लेख – अनियंत्रित चिनी रॉकेटसचे संभाव्य धोके!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> कर्नल अभय बा. पटवर्धन (निवृत्त)  

चीन अंतरिक्ष स्थानकांना अंतरिक्षात पोहोचविणाऱया रॉकेटच्या परतण्यामध्ये कंट्रोल्ड रीएंट्री प्रणालीचा वापर करू शकतो. पण तसा वापर करताना आता अनियंत्रित होऊन कोसळलेल्या ‘लाँग मार्च 5 बी’ रॉकेटचे महाकाय अवशेष किंवा त्यापेक्षा जास्त वजनी रॉकेटचे अवशेष हिंदुस्थानच्या सामरिक/आर्थिक मर्मस्थानांवर पाडण्याचा कावेबाज विचारदेखील करू शकतो हे विसरून चालणार नाही. संसद भवन, अप्सरा आण्विक प्रकल्प, मुंबईसारखी आर्थिक राजधानी किंवा इतर कोणत्याही मर्मस्थानावर अवशेषांचा एवढा अवजड डोंगर अकस्मात कोसळला तर काय होईल, याच्या नुसत्या कल्पनेने थरकाप होतो.

चीनने आपल्या 22 मेट्रिक टन वजनाच्या तियानहे (हेवनली     हार्मनी) या अंतरिक्ष स्थानकाला (स्पेस स्टेशन) अंतरिक्षात पाठवून आपल्या अंतरिक्ष संशोधन प्रकल्पातला मोठा पल्ला गाठला. या स्थानकाला अंतरिक्षात नेणारे रॉकेट 100 फूट लांब आणि 16 फूट गोल होते. हे अंतरिक्ष स्थानक सात किलोमीटर प्रतिसेकंद वेगाने 90 मिनिटांमध्ये एक पृथ्वी प्रदक्षिणा करत होते. शिकागो, रोम, न्यूयॉर्क, माद्रिद, बीजिंगच्या उत्तरेपासून ते चिली, वेलिंग्टनच्या (न्यूझीलँड), तास्मानियाच्या दक्षिणेपर्यंतचा परीघ हा हे स्थानक आणि त्याच्या ध्वस्त रॉकेटच्या प्रदक्षिणेचा परवलय मार्ग (पॅराबोला रूट) होता. या रॉकेटची गती माहिती असली तरी स्थानकापासून वेगळे (डिटॅच्ड) झालेले रॉकेट पृथ्वीवर केव्हा कोसळेल याची नक्की कल्पना जगातील अंतरिक्ष शास्त्रज्ञांनाही नव्हती. अखेर ते रविवारी हिंदी महासागरात कोसळले आणि जगाने सुटकेचा निःश्वास सोडला.

चीन उभारत असलेल्या अंतरिक्ष स्थानकात तीन अंतराळ यात्री (ऍस्ट्रोनॉट्स) राहू शकतील. कंट्रोल सेंटर, पावर सप्लाय सिस्टीम, प्रॉपल्शन आणि लाईफ सपोर्ट सिस्टीम्स असलेले हे अंतरिक्ष स्थानक, लाँग मार्च 5-बी या हेवी लिफ्ट रॉकेटद्वारे चीनच्या वेनचांग स्पेस पोर्टवरून अवकाशात पाठवण्यात आले. चिनी प्रसारमाध्यमांनुसार 490 सेकंदांच्या सरळ उड्डाणानंतर हे अंतरिक्ष स्थानक क्षेपणास्त्राच्या पहिल्या स्तरापासून (फर्स्ट स्टेज ऑफ रॉकेट) विभक्त झाले आणि एक तासानंतर त्याची सूर्यऊर्जा प्रणाली (सोलर ऍरेज) कार्यरत झाली. 4 मे 2021ला हे स्थानक पृथ्वीपासून 370 किलोमीटर उंचीवर स्थानापन्न झाले. यापुढे चीन, ऍस्ट्रॉनॉमी, स्पेस मेडिसीन, बायोटेक्नॉलॉजी, मायक्रोग्रॅव्हिटी, फ्ल्युईड फिजिक्स, हबल क्लास शुंशियन ऑप्टिकल टेलिस्कोप्स आणि स्पेस टेक्नॉलॉजीच्या संशोधन सुविधा असणारे दोन स्वयंपूर्ण भाग (मॉडय़ुल्स) या स्थानकाला जोडण्यासाठी आगामी सहा महिन्यांत अंतरिक्षात पाठवेल. हे स्वयंपूर्ण भाग सांप्रत स्थानकाला जोडल्यावर तेथे चीनची 66 टन वजनी थ्री मॉडय़ूल ऑर्बिटल आऊट पोस्ट तयार होईल. चीन 1990पासून या अभियानाची तयारी करतो आहे. पुढील दोन वर्षांत चीन असे 11 अंतरिक्ष उड्डाण प्रकल्प अमलात आणून अमेरिका व रशियाचे वर्चस्व असलेल्या इंटरनॅशनल स्पेस स्टेशनचा अभिन्न हिस्सा बनेल.

