
>> वैश्विक
शीर्षक वाचून म्हणाल, त्यात काय आश्चर्य! रोजचाच दिवस सूर्याचा असतो. सूर्याच्या दीप्तीमुळेच तर त्याला दिवस म्हणतात. अगदी शंभर टक्के खरं, पण 20 एप्रिल हा दिवस वेगळय़ा अर्थाने सूर्याचा ठरला. एकतर हिंदुस्थानात पूर्वेकडच्या राज्यांमध्ये प्रचंड ‘हीट वेव्ह’ आली. या उष्णतेच्या लाटेचे प्रताप देशभर दिसले. ते भयावह आहेत. जगातही सूर्याचा प्रकोप फार मोठय़ा प्रमाणावर जाणवतोय. पृथ्वीच्या उत्तर गोलार्धावर तळपणाऱया सूर्याचं आग ओकणं असंच सुरू राहिलं तर गतवर्षी कॅनडावर ‘हीट कोन’ तयार होऊन अनेकांची लाहीलाही झाली तसं कुठेही घडू शकतं. सूर्याच्या अकरा आणि एकशे एकवीस वर्षांच्या चक्रात सौरज्वाला (सोलर फ्लेअर) उफाळून येण्याचं प्रमाण वाढतं. सूर्यपृष्ठावरून आगीचे प्रचंड लोळ अंतराळात हजारो किलोमीटर दूर भिरकावले जातात आणि त्याचा विपरीत परिणाम सौरमालेतल्या तिसऱया ग्रहावर म्हणजे आपल्या पृथ्वीवर होतो. आधुनिक विज्ञानाने याचं मोजमाप करता येतं हा मोठाच फायदा, परंतु त्यामुळे सूर्याच्या ‘सन’तापात बदल मात्र घडवता येत नाही. उलट आपण सौर-संशोधनासाठी पिंवा अन्य कारणांसाठी अवकाशात सोडलेले अनेक उपग्रह त्यामुळे ‘बधिर’ होऊ शकतात.
संदेश वहनात अडथळा येऊ शकतो.सूर्याच्या या उद्रेकाचा अंदाज माणसाला पूर्वीच आला होता. तंत्रज्ञानाने भरारी घेतल्यावर सौरयानं सूर्याकडे झेप घेऊ लागली. त्यातलंच एक ‘ऱहेसी’ नावाचं यान 20 एप्रिलला आफ्रिकेच्या उत्तर भागावर कोसळलं. ते कोसळण्याची निश्चित वेळ ठाऊक नसली तरी 20 एप्रिलला ते पृथ्वीच्या वातावरणाजवळ आल्याने साधारण कुठे कोसळेल याचा अंदाज आला होता. त्यात हिंदुस्थानचाही समावेश होता. अवकाशस्थ वस्तू कोसळताना बहुधा समुद्रात कोसळतात. कारण पृथ्वीवर 72 टक्के समुद्रच आहे. ‘ऱहेसी’ मात्र आफ्रिकेच्या सहारा वाळवंटात पडलं असावं. ‘असावं’ म्हणण्याचं कारण असं की, त्याचा बहुतेक भाग वातावरणाशी झालेल्या घर्षणात जळून खाक झाला. उरलेले तुकडे सापडले नसले तरी साधारण जागा समजली.
‘ऱहेसी’ हे नाव 5 फेब्रुवारी 2002 मध्ये अंतराळात सौरज्वालांचा अभ्यास करण्यासाठी सोडलेल्या कृत्रिम उपग्रहाचं होतं. आधी हे नाव ‘हेस्सी’ असं होतं. मग त्याला सौर संशोधक डॉ. रेव्हन रॅमोटी यांचं नाव जोडून ‘रेव्हन रॅमोटी हाय एनर्जी सोलर स्पेक्ट्रोमेट्री इमेजर’ असं लांबलचक नाव दिलं गेलं. सौरज्वाला आणि त्यांचा वर्णपट (स्पेक्ट्रम) यांचा अभ्यास करून या उपग्रहाने हजारो प्रतिमा आणि भरपूर माहिती (डेटा) पाठवली. केवळ दोन वर्षांसाठी धाडलेल्या ‘ऱहेसी’ने चांगली 16 वर्षे 10 महिने इतका काळ इमानेइतबारे कामगिरी बजावली. त्याच्या ‘डेटा’चा वापर सुमारे अडीच हजार संशोधन-लेखांमध्ये केला गेला. त्यातून सौरज्वालांचं खरं रूप बऱयापैकी लक्षात आलं. शेवटी 2019 च्या मार्चमध्ये हा उपग्रह थकला आणि निकामी होऊन पृथ्वीभोवती गरगरत राहिला. असे आणखी किती ‘ऱहेसी’ तिथे ‘भिरभिरतायत’ ते पुढच्या लेखात पाहू. अखेर आपलं ईप्सित कार्य संपवून 20 एप्रिल 2023 रोजी ‘ऱहेसी’ पृथ्वीवर कोसळला.
