लेख : ‘वंदे मातरम्’ आणि मुसलमान

97

>>बाळकृष्ण रामचंद्र पाटसकर<<

‘वंदे मातरम्’ म्हणजे मी (भारत) मातेला वंदन करतो. यात परमेश्वराबरोबर तुलना करण्याचा प्रश्न येतोच कुठे? यात इस्लामविरुद्ध काही नाही. ज्या भावनेने देवदूतांनी आदमला (मातीचा पुतळा) वंदन (सज्दा) केले त्याच भावनेने मुसलमानांनी (भारत) मातेला वंदन करावे. एवढाच अर्थ ‘वंदे मातरम’चा आहे. देशाबद्दल आदर व प्रेम असणाऱ्या प्रत्येकाने ‘वंदे मातरम्’ म्हणावे. यात कुठलाही पाखंडीपणा नाही.

‘वंदे मातरम्’ म्हणण्याला धर्मांध मुसलमानांचा कडवा विरोध आहे. त्यांचा असा आक्षेप आहे की, ‘वंदे मातरम्’मध्ये मातेची पूजा म्हणजेच भारतमातेची पूजा अभिप्रेत आहे. इस्लामच्या तत्त्वांप्रमाणे एका परमेश्वराशिवाय कोणी पूजनीय नाही. म्हणून ‘वंदे मातरम्’ला आमचा विरोध आहे असे त्यांचे प्रतिपादन आहे, पण प्रत्यक्षात हे म्हणणे पूर्णपणे चुकीचे आहे, गैरसमजुतीचे आहे.

मुळात वंदन म्हणजे केवळ धार्मिक पूजा नाही. गीर्वाण लघुकोश (1960) प्रमाणे ‘वंदन’ याचे अर्थ 1. नमस्कार. 2. स्तुती. 3. पूजा असे दिले आहेत. त्यात ‘पूजा’ याचा अर्थ अर्चा, आराधना, आदर असा दिला आहे. अर्थात वंदन करणे म्हणजे आदर व्यक्त करणे असा होतो तसेच नमस्कार करणे एवढाच होतो.

‘पूजा’चा लोकांमध्ये अर्थ मूर्ती वगैरेला स्नान घालून म्हणजे ती एक जीवित व्यक्ती आहे असे कल्पून त्याला हळद, कंकू, फुले वगैरे वाहणे असा होतो. निर्जीव मूर्तीला सजीव समजून, देव समजून तिचा आशीर्वाद मागितला जातो. तिला नवस बोलले जातात. फळाची अपेक्षा केली जाते. वास्तविक ही सर्व कामे परमेश्वराची आहेत. म्हणजे मूर्तींना परमेश्वरासमान मानले जाते. परमेश्वरच समजले जाते. जितके देव तितक्या मूर्ती. इस्लामला हे मान्य नाही. याबरोबरच झाडे, पर्वत, नद्या यांनाही देव मानले जाते. त्यांच्याकडून फळाची अपेक्षा केली जाते. इस्लामच्या तत्त्वाप्रमाणे परमेश्वर एकच आहे. ते असहनीय तेज आहे. त्याला कोणी पाहू शकत नाही. म्हणून धर्मांध मुसलमानांचा मूर्तिपूजेला विरोध आहे, तसेच कोणालाही परमेश्वरासमान समजायला विरोध आहे. या तत्त्वाप्रमाणे इतर अनेक हिंदू पंथांना ही मूर्तिपूजा मान्य नाही. उदाहरणार्थ आर्य समाज. तसेच पुष्कळ पंथ एकेश्वरवादी आहेत. ते सर्वच हिंदू आहेत, पण त्यांचा ‘वंदे मातरम्’ म्हणण्याला विरोध नाही. नमस्कारात उभ्याने हात जोडणे, कमरेत वाकून नमस्कार आणि सलाम किंवा मुजरा करणे, साष्टांग नमस्कार, दंडवत घालणे वगैरे येते. हे आपण व्यवहारात करत असतो.

