
>> वैश्विक, [email protected]
खगोलशास्त्रात ‘त्या तिथे, पलीकडे… तिकडे’ म्हणते दूरस्थ अवकाशात बरंच काही असतं. प्रत्यक्ष यानं धाडून त्यांचा शोध घेणे खूप संशोधनाचं, कौशल्याचं, जिकिरीचं आणि खर्चिक काम आहे.
विविध ग्रहांवर किंवा ग्रहांजवळ जाऊन संशोधन करणाऱया अवकाश मोहिमांची माहिती घेताना काही यानं आपल्या ग्रहमालेच्या पलीकडे असलेल्या किपर बेल्ट नावाच्या भागात जाऊन पोचली आहेत तर काहींनी सूर्याची मॅग्नेटिक फिल्डची मर्यादाही पार केली आहे. (गुरुत्वाकर्षणाची नव्हे. त्याविषयी नंतर एखाद्या लेखात)
1979 ते 1989 या दशकात व्हॉएजर-1 आणि 2 या यानांनी मोठीच भरारी घेतली आणि 5 नोव्हेंबर 2018 रोजी ही यानं सौरचुंबकीय क्षेत्राच्या (हेलिओपॉज) पलीकडे गेली. हा प्रवास पृथ्वीवरून निघाल्यापासून मंगळ, गुरू, शनी, युरेनस, नेपच्यून आणि किपर बेल्ट या अशनींच्या पट्टय़ांचाच भाग असलेल्या प्लुटोपलीकडे जाणारा होता. या यानांना प्राथमिक गती आणि ऊर्जा अर्थातच पृथ्वीवरून प्राप्त झाली, परंतु नंतर गणिती सूत्रांचा वापर करत अनेक ग्रहांच्या गुरुत्वाकर्षणाचा उपयोग करीत ती पुढे जात राहिली आणि सूर्यमालेपलीकडे जाताना त्यांना ‘अक्षय’ गती प्राप्त झाली.
आजपर्यंत दोन व्हॉएरज तसेच पायोनिअर आणि अलीकडे होरायझन यान सौर संकुलाबाहेर पोचलं आहे. यापैकी ‘न्यू होरायझन’ची माहिती एकदा एका लेखात घेतली होती त्याला काही वर्षे झाली. आता पुन्हा त्याविषयी जाणून घ्यायचं ते त्याच्या इतक्या वर्षांच्या कार्याविषयी.
नेपच्यूनच्या पलीकडे असलेला प्लुटो 1930 मध्ये क्लॉईड टॉम्बो यांनी शोधला. तेव्हापासूनच हा पूर्ण ग्रह की खुजा ग्रह असा वाद होता. शेवटी 2004 मध्ये प्राग येथील खगोल संमेलनात या ग्रहाच्या ‘खुजे’पणावर शिक्कामोर्तब झालं.
तशी या ‘ग्रहा’ची बरीचशी माहिती आधी मिळालीच होती. सूर्यापासून सुमारे 4 अब्ज किलोमीटर अंतरावर असलेल्या प्लुटोचा शेरॉन नावाचा उपग्रह (चंद्र) एवढा मोठा की या दोघांपैकी ग्रह कोणता हा प्रश्न पडावा. त्यांचा गुरुत्वमध्य दोघांच्या मधल्या अंतराळात त्यामुळे कोण कोणाभोवती फिरतंय कसं ठरवणार? म्हणजे हे द्वैती (बायनरी) खुजे ग्रह झाले. प्लुटोचा व्यास 2274 किलोमीटर असून तो आपल्या चंद्रापेक्षा छोटा आहे. त्याचं गुरुत्वाकर्षण खूपच कमी असल्याने त्यावरून एखादं यान अवकाशात उडवायचं असल्यास त्याची गती सेकंदाला 1 किलोमीटर पुरेशी ठरेल.
तर एवम्गुणविशिष्ट प्लुटो हा मोठय़ा ग्रहांच्या पलीकडे असलेल्या सूर्याभोवती फिरणाऱया असंख्य, लहानमोठय़ा अशनींचा पट्टा आहे. मंगळ आणि गुरू यांच्यामधल्या अशनी पट्टय़ापेक्षा तो कितीतरी व्यापक असून तो या अशनी पट्टय़ाच्या 20 पट रुंद आणि 200 पटींनी अवकाशस्थ वस्तूंची गर्दी बाळगून आहे. सूर्यापासून 30 ते 50 ऍस्ट्रॉनॉमिकल युनिट अंतरावर आहे. 1 ए.यू. म्हणजे 15 कोटी किलोमीटर. त्याच्या 30 ते 50 पट अंतरावर ‘किपर’ या शास्त्र्ाज्ञाच्या नावाचा हा अशनी पट्टा फिरत आहे.
त्याचा आणि प्लुटोचाही जवळून शोध घेण्यासाठी 19 जानेवारी 2006 रोजी ‘न्यू होरायझन’ हे यान, केप कार्नेबल अवकाशतळावरून निघालं. त्याचा दूरचा प्रवास सोपा नव्हता. ताशी 58,500 किलोमीटर वेगाने अवकाशात भिरभिरणारं हे आतापर्यंतचं सर्वात वेगवान अवकाशयान. उड्डाणानंतर त्याला प्लुटोपर्यंत जायलाच बराच काळ लागला. तोपर्यंत त्यावरची यंत्रणा (सिस्टीम) सुप्त किंवा ‘हायबरनेशन’मध्ये ठेवण्यात आली होती. तो काळ संपवून 6 डिसेंबर 2014 रोजी ‘न्यू होरायझन’चं कार्य पुन्हा सुरू झालं. पुढे त्याचा वेग ताशी 2016 मध्ये 84000 किलोमीटर एवढा वाढला. प्लुटोचं जवळून निरीक्षण करून फोटो पाठवून, होरायझन ‘किपर बेल्ट’मध्ये शिरलं. यापूर्वी ग्रहमालेपलीकडची ‘हायड्रोजन वॉल’ 1992 मध्ये व्हॉएजरने निश्चित केलीच होती. ती ‘न्यू होरायझन’ने पाहिली. प्लुटोचं निरीक्षण 2015 मध्ये संपल्यावर या यानाला ‘मिशन एक्स्टेन्शन’ मिळून (मुदतवाढ) आता किपर बेल्टचा मागोवा घेत आहे. पृथ्वीवरून निघताना त्याला दिलेले काम त्याने पूर्ण केलंय. अशी बहुतेक यानं त्यांना दिलेल्या मुदतीच्या पलीकडे जाऊन कार्यरत असतात. अथक निरीक्षण करतात. त्यावर महत्त्वाची माहितीही कुणा परग्रहवासीयांसाठी नोंदलेली असते.

























































