आभाळमाया – टायटन आणि ट्रायटन

<<< वैश्विक >>>

आपल्या ग्रहमालेतल्या बुध आणि शुक्र वगळता इतर सर्व ग्रहांना नैसर्गिक उपग्रह आहेत. त्यात आपल्या चंद्रापेक्षाही मोठे अनेक आहेत. त्यापैकी चार इंच व्यासाच्या आरशाच्या परावर्ती दुर्बिणीतून दिसणारे आणि गॅलिलिओ यांना जगातल्या पहिल्याच अवकाश निरीक्षणात, त्यांच्या दुर्बिणीतूनही (1609 मध्ये) दिसलेले गुरू या नावाप्रमाणेच असलेला महाग्रहाचे तीन ‘चंद्र’ आहेत. त्यांची नावं गॅनिमिड, पॅलिस्टो आणि आयो. चौथा युरोपा आपल्या चंद्रापेक्षा लहान आहे. त्याचप्रमाणे शनी ग्रहाचा ‘टायटन’ हा उपग्रह आणि नेपच्युनचा ट्रायटन हासुद्धा उपग्रह आपल्या चंद्राहून आकाराने मोठा आहे. हा गुरूचा चंद्र गॅनिमिड आणि शनीचा ‘टायटन’ तर बुध ग्रहापेक्षाही अधिक आकाराचे नैसर्गिक उपग्रह आहेत.

त्यापैकी टायटन आणि ट्रायटन यांच्याविषयी या लेखात वाचूया. कारण, सौरमालेतील सर्व उपग्रहांमध्ये या दोघांची काही खास वैशिष्ट्यं आहेत. शनीचा उपग्रह टायटन हा सर्व नैसर्गिक उपग्रहांमध्ये पृथ्वीपेक्षाही दाट वातावरण असणारा उपग्रह असून असं वातावरण आजपर्यंत इतकं दाट वातावरण आपल्याला विश्वात अन्यत्र आढळलेलं नाही. सौरमालेतील नैसर्गिक उपग्रहांपैकी केवळ सातच गोलाकार आहेत. बाकीचे ओबडधोबड खडकांसारखे दिसतात.

टायटनला ‘पृथ्वीसदृश’ उपग्रह म्हटलं जातं ते त्याच्या वातावरणामुळे आणि आपल्या चंद्राच्या दीडपट असलेल्या आकारामुळे. मात्र तो गुरूच्या गॅनिमिडपेक्षा लहान आहे. टायटन आकाराने बुध ग्रहापेक्षा मोठा दिसत असला तर त्याचे वस्तुमान (मॅस) बुधाच्या वस्तुमानाच्या तुलनेत 40 टक्केच भरतं. बुध ग्रहाची रचना घट्ट लोहपाषाणाची (आयर्नरॉक) असून टायटनवर बर्फ अधिक असल्याने त्याची घनता व सहाजिकच वस्तुमान कमी आहे.

टायटनचा शोध 1655 मध्ये डच खगोलशास्त्रज्ञ क्रिश्चियन ह्युजेन्स यांनी लावला. टायटन शनी ग्रहाभोवती 12 लाख किलोमीटर अंतरावरून परिक्रमा करतो. आपला चंद्र आपल्यापासून सरासरी 3 लाख 84 हजार किलोमीटर अंतरावर आहे. त्याच्या गाभ्यात पाषाणगोल असून त्यावर बर्फाचे अनेक थर आहेत. बर्फाखाली मात्र भरपूर अमोनियायुक्त पाणी आहे. टायटनचं वातावरण शुक्रासारखंच धूसर आणि कमी दृश्यमानतेचं (ओपेक) असल्याने त्याच्या अंतर्भागाचा अभ्यास पूर्वी नीटसा करता येत नव्हता. खगोल-तंत्रज्ञानाची प्रगती झाल्यावर ‘पॅसिनी-ह्युजेन्स’ यानाने टायटनचा जवळून वेध घेताना, त्यावरील ध्रुवीय प्रदेशात द्रवरूप हायड्रोकार्बनची तळी असल्याचंही शोधून काढलं. त्याशिवाय टायटनच्या पृष्ठभागावर क्रायोव्हाल्पॅनोसुद्धा आहेत असं लक्षात आलं. क्रायोव्हॉल्कनो म्हणजे, असा ‘ज्वालामुखी’ ज्यातून लाव्हा किंवा पाषाणरस बाहेर न पडता पाणी, अमोनिया आणि मिथेनचे फवारे उडतात.

