
बाबाजी ढमढेरे सरकार हे मराठा साम्राज्यातील एक पराक्रमी सरदार होते, ज्यांचे मूळ घराणे व वास्तव्य पुणे जिह्यातील शिरूर तालुक्यातील ऐतिहासिक तळेगाव ढमढेरे येथे होते. शिवकाळात त्यांनी हिंदवी स्वराज्यासाठी मोलाचे योगदान दिले. हिंदवी स्वराज्य निर्मितीच्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांना मोलाची साथ देणाऱया सहकाऱयांमध्ये बाबाजी ढमढेरे हे एक होते. 1677 साली शिवरायांची स्वारी दक्षिण दिग्विजयास जात असताना गोवळकोंडय़ास कुतुबशहा तानाशहा यांची भेट घेतली. या प्रसंगी विश्वासू सहकाऱयांत बाबाजी ढमढेरे होते. दिलेरखानाच्या तावडीतून संभाजीराजे स्वराज्यात सुखरूप पोहोचले तेव्हा महाराजांनी पन्हाळ्यास जाऊन युवराज संभाजींची भेट घेतली. यावेळी एक विश्वासू मार्गदर्शक आणि अंगरक्षक म्हणून शिवाजी महाराजांनी बाबाजींची नेमणूक केली होती . त्यांच्या वंशावळींनी देखील राजाराम राजेंच्या संघर्षाच्या काळात मोलाची साथ दिली. स्वराज्य स्थापनेपासून ते स्वराज्याच्या अखेरपर्यंत बाबाजी ढमढेरे आणि त्यांच्या वंशजांनी स्वराज्याचे रक्षण करण्यास मोलाचे योगदान दिले. तळेगाव ढमढेरे गावात, वेल्हे नदीच्या काठावर ऐतिहासिक वाडय़ाच्या परिसरात त्यांची समाधी आहे.


























































