पोटात का दुखते?

37137

>> डॉ. स्वप्नील सोनार

पोटदुखी. सर्वसामान्यपणे उद्भवणारा विकार. बऱ्याचदा ही पोटदुखी मानसिकही असू शकते. पण त्याकडे दुर्लक्ष कधीच करू नये. जरा या पोटदुखीच्या मुळाशी जाऊया.

पोटदुखी अचानक डोके वर काढू शकते, पोटदुखीची आणखी बरीच कारणे असू शकतात. अतिआम्लता म्हणजे हायपरऑसिडिटी आणि अपचन हे पोटदुखीचे नेहमीचे कारण असते, पण पोटदुखी काही गंभीर कारणांमुळेही होऊ शकते. वैद्यकीय भाषेत पोटाला पॅण्डोराज बॉक्स म्हटलं जातं. पोटामध्ये खूप महत्त्वाचे अवयव असतात. त्या अवयवांमध्ये झालेल्या विकाराचे गंभीर लक्षण म्हणूनही पोटदुखी होऊ शकते. म्हणजेच कधी कधी पोटदुखी ही जठर, यकृत, स्वादुपिंड, पित्ताशय, छोटे आणि मोठे आतडे, मूत्रपिंड आणि मूत्राशय यांना झालेल्या विकाराचे लक्षण म्हणूनही उद्भवू शकते. पोटातील प्रत्येक अवयवाला व्याधी उत्पन्न झाली की पोटदुखी सुरू होते.

यकृत, जठर आणि पित्ताशय यांच्याशी संबंधित व्याधींमुळे पोटाच्या उजवीकडे वरच्या बाजूला तीव्र वेदना होऊ शकतात, तर उजवीकडे खालच्या बाजूला होणारी पोटदुखी ही ऍपेंडिसायटिस किंवा मूतखड्यामुळे होऊ शकते. पोटाच्या डावीकडे वरच्या बाजूला होणारी पोटदुखी ही स्वादुपिंडाच्या विकारामुळे (विशेषतः दारू पिणाऱ्या व्यक्तींमध्ये) उद्भवू शकते. काही दुर्मिळ प्रकरणांमध्ये म्हणजे हृदयविकारामध्येही छातीच्या खाली आणि पोटाच्या वरच्या भागात (एपिगॅस्टिक क्षेत्र) दुखू शकते आणि आपण हायपरऑसिडिटी म्हणून त्याच्याकडे दुर्लक्ष करू शकतो. या सर्व कारणांमुळे पोटदुखी उद्भवल्यास ऍण्टासिड्स घ्यावीत. तरीही पोटदुखी थांबली नाही तर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

वारंवार होणारी कमी तीव्रतेची पोटदुखीही पोटातल्या गंभीर व्याधीचे लक्षण असू शकते. उदा. कॅन्सर, आतड्याचा टीबी, जीईआरजी, इन्टेस्टिनल ऑब्स्ट्रक्शन यांचे निदान आणि उपचार करणे आवश्यक असते. पोटदुखीची आणखी काही कारणे आहेत. स्टमक फ्लू किंवा विषाणूद्वारे होणारे पोटातील संक्रमण, अन्नातून विषबाधा होणे, कृमी होणे, ऑसिडिटी, टायफॉईड, कावीळ या आजारांमध्येही पोटात दुखते. पित्ताशयातील खडे, मूतखडा, रक्तवाहिन्यांमधील अडथळा निर्माण होणे, गाठ होणे किंवा अन्य कारणांमुळेही पोटदुखी होते.

उपाय काय

पोटदुखीची कारणे आणि लक्षणे पाहूनच त्यावर योग्य तो उपाय करता येईल. तरीही साधारणपणे अपचनासाठी ऍन्टासिड किंवा गॅस दूर होण्याची औषधे दिली जातात. पोटात कृमी झाले असतील तर डॉक्टरांच्या सल्ल्याने कृमी नष्ट करण्याचे औषध घेता येऊ शकते. हलका आहार ठेवावा, पुरेशा प्रमाणात पातळ पदार्थ घ्यावेत. तरीही परिस्थिती नियंत्रणात नसल्यास रुग्णाला डॉक्टरांकडे घेऊन जावे आणि उपचार करावे.

 ही पहा लक्षणे

पोटात मुरडा येऊन वेदना होणे, पोट फुगणे, जुलाब किंवा बद्धकोष्ठतेची समस्या होणे, उलटी होणे, शौचाद्वारे आव किंवा रक्त पडणे अशा स्थितीत पोट दुखत असल्यास, वारंवार उलटय़ा होत असल्यास, पोटाला स्पर्श करताच तीव्र वेदना होत असल्यास किंवा श्वास घेण्यास त्रास होत असल्यास तसेच पोट साफ होण्यास अडचण येत असल्यास लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्या.

काय काळजी घ्याल?

 • चांगला सकस आहार घ्यावा.
 • भरपूर प्रमाणात पाणी पिणे.
 • दारू, सिगरेट, तंबाखू न घेणे.
 • आहारामध्ये दही किंवा ताक नियमित ठेवा.
 • जेवताना केवळ अर्धा ग्लास पाणी प्यावे.
 • जेवणानंतर एक ते दीड ग्लास पाणी प्यावे.
 • भूक लागल्यावरच खावे.
 • जेवणाच्या वेळा ठरावीक ठेवा.
 • झोप चांगली घ्यावी.
 • जास्तीत जास्त फळे खा.
 • तळलेले, मसालेदार पदार्थ कमी खा.

 नेमके कारण काय

 • खूप कोरडा तिखट आहार घेणे.
 • जेवणाची वेळ अनियमित असणे. कमी पाणी पिणे.
 • शिळा पाव, शिळे अन्न जास्त खाणे, पोट साफ नसणे.
 • लघवीला जाण्याचा कंटाळा करणे, मुलांच्या बाबतीत हात स्वच्छ न धुणे, खूप गोड खाल्याने जंत होणे
 • मूतखड्यामुळेही पोटात दुखू शकते. यासाठी वाळा, चंदन, गोखरू पावडर घालून केलेले औषधी पाणी पिण्यास द्यावे.
 • वयात आलेल्या मुलींना शतावरीकल्प किंवा पावडर दुधाबरोबर रोज द्यावी, त्यामुळे गर्भाशयाला बळ मिळते. मासिक पाळीच्या वेळी होणारा त्रास कमी होतो.

 लेखक जनरल फिजिशियन आहेत.

  [email protected]

आपली प्रतिक्रिया द्या