लॉक-अनलॉक दंतसुरक्षा

>>  डॉ. मानसिंग पवार (दंतचिकित्सक)

खासगी दंतवैद्यांनी योग्य ती खबरदारी घेऊन आता जवळपास सर्वच दवाखाने सुरू केलेले आहेत. अत्यावश्यक असेल तरच रुग्णांना दवाखान्यात बोलावून उपचार केले जात आहेत, अन्यथा त्यांना टेली कन्सल्ट केले जातेय. यामध्ये फोनवरून दातदुखीचे कारण, यापूर्वी त्रास झाला होता का, दात किती दिवस दुखतोय, कुठली ऍलर्जी आहे का, कोणत्या वेगळ्या गोळ्या घेतल्या होत्या का याची इत्थंभूत माहिती घेतली जाते. दवाखान्यात येताना शक्यतो एकटेच येण्याचा सल्ला दिला जातो. तिथे वेटिंग रूम असल्यास सोशल डिस्टंन्स पाळला जातो, शिवाय दवाखान्यात योग्य प्रकारे निर्जंतुकीकरण केले जाते आणि विषाणूंचा प्रसार होणार नाही याचीही खबरदारी घेतली जाते.

जागतिक आरोग्य संघटना आणि सेन्ट्रल डिसिस कंट्रोल या दोन संस्था आहेत. त्या जागतिक स्तरावर काम करतात. त्यांनी कोविड आल्यानंतर जगभरातल्या आरोग्य विभागाशी संबंधित डॉक्टरांना काही मार्गदर्शक सूचना केल्या आहेत. त्यात दंत चिकित्सालयात कोरोनावाढीची शक्यता जास्त असते, असेही त्यांच्या लक्षात आले आहे. एकतर दंतवैद्य रुग्णाच्या अगदी जवळ राहून उपचार करतो. यावेळी त्यांना नाक, तोंड, दात यातील अंतर जवळ ठेवावे लागते. त्यावेळी एकमेकांना संसर्ग होण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे दोन्ही संघटनांनी जगभरात सुरुवातीला सांगितले होते की दंतवैद्यांनी काम काहीकाळ बंद ठेवावे आणि या अशाच मार्गदर्शक सूचना आपल्या डेण्टल काऊन्सिल ऑफ इंडियाने दिल्या होत्या. त्यांना सुरुवातीला काम करण्याची परवानगी नव्हती. पण आता दंतवैद्यांनी योग्य ती काळजी घेऊन दवाखाने सुरू केले आहेत. त्यात सर्वसामान्य लोकही कोरोनासोबत जगायला शिकले आहेत. सुरुवातीला जी सर्वसामान्यांमध्ये भीती होती त्याचे प्रमाण आता कमी झाले आहे. बाहेर पडताना काय काळजी घ्यायला हवी, स्वच्छता कशी राखली पाहिजे हे सगळ्यांच्याच लक्षात आले आहे आणि याचा फायदा आपल्याला पुढेही नक्कीच होईल. दुसरी गोष्ट म्हणजे दात साफ करण्यासाठी दातांवर द्रवपदार्थाचा बारीक फवारा मारण्यासाठी एअर वॉटर, एक स्टेलर वापरला जातो आणि त्या यंत्रातून सातत्याने फोर्सने पाणी येते. फोर्सने पाणी आल्यामुळे त्यावर काम करताना दात दुखत नाही. जिवंत दात असेल तर रुग्णाला संवेदनशीलता होऊ नये म्हणून हे एअरसोस वापरणं गरजेचे असतं.

पेनकिलर कितपत सुरक्षित?

सातत्याने पेनकिलर घेणं ही एक जगभरातील समस्या आहे. याला सेल्फ मेडिकेशन म्हटलं जातं. काही लोकं फार्मसिस्टकडे जाऊन दातदुखीची गोळी घेतात तर काही शिकलेले लोक गुगल करून दातदुखीसाठी औषध सर्च करतात. हा जो प्रकार आहे तो धोकादायक आहे. कुठलेही औषध घेतल्यावर त्याचे दुष्परिणाम हे असतातच. परंतु ज्यावेळेला डॉक्टरांच्या सल्ल्याने आपण तो डोस घेतो त्यापद्धतीने औषध घेतली तर साइड इफेक्ट कमी होतात किंवा होतही नाहीत. एवढेच नाही तर अन्य कारणांसाठीही पेनकिलर घेतल्या जातात. त्यात गुंगीचे औषध असते. अशा औषधांमध्ये छोटे छोटे केमिकल असतात त्याचा अतिरेक केल्यास आपल्या शरीरावर दुष्परिणाम होतो. काहीजण पेनकिलर घेतात आणि त्यासोबत ऍण्टिबायोटिक घेतात. कोणतेही औषध डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेणं आणि ते जास्त वेळ घेणं हे फार चुकीचे आहे.