मध्यपूर्वेतला मानवनिर्मित आगडोंब आणि युव्रेनी युद्धामुळे आणि उपग्रहाचे आगीचे लोळ कोणते यात गोंधळ झाला, पण नंतर आफ्रिकेतल्या सहारा वाळवंटाने या उपग्रहाला कायमचा सहारा दिला. सूर्याशी निगडित एका उपग्रहाच्या अंताचा हा दिवस. दुसरी ‘सौर’ घटना म्हणजे याच दिवशी पश्चिम ऑस्ट्रेलिया, इंडोनेशिया, चीन आणि अमेरिकेचा काही भाग इथून तिहेरी स्वरूपाचं शतकातून एकदाच होणारं ‘खग्रास’ सूर्यग्रहण दिसलं. ते टीव्हीवर ‘लाइव्ह’ पाहता आलं. सूर्य आणि पृथ्वी यांच्याबरोबर मध्ये आलेल्या चंद्राच्या विविक्षित अंतरामुळे हे ग्रहण काही ठिकाणी खंडग्रास (पार्शल), काही ठिकाणी पंकणाकृती (अॅन्युलर) आणि बऱयाच ठिकाणी खग्रास (संपूर्ण) दिसलं. ही पर्वणी खगोल अभ्यासकांसाठी अपूर्व असते. अशी सर्व प्रकारची सहा सूर्यग्रहणे हिंदुस्थानातून 1980 ते 2017 या काळात आम्ही अनुभवली आहेत, परंतु एकाच ग्रहणात तिन्ही ‘रूपं’ दाखवणाऱया सूर्यग्रहणाला ‘हायब्रिड सोलार एक्लिप्स’ असं म्हणतात. तो ‘काळय़ा’ सूर्याचा तेजस्वी दिवस 20 एप्रिल हाच होता.
तिसरी अवकाशीय घटना म्हणजे अमेरिकन उद्योगपती इलॉन मस्क यांच्या महत्त्वाकांक्षी चांद्र-मंगळ स्वारीसाठी भविष्यात उपयुक्त ठरणारं आजवरचं सर्वात प्रचंड रॉकेट 20 एप्रिल याच दिवशी अवकाशात सोडण्यात आलं आणि या घटनेचं काही क्षणांतच दुर्घटनेत रूपांतर होऊन ते कोसळलं. कोणत्याही नव्या वैज्ञानिक प्रयोगाच्या वेळी अपयशाची पायरी पिंवा पायऱयासुद्धा पार कराव्या लागतात. त्यावरून बोध घेऊन संशोधन पुढे जात असते. शेकडो वेळा अपयश येऊन नंतर प्रज्वलित झालेला दिवा आता निरंतर तेवत आहे. या चिकाटीलाच संशोधन म्हणतात.
त्यातून जसे फायदे तसेच धोकेही आहेत. अवकाशयानांची वाढती संख्या यापुढे अनेक देशांच्या स्पर्धेतून होणार आहे. ‘उडत्या’ अवकाशयानांवरचाही ताबा कधीतरी सुटतो तर ‘पडत्या’ अवकाशयानांना कसं रोखायचं ही उद्याची मोठीची समस्या असेल.































































