साय-फाय- भूमिगत शहरांच्या दिशेने

>>प्रसाद ताम्हणकर

तुर्कस्तान हा देश सध्या तिथल्या निवडणूक निकालांमुळे चर्चेत आहे, तसाच तो सध्या आणखी एका कारणाने चर्चेत आहे आणि ते कारण म्हणजे मध्य तुर्कस्तानमध्ये 5000 चौरस किलोमीटर पसरलेला एक सुंदर परिसर आणि त्या परिसरात जमिनीखाली 85 मीटरवर वसलेले डेरेनकुयू शहर. या शहराची चर्चा सुरू होण्याचे कारण एकदम खास आहे. सध्या जगाच्या लोकसंख्येपैकी अर्ध्यापेक्षा जास्त लोक हे शहरी भागात वास्तव्य करतात. येत्या 25 वर्षांत शहरांमध्ये वस्ती करणाऱया लोकांची संख्या दोन तृतीयांश इतकी वाढेल असा अंदाज संयुक्त राष्ट्रांनी व्यक्त केलेला आहे.

या अंदाजाचा स्पष्ट अर्थ म्हणजे 2050 साली 10 पैकी प्रत्येकी 7 लोक हे शहरात राहत असतील. आशिया आणि आफ्रिका इथे आर्थिक विकास आणि लोकसंख्यावाढ जोमाने होत आहे. अशा वेळी हा शहरीकरणाचा वेग तिथे सर्वाधिक असणार आहे. वाढती लोकसंख्या आणि बदलत्या हवामानामुळे उष्णतेनेदेखील कमालीची वाढ होत जाईल. ही उष्णता सहन करणे शारीरिकदृष्टय़ा कठीण असेल आणि ते खिशालादेखील परवडणारे नसेल. या उष्णतेमुळे इमारती, निवासी जागा या थंड ठेवण्यासाठी ऊर्जेचा वापर प्रचंड वाढेल आणि त्यामुळे कार्बन उत्सर्जनदेखील वाढेल. यावर उपाय म्हणून भविष्यात शहरांचा विस्तार जमिनीवर न करता जमिनीच्या खाली करण्यासंदर्भात शास्त्रज्ञ गांभीर्याने विचार करीत आहेत.

जमिनीच्या खाली शहरांचा विस्तार करण्याच्या योजनेवर विचार सुरू झाल्यानंतर तुर्कस्तानमधील डेरिनकुयू, ऑस्ट्रेलियातील कूबर पेडी अशा पूर्वजांनी शेकडो वर्षांपूर्वी वसवलेल्या भूमिगत शहरांची चर्चा होणे आणि त्यांचा अभ्यास केला जाणे हे ओघाने आले. तुर्कस्तानमधील डेरिनकुयू परिसरात शंकूच्या आकाराच्या अनेक दगडांच्या राशी दृष्टीस पडतात. ज्वालामुखीच्या उद्रेकातून बाहेर पडलेल्या राखेने हे आकार तयार झाले आहेत. या राशींशेजारी बांधण्यात आलेले काही दरवाजे दिसतात. हे दरवाजे तुम्हाला जमिनीखाली उभारलेल्या खोल्या, बोगद्यांचे एक विशाल विश्व आणि या बोगद्यांना जोडणाऱया मार्गांच्या एका अद्भुत जगात घेऊन जातात. या बोगद्यांचा वापर शत्रूपासून लपण्यासाठी शेकडो वर्षांपासून केला जात आहे. हे दरवाजे गोलाकार दगडांनी बंद केले जात असत, जे शत्रूला बाहेरून उघडणे अशक्य असे.

ही काही कायमस्वरूपी वसाहत होती असे काही संशोधकांना वाटत नाही. त्यांच्या मते ज्या वेळी जमिनीवर युद्ध सुरू होत असे, त्या वेळी अनेक लोक सुरक्षेसाठी या स्थानाचा आसरा घेत असत व इथे दीर्घकाळ वास्तव्य करत असत. युद्धाचा धोका नाहीसा झाला की, ते पुन्हा जमिनीवर आपले वास्तव्य सुरू करत असत. विशेष म्हणजे या भूमिगत निवासांमध्ये विहिरी, उजेडासाठी मातीच्या दिव्यांची व्यवस्था, गुराढोरांसाठी तबेलेदेखील होते. शत्रूबरोबर हिंस्र प्राणी अथवा हवामानाच्या धोक्यांपासून वाचण्यासाठीदेखील इथे आश्रय घेतला जात असावा असा अंदाज आहे.

ऑस्ट्रेलियातील कूबर पेडी हादेखील असाच 100 वर्षांपूर्वी वसलेला भूमिगत प्रदेश. 100 वर्षांपूर्वी इथे ओपल हा मौल्यवान दगड मिळवण्यासाठी खाणकाम सुरू करण्यात आले होते. इथल्या प्रखर उष्णतेपासून बचावासाठी लोकांनी मग जमिनीखाली एक छोटेसे शहर वसवले. आज इथे 1500 रहिवासी राहतात. इथे हे लोक दुकाने चालवतात, तिथे खरेदीलादेखील गर्दी असते. इथे प्रार्थनेसाठी भूमिगत चर्चदेखील आहे. स्थानिक लोक या परिसराला डग आऊट म्हणतात. उन्हाळ्याच्या दिवसांत कूबर पेडी परिसराचे तापमान 40 अंशावर पोहोचते. मात्र भूमिगत शहरातील तापमान हे वर्षभर 20 अंशाच्या आसपास असते. त्यामुळे कूबर पेडीच्या एकूण लोकसंख्येच्या दोन तृतीयांश लोक हे वर्षभर जमिनीखाली निवास करतात.

हवामानातील तीव्र बदलामुळे भविष्यात पूर आणि आगीच्या घटनांमध्ये मोठय़ा प्रमाणावर वाढ होण्याचा अंदाज संशोधक व्यक्त करीत आहेत. जोडीला वातावरणातील उष्णतादेखील प्रचंड वाढणार आहे. अशा वेळी लोक भूमिगत निवासाच्या पर्यायाचा आनंदाने स्वीकार करतील असे मत संशोधक आणि आर्किटेक्ट व्यक्त करीत आहेत. येणाऱया काळाची गरज म्हणून अशा निवासस्थानांकडे बघण्याचे आवाहन ते करीत आहेत.

n [email protected]