लेख – दिल्ली डायरी – देशातील बेरोजगारीचे असेही ‘गँगवार’

>> नीलेश कुलकर्णी 

पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा जनतेला दिलासा देणारा कारभार जोरकसपणे हाकत असताना केंद्रीय मंत्रिमंडळातील मंत्री मात्र त्यांच्या मेहनतीवर पाणी टाकताना दिसून येत आहेत. देशातील ‘मंदीबाईच्या फेऱ्या’ला ओला-उबेर जबाबदार आहे हे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे शब्द हवेत विरत नाहीत तोच देशाचे कामगारमंत्री संतोष गंगवार यांनी तर त्यावर कडी केली. ‘कौन कहता है देश में रोजगार नही है. रोजगार तो बहोत पडे है, बस काबिलियतवाले लोग नहीं है और खास तौर से उत्तर हिंदुस्थान में’ असा नवा शोध लावून गंगवार यांनी देशातील बेरोजगारीचेच ‘गँगवार’ केले आहे.

देशात मंदीमुळे सध्या दररोज अनेकांचे रोजगार जात आहेत, अनेक कुटुंबाच्या चुली विझत आहेत. परिस्थिती भीषण होत असताना केंद्र सरकारमधील मंत्र्यांनी बेजबाबदार विधाने करणे दुर्दैवी आहे. देशात नेमके किती बेरोजगार आहेत हा वादाचा विषय असला तरी राजकीय मुलाहिजा बाजूला ठेवून गेल्या पाच वर्षांत देशातील बेरोजगारी मोठय़ा प्रमाणावर वाढली हे अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय अहवालांनी स्पष्ट केले आहे. बेरोजगारांच्या हाताला काम देणे आणि ज्यांचे रोजगार धोक्यात आहेत त्यांची रोजीरोटी वाचवणे हे मायबाप सरकारचे कर्तव्य असते, मात्र सरकारमधील मंत्री बेरोजगारांची आणि देशातील युवा पिढीची थट्टा करण्यात मग्न आहेत.

केंद्रीय रोजगार मंत्री संतोष गंगवार हे नावारूपास आले ते राज्यसभेचे तत्कालीन उपसभापती पी. जे. कुरीयन यांनी त्यांच्या आडनावाच्या केलेल्या अपभ्रंशामुळे. एरवी हे गंगवार कोण असा प्रश्न कोणालाही पडण्यासारखी परिस्थिती आहे. त्यांचे आडनाव कुरीयन यांना नीटपणे उच्चारता येत नसे. अनेकदा ते ‘मिस्टर गँगवार’ असे त्यांना संबोधत. एकदा याच गंगवार यांनी ‘उपसभापती महोदय, आप मेरा सरनेम ठीक से नहीं ले रहे है. पहलेसे लोगों में राजनेतांके बारें मे घृणा होती है उपर सें आप मेरा सरनेम गँगवार बता रहे हो, इससे मेरी मुश्कीले और बढेगी कृपया इसे ठीक करे’ अशी विनंती केल्यानंतर राज्यसभेत हास्याची कारंजी उडाली होती. मात्र आता गंगवार यांनी बेरोजगारांच्या प्रश्नांचे ‘गँगवार’ केल्यासारखी परिस्थिती आहे. हिंदुस्थान हा सशक्त युवकांचा देश आहे. पंतप्रधानही नेहमी युवाशक्तीचाच नारा देत असतात, मात्र गंगवार महाशयांना बहुधा ही ‘काबिलियत’वाली युवाशक्ती दिसत नसावी. म्हणूनच त्यांनी देशातील युवकांच्या लायकीवरच प्रश्नचिन्ह निर्माण केले. गंगवार यांच्या विधानावर काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी व बसपाच्या मायावतींनी कडाडून टीका केल्यानंतर गंगवार महाशयांनी नेहमीप्रमाणे हात झटकून मोकळे होत त्या विधानाचे खापर मीडियावर फोडले आहे. एका टीव्हीच्या लाइव्ह शोमधूनही गंगवारांना पळ काढावा लागला. शिवाय एका कार्यकर्तीने त्यांच्याविरोधात पोलीस ठाण्यामध्ये गुन्हाही दाखल केला आहे. गंगवारांचे विधान हे अगोदरच बेरोजगारीने होरपळत असलेल्या युवकांच्या जखमेवर मीठ चोळण्याचाच प्रकार आहे.