अपघातात त्या दाताला दुखापत झाली तर तो अत्यावश्यक उपचार आहे. दाताला लागलं, तोंडाजवळचा मांसल भाग आहे त्याला लागलं, जिभेला लागलं, जबडय़ाचे स्थायू आहेत त्याला इजा झाली तर त्यांनी डॉक्टरांकडे जाणे गरजेचे आहे.

डेण्टल पल्पला जर इजा झाली तर त्याचं दुखणं सहन करणे अशक्य होऊन जाते. त्या वेदना असह्य होतात. त्याला पल्पायटिस बोलले जाते. त्याला दाताचे हृदय म्हटले जाते. कारण त्याच्यामुळे दाताला जिवंतपणा येतो आणि त्याच्या मुळामध्ये जी जागा असते कॅनल त्याच्या आतमध्ये रक्तवाहिन्या आहेत, रोगप्रतिबंधक शक्ती निर्माण करण्याच्या पेशी आहेत. त्या पल्पला त्रास झाला की असह्य होऊन जातं. तेव्हा डॉक्टरकडे जायला हवे. त्याला रूट कॅनल केल्यावर आराम मिळतो.

कधीकधी दाढ सुजते त्याला ऍप्सेस म्हटले जाते. हिरडय़ांना सूज येणे त्यात रुग्णाला तोंड उघडता येत नाही, त्याला वेदना होतातच पण त्याला तोंडाची स्वच्छता देखील करता येत नाही अशापद्धतीची सूज असते त्याला पेरिअपायकल ऍप्सेस असे म्हटले जाते. यावेळी डॉक्टरकडे जावे लागते.

अक्कल दाढ येत असताना ती वाकडीतिकडी येते. आणि ती येत असताना बहुतेक त्यावेळी रुग्णाला फार त्रास होतो. तेव्हा नेमकं काय दुखतं ते कळत नाही. अशा वेळी दवाखान्यात जाणं गरजेचे आहे.

दातांची काळजी

  • दातांचे प्रमुख रोग आहेत सर्वसाधारणपणे दंतक्षय, हिरडय़ांचे रोग. हे दोन रोग साठ ते सत्तर टक्के लोकांमध्ये आढळतात आणि जर आपण या रोगाची कारणं बघितली तर त्याचे महत्त्वाचे कारण आहे आपण तोंडाची स्वच्छता ठेवत नाही. म्हणजेच ज्या वेळेला काही खाता त्या वेळेला चूळ भरणं गरजेचे आहे. दातावर जे काही पदार्थ चिकटले जातात ते निघून दात स्वच्छ होतात.
  • दात दिवसातून दोन वेळा स्वच्छ करा. सकाळी उठल्यानंतर, रात्री झोपण्याआधी.
  • दोन दातांच्या मध्ये बऱयाच वेळेला अन्नकण अडकतात, त्याच्यामध्ये काडय़ा न घालता टूथपिक वापरावे. हे वापरताना हिरडय़ांना इजा होणार नाही याची काळजी घ्या. तसेच बाजारात डेण्टल फ्लॉस विकला जातो. तो दोरा आहे. त्याचा वापर दोन दातांमधली जागा साफ करण्यासाठी करावा.
  • तोंड स्वच्छ ठेवण्यासाठी माऊथ वॉश मिळतात. ही द्रवे वापरा किंवा मिठाच्या पाण्याने गुळण्या केल्या तरी चालेल.
  • बहुतांश दातांचे आजार खाण्याच्या चुकीच्या सवयींमुळे होतात. चॉकलेट, आयक्रीम, कोल्डिंक, जंक फूड यात रिफाईंड कार्बोहायड्रेड असतात. त्याने दात खराब होऊ शकतात. त्यामुळे असे पदार्थ शक्यतो टाळा आणि टाळता येत नसल्यास खाल्ल्यानंतर दात स्वच्छ करा. खाल्लं तर काळजी घ्यावी
  • दूध, अंडी, पालेभाजी, फळं हे खाणं चांगलं आहे.
  • अशा सवयी लावल्यास नव्वद टक्के दातांचे रोग होणार नाहीत.
आपली प्रतिक्रिया द्या