शब्दमुद्रा – चित्रपट संकलकांना ग्लॅमर आणले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> दिलीप ठाकूर

पटकथेनुसार चित्रपटाला आकार व गती देणं हे संकलकाच्या खात्रीचे कौशल्य. म्हणूनच संकलन ही अद्भुत कला आहे. वामन भोसले आणि गुरुदत्त शिराली यांनी संकलन कलेला ग्लॅमर प्राप्त करून दिले. अग्निपथ, मि. इंडिया, सौदागर, कैरी अशा अनेक चित्रपटांचा यांबाबत उल्लेख करायला हवा. सत्तर – ऐशीच्या दशकातील अनेक हिंदी चित्रपटाचे संकलक वामन भोसले यांचे नुकतेच निधन झाले.

राज कपूरचे एक वाक्य कायमच महत्त्वाचे मानले जाते. ते म्हणजे पिक्चर इज मेड ऑन टू टेबल्स, रायटिंग टेबल अँड एडिटिंग टेबल… चित्रपट संकलक वामन भोसले यांना श्रद्धांजली वाहताना ही गोष्ट सुरुवातीला आवर्जून सांगायला हवी. प्रामुख्याने सत्तर आणि ऐंशीच्या दशकातील अनेक हिंदी चित्रपटांचे यशस्वी संकलक वामन-गुरू या जोडीतील वामन भोसले यांचे 26 एप्रिल रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. तेव्हा त्यांचे वय 89 वर्षे इतके होते.

वामन भोसले व गुरुदत्त शिराली अशी ही जोडी होती. आणि तरीही त्या दोघांचे स्वतंत्र व्यक्तिमत्त्व होते आणि छान केमिस्ट्रीही जमली होती. हिंदी चित्रपटसृष्टीतील सिनेपत्रकारितेत एकाद्या चित्रपटाच्या मुहूर्ताला अथवा नटराज स्टुडिओतील मिनी थिएटरमध्ये, जुहूच्या सुमीत प्रिह्यूच्या एडिटिंग रूममध्ये वामन भोसले यांची अनेकदा भेट होई आणि मग त्यांच्या जुन्या व नवीन चित्रपटांबाबत भरपूर गप्पा होत आणि त्यातून भरपूर माहिती, किस्से मिळत. अतिशय गप्पिष्ट व्यक्तिमत्त्व असल्याने वामन भोसले यांच्याशी ऐंशीच्या दशकात पहिल्या भेटीतच आमचे चांगले सूर जुळले. गोरेगावच्या त्यांच्या घरी आमची त्यांच्या मुलाखतीसाठी पहिली भेट झाली होती. त्यांच्या हॉलमधील अनेक हिंदी चित्रपटांच्या रौप्यमहोत्सवी यशाच्या ट्रॉफी त्यांचे चित्रपट संकलनातील कसब, काwशल्य सांगत होत्याच, पण ते त्यांच्या अनेक चित्रपटांतून पडद्यावर आले. म्हणूनच त्यांना कालांतराने राज एन. सिप्पी दिग्दर्शित ‘इन्कार’ (1978) या चित्रपटासाठी संकलनाचा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला. (‘इन्कार’ हा चित्रपट उत्तम संकलनासाठी ओळखला जातो. संकलन कसे असावे यासाठी हा चित्रपट अभ्यासायला हवा इतका त्यावर संकलनाचा प्रभाव जाणवतो) तसेच ‘मामि’ चित्रपट महोत्सवात त्यांचा विशेष गौरव करण्यात आला. 2008 साली त्यांना गोव्यात हिंदुस्थानच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात आले. तर 2019 साली त्यांना महाराष्ट्र राज्य चित्रपट महोत्सवात ‘राज कपूर जीवनगौरव’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

चित्रपटाची निर्मिती प्रामुख्याने टेबलवर होते, एक म्हणजे पटकथा आणि दुसरे म्हणजे संकलक. यात पटकथा लेखक आणि संकलक यांच्याशी दिग्दर्शकाचा चांगला सूर जमायला हवा. यात आणखी एक विशेष म्हणजे व्ही. शांताराम, राज कपूर, हृषिकेश मुखर्जी, विजय आनंद हे दिग्दर्शक उत्तम संकलकही होते आणि अशाच संकलक परंपरेत वामन-गुरू या जोडीचा कायमच उल्लेख केला जातो.

संकलन म्हणजे केवळ चित्रीत झालेल्या दृश्यांवर कमी-जास्त कात्री चालवणे असे नव्हे. तर संकलक हा एक प्रकारचा दृश्य माध्यमाची भाषा आणि गती ओळखणारा दिग्दर्शकच असतो आणि याचा सकारात्मक प्रत्यय आपण वामन-गुरू यांनी आपल्या यशस्वी कारकीर्दीत दिला. विक्रम भट्ट दिग्दर्शित ‘गुलाम’मधील धावत्या लोकल ट्रेनसमोरून आमीर खानचे धावणे, गुलजार दिग्दर्शित ‘नमकीन’मधील शबाना आझमीची उंच सुळक्यावरून उडी, सुभाष घई दिग्दर्शित ‘खलनायक’मधील चोली के पीछे क्या है गाण्यातील नृत्य सौंदर्य यात वामन-गुरू जोडीची संकलक करामत दिसते.