पात्रांचा आणि ‘झीरो’

patraचॅनेलच्या चर्चेत सूत्रधारांसह इतरांना बोलूच द्यायचे नाही, बोलले तरी विषय भरकटवून कसा ठेवायचा यात हातखंडा असलेले भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांचे ग्रहमान सध्या भलतेच ‘वक्री’ झालेले दिसते. ओडिशातून लोकसभेची निवडणूक संबित पात्रांनी लढली. भाजप देशभरात ‘उज्ज्वला’ योजनेची जोरजोरात जाहिरातबाजी करत असताना साधेपणाच्या फॅडमध्ये पात्रांनी चुलीवरचं अनेक ठिकाणी बायाबापडय़ांकरवी जेवण करत आपण किती साधे आहोत हे दाखविण्याचा प्रयत्न केला, मात्र या ड्रामेबाजीने ‘उज्ज्वला’ योजनेची पोलखोल झाल्याने वरिष्ठ नेते पात्रांवर चांगलेच नाराज झाले. त्याचबरोबर साधेपणाचा डामडौल करूनही बिजू जनता दलाच्या पिनाकी मिश्रांनी पात्रांचा दणदणीत पराभव केला. या पराभवानंतर पात्रा अडगळीतच पडल्यासारखे झाले होते, मात्र सध्या मंदीबाईच्या फेऱ्यावरून देशात भाजप आणि काँग्रेसमध्ये वाक्युद्ध रंगले आहे. देशाची अर्थव्यवस्था पाच ट्रिलियन करण्याचा संकल्प सरकारने सोडला आहे, मात्र हा ट्रिलियन किती शून्यांचा असतो हे कोडे सोडवता सोडवता संबित पात्रांना चांगलाच घाम फुटला. काँग्रेसचे प्रवक्ते गौरव वल्लभ यांनी पात्रांच्या आक्रमक मांडणीला आवरत ‘एक ट्रिलियन में कितने झीरो होते हैं आप बताओ’ असे सांगितल्यावर पात्रा इकडेतिकडे पाहायला लागले. शेवटी उत्तर न देताच डिबेट संपली. मात्र पात्रांना गप्प करणारे हे गौरव कोण, असा प्रश्न त्यानंतर सर्वत्र विचारला जाऊ लागला आहे. 20 देशांत रिसर्च पेपर सादर करणारे आणि टेक्सास विद्यापीठाचे गोल्ड मेडलिस्ट असलेले गौरव वल्लभ राजस्थानचे आहेत. हिंदुस्थानात परतल्यानंतर त्यांनी काँग्रेससोबत काम करण्याची इच्छा व्यक्त करणारे पत्र राहुल गांधींना लिहिले होते. त्याबरहुकूम त्यांना प्रवक्तेपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. संबित पात्रांची तंतरवली म्हणून सध्या गौरव वल्लभ यांचा काँग्रेसमध्ये चांगलाच बोलबाला वाढला आहे.

चंद्रवंशी, रामसाय टेकाम आणि मोदी

chandrawanshiपंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव माहीत नसलेला मनुष्य अखंड हिंदुस्थानात कोणी असेल काय याचे उत्तर नकारार्थीच द्यावे लागेल. मोदींइतका लोकप्रिय माणूस आजघडीला कोणी नाही हे त्यांचे राजकीय विरोधकही मान्य करतील. मात्र मोदींचे नाव माहीत नसलेला एक गृहस्थ न शोधतादेखील सापडला आहे. त्याचे नाव रामचंद्र चंद्रवंशी. हे महाशय साधेसुधे गृहस्थ नाहीत. झारखंडच्या भाजप सरकारमध्ये ते आरोग्यमंत्री आहेत. मात्र स्मृती कमजोर झाली असेल की अन्य काही कारण असेल, या चंद्रवंशी महोदयांना पंतप्रधानांचे नाव काही केल्या आठवले नाही. पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त मीडियाने त्यांचा शुभेच्छा संदेशासाठी ‘बाईट’ घेतला, मात्र बाईट पूर्ण झाल्यानंतरही रामचंद्र चंद्रवंशी यांना देशाच्या पंतप्रधानांचे नाव काही केल्या आठवले नाही. हे चंद्रवंशी भाजपचे असल्यामुळे त्यांच्यावर भक्तमंडळी देशद्रोही म्हणून शिक्काही मारू शकत नाही. मात्र ते मूळचे लालूंच्या पार्टीतले असल्याने अनेकांनी चंद्रवंशी अजूनही लालूंना विसरले नसल्याची गमतीशीर प्रतिक्रिया नोंदवली आहे.

tekam एकीकडे पंतप्रधानांनाच विसरण्याची किमया चंद्रवंशी यांनी साधलेली असताना दुसरीकडे छत्तीसगडचे काँग्रेस सरकारमधील शिक्षणमंत्री प्रेमसाय टेकाम यांनी रेल्वेतील त्यांची बॅग चोरीला गेल्यामुळे थेट पंतप्रधानांवरच बॅगचोरीचा हास्यास्पद आरोप केला आहे. हे महाशय अमरकंटक एक्प्रेसने प्रवास करत असताना त्यांच्या बॅगेवर चोरांनी हात साफ केला. पंतप्रधानांच्या सांगण्यावरूनच काँग्रेसी मंत्र्यांच्या बॅगा चोरल्या जात आहेत असा विनोदी आरोप या टेकाम यांनी केला आहे. या बॅगेत ‘मोठे घबाड’ होते काय अशी चर्चा सध्या छत्तीसगडमध्ये चवीने चघळली जात आहे.

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या