 याच अंतराळ कार्यक्रमाचा एक भाग असलेले लाँग मार्च 5-बी रॉकेट 30 मीटर लांब होते. चिनी अंतरिक्ष स्थानक तियानहे यास पृथ्वीच्या लघू परिभ्रमण कक्षात (लो अर्थ ऑर्बिट) स्थानापन्न केल्यावर ते त्याच्यापासून विभक्त झाले आणि आता पृथ्वीवर कोसळले. अंतरिक्ष स्थानकांना नेणारी बहुतांश क्षेपणास्त्रे त्यांच्या गती कमतरतेमुळे पृथ्वीच्या लघु परिभ्रमण कक्षापर्यंत जाऊ शकत नाहीत आणि म्हणूनच त्यांना ताब्यात ठेवून (कंट्रोल्ड एंट्री), पृथ्वीवरील विवक्षित परती क्षेत्रात (नॉन रिएंट्री झोन) आणले जाते. काही दिवस आधी अमेरिकेच्या फाल्कन-9 या सेकंड स्टेज रॉकेटनी अमेरिकेच्या सिएटलवर पृथ्वी परिघात प्रवेश केला. कंट्रोल्ड रिएंट्री असूनही त्याचे चार प्रेशर टँक्स वॉशिंग्टनवर कोसळल्यामुळे अमेरिकन प्रसारमाध्यमांमध्ये यावर मोठा ऊहापोह झाला होता.चीनचे लाँग मार्च 5-बी क्षेपणास्त्र फाल्कन-9पेक्षा सातपट जास्त वजनी होते. पृथ्वीच्या परीघ कक्षेत प्रवेश करताना त्याचे काही भाग जळून खाक झाले, पण काही न जळलेले 18 टनी अवशेष (डेब्रिज) हिंदी महासागरात कोसळले.

जेव्हा अंतरिक्षात कुठलीही गोष्ट पाठवली जाते त्या वेळी तिला विवक्षित ऑर्बिटमध्ये सोडणाऱया क्षेपणास्त्राची गती अतिवेगवान नसते आणि जेथे ती गोष्ट सोडली जाते ती उंचीदेखील खूप जास्त नसते. पण या वेळी परिस्थिती तशी नव्हती. 6 मे 21 रोजी लाँग मार्च 5-बी क्षेपणास्त्राचे अवशेष पृथ्वीपासून 250 किलोमीटर उंचीवर ताशी 27,700 किलोमीटर गतीने भ्रमण करत होते. अमेरिकन स्पेस एजन्सी या अवशेषांचा क्षणोक्षण मागोवा घेत होती.

सामान्यतः रॉकेटस् पॅराबोलिक, सबऑर्बिटल परिघात पाठवली जातात. काम संपल्यावर क्षेपणास्त्राचे फर्स्ट रॉकेट  लगेच पृथ्वीकडे झेपावते. त्यामुळे त्याचा परतीचा मार्ग व वेळ प्रतिनिश्चित करता येते. पण चीनचे लाँग मार्च 5-बी क्षेपणास्त्र तियानहे अंतरिक्ष स्थानकाबरोबर आउटर ऑर्बिटमध्ये गेले. तियानहेमध्ये स्वतःची गायडन्स सिस्टीम असल्यामुळे हाय ऑर्बिटमध्येही ते स्थिर राहू शकते. पण लाँग मार्च 5-बी या चिनी क्षेपणास्त्राचे अवशेष अस्थिर परिघात (वॉबली अनसस्टेनेबल ऑर्बिट) असल्यामुळे ते विनाताबा पृथ्वीवर पडले.

