
यशासारखं दुसरं काही नाही असं म्हणतात. पहिल्या बाजीरावाने हरलेली लढाई कधीच पाहिलेली नव्हती. विराटच्या संघानेही अजून या विश्वचषकात हरलेली लढाई पाहिलेली नाही. पण…
हा पण महत्त्वाचा आहे. वेस्ट इंडीजचा हा 125 धावांनी केलेला पराभव तसा सहज सोप्पाच होता. आकडेवारी कधी फार खोटं बोलत नाही; पण यशाच्या अंगावरचा जो थ्रीपीस सूट आहे तो गोलंदाजीचा आहे. आता काही ठिकाणी रफू केलेला फलंदाजीचा शर्ट मात्र त्यामुळे लपला गेलेला आहे. हे यश रुबाबदार दिसतेय ते त्या बाहेरच्या कोटामुळे. वेस्ट इंडीजच्या चांगल्या गोलंदाजीपुढे रोहित शर्मा लवकर बाद झाल्यावर आपली फलंदाजी पुन्हा अडखळली. पुन्हा एकदा त्या दोन फलंदाजांनी मधल्या फळीत भोक पडलेल्या धावांचा शर्ट रफू केला. एक होता कर्णधार विराट कोहली, दुसरा शार्पशूटर हार्दिक पांडय़ा. अरे हो, आणखीन एक गोष्ट घडली. धोनीने सुरुवात थोडी अडखळती केल्यानंतर डावाच्या शेवटच्या दोन षटकांत धोनी त्या जुन्या तरुणपणीच्या बॅटने खेळल्यासारखा वाटला.
शमी-बुमराने वेस्ट इंडियन फलंदाजीच्या भरभराटीला वावच दिला नाही. आपल्या गोलंदाजीचे डावपेच, टप्पा, दिशा इतके अचूक होते की, अधूनमधून तळपणाऱ्या विंडीजच्या फलंदाजांच्या तलवारी भंगारातल्या वाटल्या.
हिंदुस्थानी क्रिकेटरसिकांना उत्सुकता लागलेल्या हिंदुस्थान-विंडीज लढतीत कर्णधार विराट कोहलीने अपेक्षेनुसार नाणेफेक जिंकली आणि फलंदाजी स्वीकारून आपण विजयासाठी सज्ज असल्याचे स्पष्ट केले. हिंदुस्थानी संघाने टॉस जिंकून फलंदाजी घेतली. ओल्ड ट्रफोर्डवर टॉस जिंकून दुसऱ्याला फलंदाजी देणं कर्णासारख्या औदार्याचं लक्षण मानलं गेलं असतं.
चांदोबातल्या विक्रम-वेताळमधल्या विक्रमाने हट्ट सोडला नाही. तसा दौऱ्यावरच्या निवड समितीनेही तोच संघ ठेवायचा हट्ट सोडला नाही. विजयी संघ बदलताना नेहमीच त्रास होतो. वेस्ट इंडियन वेगवान गोलंदाजांनीही आपला आखूड टप्प्यावरच्या चेंडूचा सढळ वापर करण्याचा हट्ट सोडला नाही. पण वेस्ट इंडियन गोलंदाजी स्वैर नव्हती. काही उसळलेल्या चेंडूंवर चौकार मिळाले, पण किंचित आखूड टप्प्याच्या चेंडूवर त्यांना विकेटस्ही मिळाल्या.
रोहित शर्माची विकेट ही केमार रोचची होती की तिसऱ्या पंचाची हे ठरवणं कठीण आहे, पण चेंडू आत घुसला होता. इंग्लंडमध्ये बेकायदा इमिग्रंट घुसतात तसा. खेळपट्टीवरच्या पंचांनी त्याला नाबाद ठरवले होते. त्यानंतर राहुल-विराट जोडी जमली. राहुलने नेहमीप्रमाणे काही अप्रतिम फटके मारले. उदा. स्ट्रेट ड्राइव्ह, स्क्वेअर कट वगैरे. विशेषतः त्याचा एक कव्हर ड्राइव्ह क्षेत्ररक्षकांना निर्जीव खांब करून सीमापार झाला. ‘आज हा मोठी खेळी खेळेल कदाचित’ असा विचार मनात मूळ धरेपर्यंत तो खेळपट्टीवरून मुळासकट उखडला गेलेला होता. गोलंदाजाने थोडं बॅकफूटवर ठेवल्यावर मध्येच एखादा चेंडू पुढे आला की ड्राइव्हचा मोह अनावर होतो. पण होल्डरचा तो चेंडू त्याने सरळ ड्राइव्ह केला असता तर कदाचित तो फटका व्यवस्थित बसला असता. तो ऍक्रॉस खेळताना चेंडू बॅट-पॅडमधून घुसला. मुख्य म्हणजे, तोपर्यंत होल्डरने धावा रोखल्याही होत्या. कारण काहीही असो. राहुलने मोठ्या खेळीचं वचन दिलं आणि पुन्हा वचनभंग केला.