मुसलमानांत यासाठी ‘सज्दा’ (‘सिज्दा’ उच्चार बरोबर नाही) आहे ‘सज्दा’ म्हणजे जमिनीला डोके टेकवून केलेला नमस्कार. उर्दू, हिंदी शब्दकोश (1948) मध्ये त्याचा अर्थ प्रणाम, नमस्कार, दंडवत असा दिला आहे. म्हणजेच वंदन. असेच अर्थ फिरोज उल लुगात (शब्दकोश) दिल्ली, उर्दू, जामा-उल-लुगान उर्दू (1934) इलाहाबादमध्येही दिले आहेत. फरहंग बुजुर्ग (2011) तेहरान-फारसी शब्दकोशामध्ये इबादत, परस्तीश असे ‘पूजा’च्या समानार्थी शब्द दिले आहेत. सज्दा शब्द मुळात अरबी आहे. अल सदीक (अरबी शब्दकोश) प्रमाणे ‘सजद’ म्हणजे कमरेत वाकणे, वंदन करणे असा अर्थ दिला आहे. थोडक्यात ‘सज्दा’ म्हणजे वंदन हा अर्थ समोर येतो.

तेव्हा ‘वंदन’ म्हणजे नमस्कार एवढाच अर्थ अभिप्रेत आहे. त्यात परमेश्वराशी बरोबरी करण्याचा कुठलाही अर्थ अभिप्रेत नाही. आपण आई-वडिलांना वंदन करतो, गुरूंना वंदन करतो, ज्येष्ठ व माननीय व्यक्तींना वंदन करतो, पण म्हणून आपण त्यांना परमेश्वराच्या बरोबरीचे किंवा परमेश्वरापेक्षा मोठे समजतो असे नाही. ‘वंदे मातरम्’ म्हणजे आईला नमस्कार. यात आक्षेपार्ह काय आहे? याच भावनेने भारतमाता समजली जाते. तिला परमेश्वर समजले जात नाही.

‘वंदे मातरम्’ म्हणजे मी (भारत) मातेला वंदन करतो. यात परमेश्वराबरोबर तुलना करण्याचा प्रश्न येतोच कुठे? यात इस्लामविरुद्ध काही नाही. ज्या भावनेने देवदूतांनी आदमला (मातीचा पुतळा) वंदन (सज्दा) केले त्याच भावनेने मुसलमानांनी (भारत) मातेला वंदन करावे. एवढाच अर्थ ‘वंदे मातरम’चा आहे. देशाबद्दल आदर व प्रेम असणाऱ्या प्रत्येकाने ‘वंदे मातरम्’ म्हणावे. यात कुठलाही पाखंडीपणा नाही.

‘वंदे मातरम्’ला कडवा विरोध करणारे कबरींची मात्र पूजा करतात. मजार परस्ती (कबरीची पूजा) ही मूर्तिपूजेइतकीच धार्मिक आहे. संयुक्त अरब अमीरातला मी 14-15 वेळा गेलो आहे. अजमान, शारजा, दुबईत मी पायी फिरलो आहे. मशिदी पुष्कळ आहेत, पण दर्गा एकही दिसला नाही. हिंदुस्थानात मात्र शेकडो दर्गे आहेत. ज्यांना आंघोळ घातली जाते. त्यावर वस्त्र चढवले जाते. त्याची प्रार्थना केली जाते व दुआ (आशीर्वाद) मागितली जाते, त्याला नवस केले जातात व ते फेडलेही जातात. मुस्लिम बांधव पीर, मुरशद यांच्याकडे परमेश्वराचा मध्यस्थ म्हणून जातात. त्याचा कोणी मुस्लिम धार्मिक वा राजकीय पुढाऱ्यांनी – ओवेसीसारख्यांनी – जाहीर निषेध केलेला, त्याविरुद्ध चळवळ केलेली ऐकिवात नाही.

इतकेच कशाला, प्रतापगडावर अफझलखानाची कबर आहे तिला आंघोळ घालून ते आंघोळीचे पाणी तीर्थ म्हणून नेणारे मी पाहिले आहेत. वास्तविक अफझलखान कोणी संत, अवलिया नव्हता. सामान्य माणसांचे गुणदोष असणारा एक सेनापती होता. मुसलमानांनी आपला धर्म जरूर पाळावा. तो त्यांचा हक्कच आहे, पण ‘वंदे मातरम्’ ही म्हणावे. ते त्यांचे कर्तव्य आहे. मातृभूमीला सगळय़ांनीच वंदन करावे. तिचा सगळय़ांनीच मान ठेवावा.

आपली प्रतिक्रिया द्या