अतिरिक्त खाणं! ताणतणावातून…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> डॉ. स्वप्नील सोनार

दिल धडकने दो. साधारणतः 3-4 वर्षांपूर्वी आलेला चित्रपट. चित्रपटातील चरित्र नायिकेचे आपल्या उद्योगपती नवऱ्याबरोबर कडाक्याचे भांडण होते आणि अत्यंत तावातावाने ती आतमध्ये येऊन भरपूर केक्स, पेस्ट्रीज खायला सुरुवात करते. जे नुसते पहायलाही अत्यंत अस्वाभाविक आणि विचित्र वाटते. बऱ्याच जणांची खूप ताणतणावाच्या प्रसंगी अशीच अवस्था होते.  का होते असे…???

मानसिक किंवा शारीरीक ताण आपल्या मेंदूमधल्या अंतस्त्रावी ग्रंथीवर परिणाम करतो. ताणतणावामुळे कॉर्टिसॉल या संप्रेरकाची पातळी शरीरात आणि रक्तात वाढते. हे कॉर्टिसॉल वाढल्यामुळे भूक वाढते. अशावेळी जास्त खाणे, गोड खावंसं वाटणे अशा क्रिया घडतात. त्यावर उपाय म्हणजे ताणतणाव कमी करणे हाच होऊ शकतो. नियमित पुरेशी झोप घेतली, भरपूर पाणी प्यायले, ऑफिसमध्येही कामाचा ताण जास्त ओढून घेतला नाही, तर ताण कमी होतो. मग अतिखाण्याचे प्रकारही होणार नाहीत.

ताणामागची कारणं काय आहेत ते रुग्णांनी जाणून घ्यायला हवे. ते शक्य नसेल तर डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. ते रुग्णांना या बाबतीत जास्त मदत करू शकतात. कारण आपण ताण सहन करत राहातो आणि कालांतराने आपल्याला नैराश्य येते. मुंबईसारख्या ठिकाणी कामाचा ताण मोठाच असतो. मग आपण कुणाशी बोलत नाही. गप्प गप्प राहातो. म्हणूनच मग तरुणांमध्ये मग एकटं राहाणं, आपल्यामध्येच मग्न राहणं असे प्रकार सुरू होतात. मित्रमंडळी नाहीत, कुटुंबीय नाहीत… अशी आजकालची तरुणांची अवस्था आहे. त्याच्यातून ते नैराश्येकडे जाऊ लागतात. हे टाळायचे असेल तर मानसशास्त्रज्ञ योग्य मदत करतात. त्यांच्याकडून उपचार झाले की भूक पूर्ववत होते. मग जास्त खाल्ले जात नाही. कॉर्टिसॉल या संप्रेरकाच्या वाढीमुळे रक्तातील साखरही वाढते. ताण असलेल्या माणसाला मधुमेह होतो. जास्त खाण्यामुळे मग माणसाचे वजन वाढते.

काहीजणांचे वजन अचानक वाढते. तो माणूस खूप सुखी आहे, समृद्ध आहे अशी इतरांची समजूत होते. वास्तविक त्याच्या मनावर काही ना काही ताण असतो. हा ताण इतरांना दिसत नाही. मग तो ताण कामाचा असेल, घरगुती समस्यांचा असेल किंवा आर्थिक अडचणींचाही ताण असू शकतो. हा माणूस काही बोलत नाही. पण त्याचं वजन वाढण्याचं कारण ताणतणाव हेच असू शकते. फार ताण वाढला, दोन-तीन वर्षे तसाच कायम राहिला की अशा रुग्णांच्या हृदयावर दबाव वाढून त्यांना हृदयविकाराचा धक्का येण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे मुंबईसारख्या घाईगर्दीच्या ठिकाणी ताणतणाव हे एक अतिखाण्याचे मोठे कारण असू शकते.

ताण प्रत्येकालाच…

केवळ तरुणांनाच नाही, तर ताणतणाव सर्वांनाच ताण सहन करावा लागतो. म्हणूनच तर मानसोपचार तज्ञांकडे रुग्णाची गर्दी वाढतेय. बऱ्याचदा तर मनावर ताण येण्यासाठी समस्या फार मोठी असावी लागते असे नाही. कॉलेजमध्ये जाणाऱ्या मुलांना मेजवानीला जाताना कोणते कपडे घालावेत, पाहुणे वाढले की महिलांना स्वयंपाक कसा पुरवायचा, कर्मचाऱ्यांना वरिष्ठांशी बोलताना… असे ताणाचे अनेक प्रकार आहेत. एवढेच नाही तर क्रिकेटचा सामना बघताना क्रिकेटपटू शून्यावर बाद झाला तरी काहीजणांना ताण येतो. भूतकाळातील अप्रिय घटना, संवाद साधता न येणे इ. कारणांमुळेही ताण येऊ शकतो.

यावर उपाय काय?

  • अचानक खूप खावेसे वाटले तर लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा.
  • अतिताण होऊ नये यासाठी रात्री पुरेशी आणि शांत झोप घेतली पाहिजे.
  • सकाळी उठल्यावर आनंदी व उत्साही राहायला हवे.
  • दररोज वेगवेगळया समस्यांना तोंड द्यावे लागते. त्यांना समस्या न मानता ते रूटीन आहे असं मानले पाहिजे.
  • एखादी अप्रिय घटना घडली तरी मनावर ताबा ठेवून त्याचे काहीही वाटून न घेण्याची सवय लावून घ्यायला पाहिजे.
  • कामाच्या ठिकाणी प्रचंड ताण असेल तर कामातून दोन-तीन दिवस सुट्टी घेऊन निवांत ठिकाणी जाणे गरजेचे आहे.

लेखक जनरल फिजिशियन आहेत.