पुन्हा एकदा विराट कोहली पॅव्हेलियन नाही, तर हॉटेलातून सेट होऊन आला. त्याला लेटकटने पहिला चौकार दिला. मग त्याने काही उसळत्या चेंडूंवर व्यवस्थित बचाव केला आणि भरकटलेल्या उसळत्या चेंडूवर बचावाच्या चेंडूची किंमत वसूल केली. मोठ्या फलंदाजाचं हे लक्षण आहे. तो धावा धावतानाही समोरचा फलंदाज एक धाव पूर्ण करीपर्यंत दुसऱ्या धावेसाठी दोन यार्ड तो पुढे असतो. मंगळवारी सराव ऐच्छिक होता. फक्त चार जण आले. त्यात विराट होता. काय गरज होती? तो पूर्ण फॉर्मात आहे. कर्णधार आहे. त्याच्या विरोधात ब्र काढायची कुणाची टाप नाही. पण ज्याला परफेक्शन हवं असतं तो विश्रांती घेत नाही. आजूबाजूला विकेटस् पडत असताना तो शांतपणे खेळीची तपश्चर्या करीत राहिला. त्यादरम्यान चौथ्या क्रमांकावर विजय शंकर आला. तीन उत्कृष्ट चौकार मारले. त्यातले दोन होल्डरला होते. तोपर्यंत होल्डरने हिंदुस्थानी धावा ‘होल्ड’ केल्या होत्या. विजय शंकरच्या कव्हर ड्राइव्ह, ग्लान्स आणि ऑन ड्राइव्हमध्ये ऑनड्राइव्ह भन्नाट होता; पण तीन चांगल्या फटक्यांवर खेळी उभी राहत नाही हे त्याने लक्षात ठेवायला हवं. त्या ऑनड्राइव्हचा बदला केमार रोचने पुढे टाकलेल्या एका उत्कृष्ट आऊटस्विंगरवर घेतला. म्हणजे ‘चौथा कोण?’ हा प्रश्न अनुत्तरीत राहणार आणि केमार रोचने जाधवला परत पाठवल्यावर मधल्या फळीचे प्रश्न अजून अनुत्तरीत आहेत असं वाटतं. तोपर्यंत खेळपट्टीवर काही वेळा चेंडू थांबून यायला लागला होता; पण केमार रोचच्या गोलंदाजीला दाद द्यायला हवी. त्याने 10-0-36-3 अशी गोलंदाजी टाकताना 41 निर्धाव चेंडू टाकले. होल्डर त्याच्या एक पाऊल पुढे होता. त्याच्या दहा षटकांत दोन निर्धाव षटके होती, पण 51 चेंडूंवर त्याने एकही धाव दिलेली नव्हती. मुख्य म्हणजे, आपली दहा षटकं संपण्यापूवीं त्याने विराट कोहलीचं शतक हिरावून घेतलं. एक नेत्रदीपक ऑन ड्राइव्ह त्याने होल्डरला मारला आणि मग पुढचा पूल अत्यंत मवाळपणे यष्टिरक्षकाच्या हातात गेला. चेंडू खेळपट्टीवरून थांबून आला. कदाचित विराटच्या अपेक्षेपेक्षा खाली राहिला. विराटचाही आपल्या विकेटवर विश्वास बसेना. तो थांबला, मग स्वतःला कोसले आणि पॅव्हेलियनच्या दरवाजावर तो चेहऱ्यावर अविश्वसनीय भाव ठेवून उभा होता.
त्याआधी धोनीला जर ऍलेनच्या गोलंदाजीवर यष्टिचीत केलं गेलं असतं, तर हिंदुस्थानने मारलेली 7 बाद 268 ही मजलही अशक्य होती. धोनी त्यावेळी फक्त 8 वर होता. ऍलनला तो पुढे खेळला. तो फ्लाइटमध्ये फसला. तेव्हा तो बर्मिंगहॅमच्या वाटेवर आहे असं वाटलं होतं. यष्टिरक्षक पुरनला चेंडू नीट पकडणं जमलं नाही. तो चेंडू जमिनीवर पडल्यावरही तो धोनीला बाद करू शकला असता. तेही त्याच्या कुवतीबाहेर आहे असं जाणवलं. एका चेंडूवर त्याने दोनदा जीवदान दिलं. त्यानंतर धोनी त्याच्या अलीकडच्या फॉर्मनुसार खेळला. धोनीचा फटका वारंवार क्षेत्ररक्षकाकडे जाणं हे पूर्वी होत नव्हतं. धोनीने काळाची पावलं ओळखून पंडय़ाला जास्त स्ट्राइक दिला आणि पंडय़ाने नेहमीप्रमाणे फटक्यांचा कोट लावला. एक चौकार त्याला वात पेटवायला पुरतो. मग पुढचे फटाके वाजत राहतात. पंडय़ा बाद झाल्यावर धोनीने स्वतःकडे प्रमुख भूमिका घेतली आणि पूर्वी जो तो सातत्याने करायचा ते त्याने शेवटच्या दोन षटकांत केले. तीन-चार उत्तंgग फटक्यांनी त्याने त्याचा रेंगाळलेला स्ट्राइक रेट भरून काढत अर्धशतक ठोकलं. 31 ते 40 या दहा षटकांत फक्त 38 धावा कुंथणाऱ्या हिंदुस्थानी संघाने शेवटच्या दहा षटकांत 82 धावा केल्या. त्याचं क्रेडिट पंडय़ाच्या फटाक्यांच्या दुकानाला आणि धोनीच्या शेवटच्या षटकामधल्या टोलेबाजीला जातं.
