आगळं वेगळं – शांत झोपेसाठी चहा!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
फाईल फोटो

>> मंगल गोगटे

फक्त आपल्याकडेच नाही तर गेल्या 4000 वर्षांपासून जगात लोक घरोघरी चहा पित आहेत. पाण्यानंतर सगळ्यात आवडतं पेय आहे चहा. त्यातही सर्वात जास्त आवडणारा प्रकार म्हणजे ‘हर्बल’ चहा. कारण वैज्ञानिकदृष्टय़ा असं सिद्ध झालं आहे की हा चहा प्यायल्याने आपले चिंतांबद्दलचे विचार कमी होतात आणि म्हणून झोप चांगली लागते.

आपल्याकडे अनेक जणांना सकाळी उठलं की गरमागरम चहा हवा असतो. अनेकजण भुकेला पर्याय म्हणून दिवसभर चहा पित असतात. पाहुणचारासाठी चहा. झोप उडण्यासाठी चहा. ताजंतवानं होण्यासाठी चहा. आल्याचा चहा. मसाला चहा. चहाने दिवस भरून आणि भारून गेलेला असतो. मोठय़ा हॉटेलांपासून ते टपरीपर्यंत सगळीकडे चहा उपलब्ध असतो.

झोप येण्यास मदत करणारा हर्बल हा फक्त एकच चहा नाही तर इतर अनेक प्रकारचे चहा आहेत आणि काही तर हर्बल पेक्षाही जास्त परिणामकारक, असे चहा जगात उपलब्ध आहेत. आपण आज काही अशा प्रकारच्या चहांची ओळख करून घेणार आहोत, जे झोपेचा दर्जा व गुणवत्ता सुधारतात.

सगळ्यात उत्तम म्हणजे कॅमोमाईल चहा. वर्षानुवर्षं, एक नैसर्गिक व सुरक्षित उपाय म्हणून हा चहा शरीराची सूज व मनातील चिंता कमी करण्यासाठी उपयोगी आहे. तो वेदनाशामकही आहे आणि शिवाय तो निद्रानाशावरचा उपचार समजला जातो. त्वचा रोगांपासून ते हृदय रोगापर्यंत अनेक रोगांवर कॅमोमाईल ही वनौषधी परिणामकारक मानली जाते.

कॅमोमाईल ही एक प्रकारची फुलं आहेत. यांचेही दोन प्रकार आहेत. जर्मन (matricaria recutita) आणि रोमन (chamaemelum nobile). ही फुलं उन्हात वाळवून कुस्करली जातात आणि मग ती एका बरणीत हवाबंद करून ठेवली जातात. नंतर केव्हाही यातील काही उकळत्या पाण्यात टाकली की झाला चहा तयार. छान परिणामासाठी, झोपण्यापूर्वी सुमारे 30 मिनिटं अगोदर हा चहा घ्यावा.

आजकाल ‘ग्रीन टी’चं खूप फॅड निघालंय. अर्थात ते प्रामुख्याने वजन कमी करण्यासाठी. तांत्रिक दृष्टय़ा या चहा प्रकारात सेंचा ते जस्मिन ते ऊलाँग असे अनेक चहा मोडतात. आपल्या ‘बीट टू इट – द न्यू सायन्स ऑफ हाऊ युवर बॉडी कॅन हील इट सेल्फ़’ या पुस्तकात जगप्रसिद्ध डॉक्टर आणि संशोधक विल्यम लु यांनी हा चहा आरोग्यविषयक अशा अनेक आश्चर्यजनक फायद्यांनी कसा ओतप्रोत भरलेला आहे याचं वर्णन केलं आहे. हा चहा ऍण्टी–ऑक्सिडंट आहे. तसेच सूज, अपायकारक कॅन्सरजन्य वाढ, रक्तदाब आणि रक्तातील लिपीड कमी करणारा असा आहे. एवढे फायदे तर आहेतच शिवाय याच्या सेवनाने छानशी झोपही लागते.

जपानमधल्या एका अभ्यासात असं आढळून आलं की दिवसात कमी कॅफीनचा तीन-चार कप चहा प्यायला तर थकवा व ताण तर कमी होतोच शिवाय चांगली झोपही लागते.

वॅलेरीयन चहा एका वनस्पतीपासून बनवला जातो. हा एक मवाळ उपशामक (sedative) आहे. हा चहा या वनस्पतीच्या मुळांपासून वा पानांपासून बनवला जातो. ज्यांना झोप लागण्यासाठी कष्ट करावे लागतात वा अखंड झोप लागत नाही अशांसाठी हा चहा अगदी योग्य आहे. ‘वॅलेरीयन’ या वनस्पतीला उन्हाळ्यात गोड वासाची लहान गुलाबी वा पांढरी फुलं येतात. या फुलांवर कायम माशा घोंघावत असतात. चहा बनवण्यासाठी वाळलेल्या मुळांच्या एक मोठा चमचा पावडरवर एक कप उकळतं पाणी घालावं व हा तयार चहा झोपण्याआधी 30 मिनिटं ते 2 तास घ्यावा.

ज्याला निद्रानाशाचा रोग जडला आहे अशांसाठी पेपरमिंट चहा अगदी रामबाण उपाय आहे. लेमन बाम चहा हा याच नावाच्या वनस्पतीपासून बनवला जातो. याला लिंबाचा एक तीक्ष्ण वास येतो. मध्ययुगापासून या वनस्पतीचा उपयोग केला जातो आहे. गेल्या अनेक वर्षांपासून याचा उपयोग भूक सुधारणे, अपचन सावरणे, ताण कमी करणे आणि निद्रानाशावर उपाय म्हणून केला जातो.

शांत व चांगल्या झोपेसाठी पॅशन फ्लॉवर चहा हा अतिशय योग्य समजला जातो. उत्तर अमेरीकेच्या आग्नेय दिशेला या फुलांच्या वेलीचं मूळ सापडतं. हल्ली तर या वेली आपल्याकडेही दिसतात. याची फुलं म्हणजे आपल्या कृष्णकमळाचा पांढरा भाऊ.

फिजी या बेटांच्या देशाचं राष्ट्रीय पेय असलेला कावा-कावा चहादेखील निद्रानाशावरील उपाय म्हणून वापरला जातो.  ज्यांना झोपेच्या तक्रारी असतील त्यांनी यापैकी कोणताही आवडणारा चहा घेऊन पहावा. यातला कोणता चहा कोणाला जास्त आवडेल ते काय सांगावं!