पृथ्वीभोवतालच्या वातावरणात प्रवेश करत असताना क्षेपणास्त्राचा मोठा भाग जळून खाक होतो असा आजपर्यंतचा अनुभव आहे. लाँग मार्च 5-बी क्षेपणास्त्राचे अवशेष कंट्रोल्डरीत्या पृथ्वीवर आणण्यात येतील की ते मनमर्जीने पडतील याचा खुलासा चीनने हा लेख लिहेपर्यंत केला नव्हता. अमेरिका व पाश्चात्य राष्ट्रांनी चायना नॅशनल स्पेस ऍडमिनिस्ट्रेशनकडे केलेल्या चौकशीला चीनने पाने पुसली आहेत. पण चिनी वृत्तपत्र ‘ग्लोबल टाइम्स’च्या वृत्तानुसार ज्या धातूंनी हे क्षेपणास्त्र बनलेले आहे तो धातू पृथ्वीच्या वातावरणात शिरताना आपोआप जळून गेले.

चीनचे अंतरिक्ष स्थानक पृथ्वी कक्षेबाहेर धाडले त्या दिवशी चिनी कम्युनिस्ट पार्टीचे मुखपत्र असलेल्या ‘ग्लोबल टाइम्स’ने हिंदुस्थानच्या कोरोना व्यवस्थापनावर ताशेरे झाडताना पार्टीच्या सेंट्रल पॉलिटिकल अँड लिगल अफेयर्स कमिशनच्या सायना वाइबो वेबसाईटवर चिनी अंतरिक्ष स्थानक तियानहेचे लाँच, त्याच्या अग्निज्वाळा आणि ‘हिंदुस्थानात कोविड बाधितांची संख्या रोजी चार लाख झाली आहे’ या उल्लेखासह हिंदुस्थानी स्मशान घाटातील धगधगत्या चितांचे फोटो ‘चायना लायटिंग ए फायर व्हर्सेस इंडिया लायटिंग ए फायर’ या शीर्षकाखाली दाखवले होते. मात्र असंवेदनशील बातमीचा हिंदुस्थानने तीव्र निषेध केल्यानंतर हे दोन्ही फोटो व शीर्षक त्या वेबसाईटवरून काढण्यात आले.

सर्वसाधारणपणे अंतरिक्ष स्थानक किंवा उपग्रह अंतरिक्षात पाठवताना त्यासाठी वापरण्यात येणाऱया क्षेपणास्त्राला परत पृथ्वीवर विवक्षित आणि सुरक्षित ठिकाणी उतरवण्यासाठी त्याला 180 अंशात वळता येणे व त्याच्या उतरण्याच्या वेगमर्यादेवर ताबा (डिसेंट स्पीड कंट्रोल) असणे आवश्यक असते. त्यासाठी क्षेपणास्त्रात बुस्टर किंवा स्टेबलायझेशन सिस्टीमचा अंतर्भाव करण्यात येतो. 2019/20मध्ये मिशन मार्ससाठी उपग्रह सोडताना हिंदुस्थानने हेच केले होते. पण चीनच्या लाँग मार्च 5-बी क्षेपणास्त्रात ही आधुनिक प्रणाली नसल्यामुळे त्याला अनकंट्रोल्डरीतीने पृथ्वीवर उतरणे भाग पडले. त्यामुळे बऱयाच देशांना तणाव सहन करावा लागला. तरी चीन त्याबद्दल बेपर्वा आहे. अर्थात चीनला याचा जाब विचारण्याची हिंमत अमेरिका, रशिया किंवा संयुक्त राष्ट्रसंघात नाही हे लक्षात घेतले पाहिजे.

चीन अंतरिक्ष स्थानकांना अंतरिक्षात पोहोचविणाऱया रॉकेटच्या परतण्यामध्ये कंट्रोल्ड रिएंट्री प्रणालीचा वापर करू शकतो. पण तसा वापर करताना आता अनियंत्रित होऊन कोसळलेल्या ‘लाँग मार्च 5 बी’ रॉकेटचे महाकाय अवशेष किंवा त्यापेक्षा जास्त वजनी रॉकेटचे अवशेष हिंदुस्थानच्या सामरिक/आर्थिक मर्म स्थानांवर पाडण्याचा कावेबाज विचारदेखील करू शकतो हे विसरून चालणार नाही. संसद भवन, अप्सरा आण्विक प्रकल्प, मुंबईसारखी आर्थिक राजधानी किंवा इतर कोणत्याही मर्म स्थानावर अवशेषांचा एवढा अवजड डोंगर अकस्मात कोसळला तर काय होईल याच्या नुसत्या कल्पनेने थरकाप होतो. इंडियन स्पेस कमांडनी या संभावनेचा आणि त्याला उत्तर देण्यासाठी लागणाऱया कारवाईचा विचार करण्याची नितांत आवश्यकता आहे. अंतरिक्ष ज्ञानाच्या क्षेत्रात आपण चीनच्या बरेच मागे आहोत व आपल्याला मोठी झेप घेणे आवश्यक आहे.

[email protected].