
>> द्वारकानाथ संझगिरी
पृथ्वीच्या पाठीवर छोटी टुमदार शहरं, ज्यांचा उल्लेख आपण ‘टाऊन’ असा करतो, अशी अनेक आहेत. काही ठिकाणी निसर्ग इतका भरजरी आहे की, परमेश्वराची ती एकेकाळची रिसॉर्टस् वाटतात. मानवाच्या निर्मितीनंतर ती त्याने मानवाला देऊन टाकली.
त्यातली परमेश्वराची दोन रिसॉर्टस् मी क्वीन्स टाऊन शहराच्या कुशीतच पाहिली. एक ऍरोटाऊन, दुसरं ग्लेनॉर्की. ऍरोटाऊन पाच सहा रस्त्यांचं शहर असेल. जास्तीत जास्त आमच्या दादर पश्चिम एवढं. पण डोळे कॅमेऱयाप्रमाणे क्षणाक्षणाला फोटो काढत असतात. थांबावंसं वाटतच नाही. क्षणात ते फोटो मनाच्या अल्बममध्ये चिकटवले जातात. आता लिहितानाही मी तो अल्बम चाळतोय आणि मनाने ऍरोटाऊनमध्ये फिरून येतोय.
हे शहर ऍरोनदीवर वसलंय म्हणून ते ऍरोटाऊन. 1862 च्या सुमारास ऍरो नदीत ‘सोनं’ सापडलं म्हणून ते वसलं गेलं. त्याचं पहिलं नाव होतं, ‘‘फॉक्स’’. कारण विल्यम फॉक्सने प्रथम तिथे सोनं शोधलं. पण लगेचच त्या शहराने नदीचं नाव स्वीकारलं. सुरुवातीला एक हजार खाणीत काम करणारी माणसं इथं होती. ती लोकसंख्या थेट सात हजार झाली. त्यात युरोपियन्स आणि चिनी होते. पुढे सोन्यासाठी धडपड संपली आणि लोकसंख्या रोडावली. किती कमी व्हावी? 1960 साली दोनशेपेक्षा कमी माणसं ऍरोटाऊनमध्ये राहत. शिवाजीपार्कला संध्याकाळी चालताना भेटणारी माणसं मोजली तरी 200 पेक्षा जास्त भरतील. आता तिथे दोन हजारच्या वर माणसं आहेत. पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी एक शाळा आहे. शाळेत पाचशे विद्यार्थी आहेत. माणसं वाढली तरी शहराचं रूपडं बदलणार नाही, हे तिथली नगरपालिका पाहते. नव्या प्रत्येक घराचं सौंदर्य न्याहाळून घराला परवानगी मिळते. इतक्या काटेकोरपणे विजय मल्ल्यानेसुद्धा किंगफिशरसाठी हवाईसुंदरींची निवड केली नसेल. त्यामुळे सर्व घरं सौंदर्य स्पर्धेत मांडल्यासारखी दिसतात. पूर्वी युरोपियन आणि चिनी इमीग्रंटर राहात ती घरेही आज ‘‘अजून यौवनात मी’’ म्हणू शकतील.
ग्लॅनोर्की हे क्वीन्सटाऊन उपनगरच म्हणायला हवं. नगर नाही ते गाव आहे. कसं काय नगर म्हणणार त्याला? तिथे फक्त 363 माणसं राहतात. 2006 च्या सेन्ससनंतर तिथे तब्बल 96 माणसं वाढली. (ग्लॅनोर्की जाऊ देत पण अख्ख्या न्यूझीलंडने ‘गर्दी’ ही गोष्ट कधी पाहिली नसावी.) तिथे दोन पब्ज आहेत. पाश्चिमात्य संस्कृतीत पब नसलेलं गाव सापडणं कठीण! एक कॅफे आहे. आम्ही तिथे गेलो तेव्हा तो गिऱ्हाईकांनी भरलेला होता. आम्हाला हवं असलेलं फार अन्न शिल्लक नव्हतं. एक कॅफे किती पर्यटकांना पुरणार? तिथे अजून शेट्टी, पंजाबी, गुजराती दुकानदार कसा पोहोचला नाही? ही दुकानं पर्यटकांसाठीच आहेत. पण एक वैभव पहा. एक बोटीसाठी जेट्टी आहे आणि विमान उतरवण्यासाठी एअरस्ट्रीप! कारण नैसर्गिक सौंदर्याच्या बाबतीत क्वीन्स टाऊन ही ऐश्वर्या राय असेल तर ग्लॅनोर्की हे त्या ऐश्वर्याचे डोळे आहेत. निळं पाणी, निळं आकाश, डोंगर, त्या डोंगरांच्या माथ्यावरचा बर्फ, मध्येच मयूरपंखी किंवा हिरवं दिसणारं पाणी हे आम्ही दंश करणाऱ्या थंडीत थक्क होऊन पाहात होतो.