आता, नेपच्युनचा उपग्रह ट्रायटनविषयी. हा आपल्या सूर्यमालेतला बुध ग्रहापेक्षाही मोठा असलेला आणखी एक नैसर्गिक उपग्रह. याचं वैशिष्ट्य म्हणजे नेपच्युन ग्रहाच्या स्वतःभोवती फिरण्याच्या (रोटेशनच्या) उलट गतीने (रिट्रोग्रेड) ट्रायटन फिरतो. संपूर्ण सूर्यमालेतील, नैसर्गिक उपग्रह आपापल्या जनक ग्रहांच्या गतीनुसारच फिरतात. ट्रायटन हा एकमेव अपवाद आहे. त्यामुळेच, हा उपग्रह मुळात नेपच्युनचा नसावा आणि नंतर केव्हातरी नेपच्युनपलीकडच्या ‘किपर’ नावाच्या लघुग्रह पट्ट्यातून (अॅस्टेरॉइड बेल्टमधून) नेपच्युनने, गुरुत्वाकर्षणाच्या बळावर ‘खेचून’ घेतला असावा (कॅप्चर्ड) असं म्हटलं जातं.

व्हॉएजर-2 हे यान आता तर आपली सौरमाला ओलांडून, अनेक अब्ज किलोमीटरचा प्रवास करत, आंतरतारकीय (इन्टरस्टेलर) अवकाशात प्रवेश करतंय. त्यानेच ट्रायटनवरील क्रायोव्हॉल्पॅनिक ऑक्टिव्हिटी आणि त्यातून उसळणारे बर्फाळ फवारे (गीझर) प्रथमतः न्याहाळले. ट्रायटनचा शोध इंग्लीश खगोलशास्त्रज्ञ विल्यम लेसल यांनी 10 ऑक्टोबर 1846 मध्ये लावला. आश्चर्यकारक गोष्ट अशी की, स्वतः नेपच्युनचा शोधच ट्रायटनच्या शोधाच्या केवळ 15 दिवस आधी लागला होता!

नेपच्युन ग्रहाला एकूण 16 चंद्र आहेत. ट्रायटन तर त्याच्याभोवती उलट गतीने फिरतो, पण ‘नेरिड’ नावाचा उपग्रह अनियमित वेगानेही फिरतो. बाकीचे मात्र नियमित गतीने भ्रमण करतात. नेरिदचा शोध जेरार्ड किपर यांनी 1949 मध्ये लावला. त्याच्या नेपच्युनभोवतीच्या गतीच्या अनियमिततेचं कारण म्हणजे तो त्यापासून सरासरी 55 लाख किलोमीटर अंतरावरून दीर्घ लंबवर्तुळाकार कक्षेत फिरतो. त्यामुळे तो नेपच्युनजवळ येताना 13 लाख 80 हजार 500 तर, दूर जातो तेव्हा तब्बल 9 कोटी 62 लाख किलोमीटरवर पोचतो!

अशा प्रकारचे दोन विचित्र वागणुकीचे उपग्रह असलेला नेपच्युन ग्रहमालेतला शेवटचा ग्रह आहे. कारण त्यापलीकडच्या ‘प्लूटो’चं ग्रहपद 2004 मध्ये जाऊन तो आता बुटका ग्रह (ड्वार्क प्लॅनेट) म्हणून घोषित झाला आहे.

[email protected]