हिंदुस्थानच्या डावानंतर हे टार्गेट कसं वाटतं? अजून धावा व्हायला हव्या होत्या का? वगैरे प्रश्न विंडीज फलंदाजांनी निरर्थक ठरवले. विंडीजचा संघ वणवा पेटवू शकतो किंवा स्वतः आगीत उडी मारून भस्म होतो. तो भस्म झाला. हिंदुस्थानी गोलंदाजी या स्पर्धेतली सर्वश्रेष्ठ गोलंदाजी आहे. त्याच्यासमोर वेस्ट इंडीजची ‘हौशी’ फलंदाजी तग धरू शकली नाही. फलंदाजीत बचाव करावा लागतो, भागीदारी उभी करावी लागते. एकेरी-दुहेरी धावांना महत्त्व असते. या गोष्टी या फलंदाजीच्या अभ्यासक्रमामध्ये अंतभूर्त नसल्याप्रमाणे त्यांनी फलंदाजी केली. गेलने आधी ‘वर्ल्ड कपनंतर बस्स’ अशी घोषणा केली होती. आता त्याने निवृत्ती हिंदुस्थानविरुद्धच्या ऑगस्टमधल्या कसोटीपर्यंत पुढे ढकलली आहे. मध्यंतरी त्याला हृदयाच्या अनियमित ठोक्यांचा त्रास झाला होता. एका जमान्यात त्याच्या फटक्यांनी गोलंदाजांच्या हृदयाचे ठोके बंद होते. आता तो काळ सरलाय. फलंदाजी करताना पाय हलवण्याचे कष्ट त्याने बालपणीपासून घेतले नसावेत. पण त्यावेळी त्याची बॅट वारंवार योग्यवेळी, योग्य प्रकारे हले. आता त्याला फटके मारण्यासाठी योग्य पोझिशनमध्ये येण्यापासून कसं जखडायचं ते हिंदुस्थानी गोलंदाजाना ठाऊक आहे. त्याने शमीला मारलेला पूल मिडऑनपर्यंत कसाबसा जाधवकडे गेला. वटवृक्ष उन्मळून पडला वगैरे पूर्वी वाटायचे, पण आता तसं वाटत नाही. होप, हेटमायर वगैरे मधल्या फळीत काही चांगले फलंदाज आहेत. पण त्यांनाही गाडीचा एकच गियर ठाऊक आहे. बुमरा-शमीसारखे गोलंदाज त्यांना चौथा गियर टाकू देणारच नव्हते. शमीने लागोपाठ दुसऱ्या सामन्यात विकेटस् घेऊन तो उत्तम लयीत आहे हे दाखवलं. त्याने भुवनेश्वरकुमारची आठवण येऊ दिली नाही. पण बुमरा काय किंवा शमी काय, यांना ही मॅच आव्हानात्मक वाटली नसेल. गेल नावाचं सध्या जुन्या लौकिकावर मिरवणारं आव्हान शमीने संपवलं आणि ब्रॅथवेट नावाची अधूनमधून उठणारी वावटळ अगदी पाळण्यातच बुमराने रोखली. त्याचा धोनीने घेतलेला झेल अप्रतिम होता. या सामन्यात धोनीचं यष्टिरक्षण त्याच्या लौकिकाला साजेसं झालं नाही; पण महत्त्वाच्या विकेटच्या वेळी त्याने आपलं यष्टिरक्षण उंचावलं.
फिरकी गोलंदाजी हा या वेस्ट इंडियन फलंदाजांचा लाडका विषय नाहीच. कुलदीप-चहलनेही या विषयात वेस्ट इंडीजची चांगली सुधारणा झालेली नाही हे दाखवून दिलं.
इंग्लंड हरल्यावर हिंदुस्थानी संघ वनडेतला पहिल्या क्रमांकाचा संघ झालाय. हा परफॉर्मन्स त्या क्रमांकाला साजेसा होता; पण पुढची आव्हानं यापेक्षा जास्त कठीण असणार आहेत.



























