मुळात क्वीन्सटाऊनहून ग्लॅनोर्कीला जाणे हा आनंदाने काठोकाठ भरलेला रस्ता आहे. क्वीन्सटाऊन शहरापासून थोडी नागमोडी वळणं घेत तो ग्लॅनोर्कीला जातो. ते पंचेचाळीस किलोमीटर्सचं अंतर संपूच नये असं वाटतं. डावीकडे सतत वाकाटिपू तलावाचं रंग बदलणारं पाणी, त्यातून जाणाऱया बोटी, उजवीकडे हिरवागार डोंगर, अधूनमधून डोंगरावरून घर डोकावून आपल्याकडे पाहातायत असं वाटतं. त्या पंचेचाळीस मिनिटांत अनेक उद्गारवाचक चिन्हं आपल्या तोंडातून बाहेर पडतात. तुम्हाला गाडीने जायचं नसेल तर तुम्ही बोटीने खरंतर लाँचने जाऊ शकता. लाँच त्या ग्लॅनोर्कीच्या जेट्टीला जाऊन लागते. लाँचने कदाचित जास्त मजा येत असेल. कारण तुम्ही पाण्यातच असता. आम्ही तिथे निघालो होतो तेव्हा पाऊस येण्याची शक्यता वर्तवली होती. त्या 45 किलोमीटर्सच्या प्रवासात पाऊस आणि काळे ढग धमकी देत होते. पण त्या तलावाच्या पाण्यावर जिथे ऊन पडायचं तिथे पाणी वेगळं दिसायचं आणि आकाशात सावळे ढग आले की पाणी रंग बदलायचं. सरडाच रंग बदलतो असं नाही. राजकारणीच रंग बदलतो असं नाही. पाणीसुद्धा रंग बदलतं. पण तो रंगबदल हवाहवासा वाटतो. आम्ही ग्लॅनोर्कीला पोहोचलो आणि पाऊस रिमझिमला. नुसत्या रिमझिमणाऱया पावसाने हवा भयंकर थंड केली. त्यात वाऱयाला आपली ताकद दाखवायची लहर आली. दोन स्वेटर, एक जर्किनसुद्धा थंडीशी झुंज देऊ शकत नव्हते. माझ्या दोन नातवांना लोकरीत गुंडाळून आम्ही जेट्टीवर फेरफटका मारून आलो. हवेतली शुद्धता अशी असते की, शरीराचं तुम्ही नीट संरक्षण केल्यावर सर्दीची आठवण देणारीही शिंक तुम्हाला येत नाही. मग तुम्ही थंड बियर घ्या किंवा आणि काही.
अजून न्यूझीलंडला खूप पहायचंय. तिनदा तिथे गेलो, पण समाधान होत नाही. आणखी काय पाहायचं याची यादी वाढत जाते. आपण वेड लावणाऱया निसर्गाच्या बाहुपाशात जेव्हा असतो तेव्हा एक गोष्ट मनावर ठसत जाते की, हे सौंदर्य अचानक एका अपघाताने निर्माण झालं? याचा निर्माता कुणी नाही? याची आखणी कुणी केली नाही? अशक्य! कुठलीतरी शक्ती असावी. तिने या सौंदर्याची कल्पना करून निर्मिती केली असेल.
मी सश्रद्ध आहेच. पण हा निसर्ग, हे सौंदर्य हे त्या परमेश्वराचं अस्तित्व मनावर ठसवत जातं. विश्वास वाढवतं.




























