वामन भोसले यांचे बालपण गोव्याचे. तेथील पॉमबुरपा (बार्देश) या गावात ते जन्मले आणि मयडे या छोटय़ाशा गावात शिक्षण घेऊन ते मुंबईत आले. बॉम्बे टॉकीज या त्या काळातील एका प्रतिष्ठत चित्रपट निर्मिती संस्थेत संकलक डी. एन. पै यांच्याकडे त्यांनी उमेदवारी सुरू केली. काही वर्षांतच ते गोरेगावच्या फिल्मिस्तान या निर्मिती संस्थेत आले. येथे पै यांच्या प्रोत्साहनाने त्यांची चित्रपट संकलन शिकण्याची भावना वाढीला लागली. त्या बारा वर्षांत त्यांनी ‘पडोसन’, ‘गुमनाम’, ‘वह काwन थी’, ‘पेईंग गेस्ट’, ‘वचन’, ‘नागिन’ इत्यादी अनेक चित्रपटांसाठी सहाय्यक संकलक म्हणून कामगिरी केली. या प्रवासात त्यांना एम. एस. शिंदे यांचे संकलन प्रभावीत करणारे ठरले. येथेच त्यांची ओळख गुरुदत्त शिराली यांच्याशी झाली आणि या दोघांचे सूर छानच जमले. अशातच या दोघांकडे अनेक सुपरहिट चित्रपटांचा अनुभव असलेले दिग्दर्शक राज खोसला यांनी राजेश खन्ना व मुमताज यांची भूमिका असलेल्या ‘दो रास्ते’ (1969) या काwटुंबिक रोमँटिक चित्रपटाच्या संकलनाची जबाबदारी सोपवली. पहिल्याच चित्रपटात त्यांनी आपली दृश्य माध्यमाची जाण आणि संकलनाचे कसब याचा प्रत्यय दिला. ‘दो रास्ते ’ या चित्रपटाने मुंबईत ऑपेरा हाऊस चित्रपटगृहात तब्बल पन्नास आठवडे मुक्काम करताना वामन-गुरू या जोडीच्या करीअरची पावले पुढे पडू लागली आणि मग सत्तर आणि ऐंशीच्या दशकातील आघाडीच्या निर्माते आणि दिग्दर्शकांनी आपल्या चित्रपटाच्या संकलनाची जबाबदारी या जोडीवर सोपवली. राज खोसला यांच्या ‘मेरा गाव मेरा देश’, ‘कच्चे धागे’, ‘प्रेम कहानी’, ‘दोस्ताना’, ‘मै तुलसी तेरे आंगन की’ तर पटकथा लेखनाकडून दिग्दर्शनाकडे वळलेल्या सुभाष घई यांच्या ‘कालीचरण’, ‘विश्वनाथ’, ‘हीरो’, ‘कर्ज’, ‘राम लखन’, ‘सौदागर’ इत्यादी. आपल्या दिग्दर्शनात फ्लॅशबॅक तंत्राचा अतिशय उत्तम वापर करीत प्रभावी ठरलेल्या दिग्दर्शक गुलजार यांचा ‘आंधी’, ‘कोशिश’ आणि पाश्चात्य स्टाइलने चित्रपट साकारत प्रभाव दाखवणारा राज एन. सिप्पीचा ‘इन्कार’, मुकुल आनंद दिग्दर्शित ‘अग्निपथ’, शेखर कपूर दिग्दर्शित ‘मिस्टर इंडिया’मधील अदृश्य नायक आणि त्यावरून गमती जमती… तसेच रवी टंडन, शेखर कपूर, अनिल गांगुली, अशोक गायकवाड, के. विश्वनाथ, महेश भट्ट इत्यादी अनेक नामांकित दिग्दर्शकांच्या लोकप्रिय चित्रपटांचे यशस्वी संकलक म्हणून वामन-गुरुदत्त ही जोडी चित्रपटसृष्टी आणि चित्रपट रसिकांत ओळखली गेली. मराठीत त्यांनी सीमा देव निर्मित आणि राजदत्त दिग्दर्शित ‘सर्जा’ (1987) या ऐतिहासिक चित्रपटाचे संकलन केले. तर अमोल पालेकर दिग्दर्शित ‘पैरी’ या चित्रपटानंतर त्यांनी थांबणे पसंत केले. ऐन बहरात असताना असा निर्णय घेणे सोपे नव्हते, पण चित्रपटाच्या निगेटिव्हच्या रिळांत आणि स्टीन बॅकवर काम करण्याच्या सवयीतून बाजूला होणे त्यांना योग्य वाटले. तोपर्यंत चित्रपटसृष्टीचे अनेक प्रकारचे अनुभव त्यांनी घेतले, ते इतरांना आवर्जून सांगितले. तर कधी पडद्यावर थरारक वाटावेत असे काही प्रसंग (उदा. गुलाम) त्यांच्या पैचीने खुलवले आणि आपले कार्य अधोरेखित केले. संकलन हा चित्रपटाचा प्राण असतो. ती एक अद्भुत कला आहे. आणि वामन भोसले व गुरुदत्त शिराली यांनी या संकलन कलेला ग्लॅमर प्राप्त करून दिले. या कलेचे चित्रपट माध्यमातील महत्त्व अधोरेखित केले.

(लेखक ज्येष्ठ सिने समीक्षक आहेत)
n [email protected]