
>> प्रसाद ताम्हनकर
वेगवान प्रवास आणि वेळेची बचत हे प्रमुख वैशिष्टय़ असलेल्या विमान सेवेच्या ‘गती’वर देशोदेशींचे शास्त्रज्ञ काम करत आहेत. सुरक्षितता जपून विमानाचा वेग अधिकाधिक वाढवणे हे यामागचे उद्दिष्ट आहे.
अमेरिकेने अलीकडेच स्वप्नातीत वेगाने प्रवास करणाऱया ‘सुपरसोनिक’ विमानांना वाहतुकीसाठी उपलब्ध करून देण्याची घोषणा केली आहे. अमेरिकेच्या या प्रकल्पाकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. ही घोषणा नुकतीच करण्यात आली असली तरी हा प्रकल्प पूर्ण होऊन ही विमाने प्रवाशांसाठी उपलब्ध व्हायला 2029 साल उजाडणार आहे. अमेरिकेची हवाई कंपनी युनायटेड एअरलाईन्सने यासंदर्भात विमान उत्पादक कंपनी असलेल्या ‘बुम सुपरसोनिक’बरोबर करार केला आहे. 2029पर्यंत ‘बुम सुपरसोनिक’ 15 ‘सुपरसोनिक’ विमाने अमेरिकन सरकारला पुरवणार आहे. जर सर्व सुरक्षा नियमांचे योग्य पालन झाले आणि पहिला टप्पा यशस्वी ठरला तर अमेरिकन सरकार अजून 35 सुपरसोनिक विमानांसाठी करार करण्यास उत्सुक असणार आहे.
जगभर एवढी चर्चा होण्यासारखे या ‘सुपरसोनिक’ विमानांमध्ये आहे तरी काय? ‘सुपरसोनिक’ विमाने ही ध्वनीच्या वेगापेक्षादेखील जास्त वेगाने प्रवास करतात. एका रिपोर्टनुसार ही विमाने जमिनीपासून 60 हजार फूट म्हणजे 18 हजार 300 मीटर उंचीवर उडण्यासाठी सक्षम असून या विमानांचा वेग साधारण विमानांपेक्षा प्रतितास 1060 किलोमीटरपेक्षा जास्त असणार आहे. सध्याच्या साधारण विमानांचा वेग हा साधारण 900 किलोमीटर प्रतितास इतका असतो. ‘बुम सुपरसोनिक’ने केलेल्या दाव्यानुसार ही ‘सुपरसोनिक’ विमाने 100 टक्के ‘सस्टेनेबल एव्हिएशन’ इंधनावर चालणार असून त्याद्वारे कोणत्याही प्रकारे ‘कार्बनडाय ऑक्साईड’चे उत्सर्जन होणार नाही.
अर्थात ‘बुम सुपरसोनिक’ने आतापर्यंत कोणतेही ‘सुपरसोनिक’ विमान बनवलेले नाही आणि पहिल्या ‘सुपरसोनिक’ विमानाला अजूनही सर्टिफिकेटदेखील मिळालेले नाही. मात्र बुम सुपरसोनिकने याचे एक प्रोटोटाईप विमान बनवलेले असून ते या वर्षी उड्डाण करण्याची शक्यता आहे. या प्रोटोटाईप विमानात केवळ पायलटला बसण्यासाठी जागा असून अवकाशात 60 हजार फुटांपर्यंत उड्डाण करेल. सध्याची विमाने साधारण 36 हजार फुटांपर्यंत उड्डाण करू शकतात.
या स्वप्नातीत वेगवान विमानांसमोर दोन मोठय़ा अडचणीदेखील आहेत. एक म्हणजे त्यांचा प्रचंड आवाज आणि दुसरी म्हणजे प्रदूषण. हे विमान 18000 मीटरवरून उडत असेल तरी याचा प्रचंड मोठा आवाज पृथ्वीवर ऐकायला मिळेल आणि तो एखाद्या स्फोटासारखा असेल. यावरून त्यांच्या आवाजाची कल्पना आपण करू शकतो. मात्र बुम सुपरसोनिक या उत्पादन कंपनीच्या दाव्यानुसार ते निर्माण करत असलेल्या विमानांचा आवाज हा अत्यंत कमी असून सध्याच्या आधुनिक जेट फ्लाईटच्या आवाजाइतकाच तो असणार आहे. हे विमान प्रचंड इंधन खाणार आहे, ही दुसरी समस्या आहे. मात्र तुम्हाला जर अधिक ऊर्जा हवी असेल, तर अधिक इंधनाचा वापर हा होणारच असे उत्पादकांचे म्हणणे आहे. मात्र ही विमाने प्रदूषण बिलकूल करणार नाहीत हा दावादेखील ते करत आहेत.
विशेष म्हणजे अमेरिकेच्या राष्ट्रपतींसाठीदेखील सुपरसोनिक विमान बनविण्यात येत असून ते त्यांच्या ‘एयरफोर्स वन’ची जागा घेईल. या विमानात आठ लोकांना बसण्याची सुविधा असेल, तसेच ऍडजेस्टेबल टेबल्स आणि फ्लॅट सिट्सची सुविधादेखील असणार आहे. या विमानात दोन गॅलऱयादेखील असणार आहेत. अमेरिकन राष्ट्रपतींसाठी खास बनवण्यात येत असलेल्या या विमानाची गती 5 हजार नॉटिकल मैल म्हणजेच 9260 किलोमीटर प्रतितास अशी भन्नाट असणार आहे. याचाच अर्थ आपल्या नव्या विमानातून अमेरिकन राष्ट्रपती सात तासांचा प्रवास केवळ 90 मिनिटांत पूर्ण करू शकतील.



























































