना असलेल्या ग्रहमालाही गरगरत आहेत.

सहज उजळणी करायची तर आपली पृथ्वी सूर्याभोवती सेकंदाला सुमारे 30 किलोमीटर वेगाने फिरते आणि पृथ्वीसकट सगळी ग्रहमाला सोबत घेऊन आपला जनक तारा सूर्य आपल्या आकाशगंगा किंवा मिल्की वे दीर्घिकेच्या केंद्रस्थानी असलेल्या शक्तीशाली कृष्णविवराभोवती सेकंदाला सुमारे 220 किलोमीटर वेगाने फिरतो. म्हणजे आपण एका जागी स्तब्ध, निश्चल बसलो तरी आपला वैश्विक भ्रमणाचा नकळत लाभलेला वेग सेकंदाला सुमारे 250 किलोमीटर इतका असतो. आहे यापेक्षा कुठलं ‘वेगवान’ वाहन आपल्याकडे?

तेजोमेघातून निर्माण झालेल्या ताऱयांपासून बनलेल्या एकेका दीर्घिकेत शंभर ते दोनशे अब्ज तारे असतात. त्यात आपल्या सूर्यासारखे ‘सामान्य’ आणि हंस किंवा ‘डेनेब’सारखे अतिविशाल, तेजस्वी तारेही असतात. हा डेनेब आपल्यापासून 3 हजार 230 प्रकाशवर्षे अंतरावर आहे. तो दुर्बिणीतून दिसतो.

सरासरी 100 ते 200 अब्ज तारे सामावलेल्या दीर्घिकांमधल्या सूर्यापेक्षाही प्रखर ताऱयांमुळे त्या रात्रीच्या अवकाशात खरं तर अगदी स्पष्ट दिसायला हव्यात असा समज होणं साहजिक आहे, परंतु या दीर्घिकांमधली मधली अंतरे इतकी प्रचंड आहेत की, वर्षाला 9 हजार 460 अब्ज किलोमीटर या प्रकाशवेगाने धाव घेतली तरी अगदी शेजारच्या ऍन्ड्रोमीडा किंवा देवयानी दीर्घिकेत पोहोचायला 22 वर्षे लागतील. त्यातल्या त्यात जवळ आहे ती मागच्या लेखात उल्लेख केलेली ‘एलएमजी’ ही आपलीच उपदीर्घिका जवळ जवळ दोन लाख प्रकाशवर्षे अंतरावर आहे म्हणजे बघा!

नुसत्या डोळय़ांनी आपल्याला दिसणारी एकमेव परकी दीर्घिका म्हणजे देवयानी किंवा ऍन्ड्रोमीडा. मात्र त्यासाठी आकाश निरभ्र आणि सर्व प्रकारच्या (विशेषतः प्रकाशाच्या) प्रदूषणापासून मुक्त असायला हवे, तर मात्र ऍन्ड्रोमीडा आणि त्याजवळची दुसरीही दीर्घिका दिसते. ऍन्ड्रोमीडा एखाद्या धूसर ठिपक्यासारखी किंवा कापसाच्या छोटय़ा पुंजक्यासारखी दिसते.

आपली आकाशगंगा मात्र अशाच निरभ्र, काळोख्या, प्रदूषणविरहीत रात्री आपण अगदी स्पष्टपणे पाहू शकतो. वास्तविक आपण ज्या आकाशगंगेतच राहतो ती आपल्याला कशी दिसते याचं साधं उत्तर म्हणजे प्रचंड प्रासादात बसल्यानंतर आपल्या नजरेत त्याचा आकार भरतो तसंच काहीसं. त्यातही वैश्विक अंतर तर एवढं प्रचंड आणि आपल्या आकाशगंगेचा विस्तार तर या टोकापासून त्या टोकापर्यंत सुमारे 1 लाख प्रकाशवर्षे इतका. त्यात आपण आकाशगंगेच्या केंद्रकापासून 30 हजार प्रकाशवर्षे अंतरावर धनु राशीच्या पार्श्वभूमीवर असलेल्या ओरायन आर्म (मृगहस्त) भागात आहोत. धनु राशीतील गॅमा ताऱयाच्या उत्तरेला आकाशगंगेचा तेजस्वी ‘प्रवाह’ दिसून येतो. आकाशगंगा तशी अनेक तारकासमूहांमधून ‘वाहते’, पण धनुमध्ये ती अतिशय स्पष्ट दिसते.

आपल्या या दीर्घिकेचे केंद्र धनु तारकासमूहातील ‘गॅमा’ ताऱयाच्या पश्चिमेकडे सुमारे चार अंशावर असून तेच आपल्यापासून 30 हजार प्रकाशवर्षे अंतरावर आहे. या केंद्राभोवती आपली सूर्यमाला सुमारे 22 ते 25 कोटी वर्षांत एक परिक्रमा पूर्ण करते. यालाच ‘वैश्विक वर्ष’ असं म्हटलं जातं. आपल्या आकाशगंगेच्या केंद्रकाकडून तीक्र स्वरूपाचे क्ष-किरण आणि रेडिओ लहरी मिळतात. त्यावरून तिथे महाकाय कृष्णविवर असल्याचं संशोधकांच्या लक्षात आलं. त्याबाबतचा एक अंदाज असा की, या कृष्णविवराचं वस्तुमान आपल्या सूर्याच्या सुमारे 25 लाख वस्तुमानापेक्षा अधिक असावं.

1920 मध्ये विख्यात खगोल संशोधक एडविन हबल यांनी विश्वातल्या दीर्घिकांचे प्रकार वर्णन केले. कारण सर्वच दीर्घिकेसारख्या आकाराच्या नाहीत. आपली आकाशगंगा ही सर्पिलाकृती दीर्घिका आहे. केंद्रकापासून निघालेले अनेक वक्राकार बाहू (आर्म) हे अशा दीर्घिकांचं वैशिष्टय़. उदाहरण द्यायचं तर दिवाळीत भुईचक्र लावल्यावर ते गरगरत असताना त्याच्या केंद्रकापासून निघालेल्या प्रकाशरेषा जशा वक्राकार होऊन त्यासह फिरतात तशीच आपली दीर्घिका मात्र तिचा गाभा कृष्णविवर हे लक्षात असू द्या.

जेरार्ड व्हॅन्क्युलर या संशोधकाने हबलनंतर दीर्घिकांचा आणखी अभ्यास केला आणि हबलने सर्व सर्पिलाकृती दीर्घिकांना त्यांच्या आकारावरून ‘एस’ (s) असं इंग्लिश अक्षर दिलं होतं. त्यामध्ये जेराई यांनी सुधारणा करत अशा दीर्घिकांचे बाहू (आर्म) घट्ट असतील तर ती ‘एस-ए’ या प्रकारची. हे बाहू फारच सैल असले तर ‘एस-सी’ आणि यामधल्या आकाराच्या असतील तर ‘एस-बी’ प्रकारची सर्पिलाकृती दीर्घिका असं म्हटलं.
आपली आकाशगंगा एस-बी प्रकारची सर्पिलाकृती असून तिचं दर्शन नुसत्या डोळय़ांनी होतं ते फक्त एका पडद्याच्या स्वरूपात. ‘मिल्की-वे’चा संपूर्ण सर्पिलाकृती आकारपट्टाच पाहायचं तर दूर अवकाशात जायला हवं. अवकाशी फोटाग्राफीतून आकाशगंगेचा ‘एस’ आकार आता आपल्याला समजला आहे. विश्वातील सर्वच दीर्घिकांचे आकार आपल्या आकाशगंगेसारखे नाहीत. ते कोणते ते पुढच्या लेखात.