105 वर्षांचा सेवायज्ञ- हिंद महिला समाजाची कौतुकास्पद वाटचाल

 

थोर समाजसेविका, स्वातंत्र्यसैनिक आणि पहिल्या नगरसेविका दिवंगत अवंतिकाबाई गोखले यांनी 28 नोव्हेंबर 1918 रोजी समाजातील गरजू महिलांना स्वावलंबनाकडे नेण्यासाठी आणि त्यांना आवश्यक ते सर्वतोपरी सहाय्य करण्यासाठी ‘हिंद महिला समाज’ या संस्थेची स्थापना केली. संस्थेला या वर्षी 105 वर्षे पूर्ण झाली आहेत.

हिंद महिला समाज संस्थेच्या विश्वस्त शबरी देसाई म्हणाल्या, ‘‘महिलांच्या सामाजिक, आर्थिक प्रगतीसाठी हिंद महिला समाजाची स्थापना झाली. विविध उपक्रमांच्या माध्यमातून संस्था महिला सक्षमीकरणासाठी सातत्याने प्रयत्नशील राहिली आहे. माझी आजी, माझी आई आणि आता मी असे हिंद महिला समाजाशी आमचे गाढ ऋणानुबंध आहेत, याचा अतिशय आनंद आणि समाधान आहे.’’

संस्थेचे उपक्रम वाखाणण्याजोगे असून ‘वाचाल तर वाचाल’ या उक्तीनुसार महिलांना वाचनाला प्रवृत्त करणारा हा पहिला विभाग 1918 साली ‘कस्तुरबा मोफत वाचनालय’ या नावे सुरू करण्यात आला. या उपक्रमाची 105 वर्षांची यशस्वी मार्गक्रमणा निश्चितच कौतुकास्पद आहे.समाजाच्या संस्थापिका अवंतिकाबाई गोखले यांच्या जन्मशताब्दी निमित्त 1981 पासून ‘गरजू कुटुंब कल्याण निधी योजना’ कार्यरत असून ज्यांच्या घरात शिक्षण घेणारी मुले आहेत अशा पाच गरजू कुटुंबांना या योजनेतून दरमहा आर्थिक मदत केली जाते. याशिवाय रजनी बापट यांच्या स्मरणार्थ सन 2005 पासून दरवर्षी जून महिन्यात एका गरजू भगिनीस आर्थिक मदत दिली जाते.

विद्यार्थ्यांना मदत
‘शिक्षणाशिवाय जीवनाला आधार नाही’ या न्यायानुसार समाजातील गरजू विद्यार्थ्यांसाठीचा कमलाबाई पारिख ट्रस्ट ‘पुस्तक पेढी’ हा उपक्रम 1978 पासून आजतागायत उत्तमरीत्या कार्यरत आहे. हा विभाग विद्यार्थ्यांसाठी एक आधारवड बनला आहे. अवंतिकाबाई यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ दरवर्षी इंजिनीअरिंग, मेडिकल किंवा उच्च शिक्षणासाठी एका विद्यार्थ्याला शिष्यवृत्ती देण्यात येते.

महिलांना रोजगार
संस्थेतर्फे 1951 पासून सुरू झालेल्या पै. सौ. लिलाबाई भरत दोशी ‘उद्योग मंदिरा’ने गरजू भगिनींना रोजगार मिळवून देऊन त्यांना स्वयंपूर्ण होण्यास मदत केली आहे. यात पोळीभाजी विभाग तसेच नाश्ता विभाग आहे. या उद्योग विभागातील सर्व कर्मचाऱयांना वर्षातून एकदा वैद्यकीय मदत दिली जाते. तसेच प्रत्येक कर्मचाऱयाच्या खात्यात दरवर्षी ठरावीक रक्कम ‘निवृत्त वेतन निधी’ म्हणून जमा होते. कर्मचाऱयांना रेल्वेपास व बसभाडे दिले जाते. ‘शिवण विभाग’ या उपक्रमांतर्गत बाळंतविडय़ासाठी द्यावे लागणारे झबले, टोपरी, लंगोट, दुपटी इत्यादी कपडे ऑर्डरप्रमाणे शिवूनही दिले जातात.

-अनघा सावंत