
>>नमिता वारणकर
आंबा म्हणजे केवळ हापूस आणि पायरी…? छे… या मधुर फळाच्या असंख्य चवी आणि वैशिष्टय़पूर्ण नावं..
मानखुर, खोबऱया, बादुरो, गिटक्या, गधेमाळ, शेंदऱ्या, काळो, केळ्या, नळ्या, चोचरी, कागद्या, फुटय़ा, ढोल्या, राघ्या…ही नावं कशाची आहेत माहीत आहे का?… आपल्याला अतिशय प्रिय असणाऱ्या आंबा या फळाची… आश्चर्य वाटलं ना वाचून… कारण या जाती बऱ्याच जणांना माहीत नाहीत…मधुर, चवीला अविट आणि सर्वांनाच हव्याहव्याशा वाटणाऱया आंब्याच्या नावाचा इतिहास फारच मोठा आहे. हजारो जाती असलेल्या या फळाचं रंग, आकार आणि चवीनुसार नाव वेगळं…विशेष म्हणजे प्रत्येक जात आज प्रचलित आहे असं नाही, तरीही त्या जातीतील नावांमागचा इतिहास मात्र मोठा गमतीशीर आहे.
याबाबत ज्येष्ठ कृषी तज्ञ राजेंद्र भट सांगतात, काही जाती गोव्याहून आल्या आहेत. त्यामुळे गोव्याची नावं त्याला पडली आहेत. केशरी हा गुजरातमधील केशर भाईकडे सापडला म्हणून त्याला केशर आंबा हे नाव पडलं. उत्तर हिंदुस्थानात फसन या नावाने आंबे आहेत. इमाम फसन, बादशहा फसन, बेगम फसन अशी नावं आहेत. शिवाय भोग या नावानेही तेथे आंबे आहेत. कृष्णभोग वगैरे अशी देवांची नावे या आंब्यांना दिली आहेत. मराठवाडय़ात श्रीधर स्वामींच्या अनुयायाने रायवळ आंब्याच्या असंख्य जाती लावल्या. कारण श्रीधर स्वामींना आंबे खूप आवडायचे.
गधेमाळ आंबा
आंबा झाडावरून गाढवाच्या डोक्यावर पडला. ते गाढव मेलं म्हणून या आंब्याच्या जातीला गधेमाळ आंबा असं म्हणतात.
केळ्या, शेंदऱ्या, भोपळ्या
ही चव, रंग, आकार आणि रंगावरून दिलेली आंब्याला नावं आहेत. भोपळ्या म्हणजे भोपळ्याएवढय़ा आकाराचा असलेला.
तावाजी पटेल
शेतकऱ्याचे नाव दिलेला हिंदुस्थानातला हा फक्त एकच आंबा आहे. तावाजी पटेल नावाच्या शेतकऱयाला आंबा सापडला म्हणून त्याच्या नावाने तो प्रसिद्ध आहे. आकाराने हा आंबा खूप मोठा आहे. प्रक्रियायुक्त पदार्थ बनवण्यासाठी याचा चांगला उपयोग होतो.
लंगडा
बनारसमध्ये खूप वर्षांपूर्वी एक पायाने अपंग व्यक्ती राहत होती. त्याला त्याच्या जवळचे लोक प्रेमाने लंगडा म्हणून हाक मारायचे. एकदा एक आंबा या व्यक्तीने खाल्ला आणि तो त्याला फारच आवडला. या आंब्याची गुठळी त्याने घरातील अंगणात लावली. काही वर्षांनी या झाडाला भरपूर आंबे येऊ लागले. त्यामुळे सर्वांनी मिळून याचे नाव लंगडा आंबा ठेवले.
गोटी
मोठय़ा गोटीच्या आकाराएवढा. हिरवी साल, रस अगदी गोड, रंगाने केशरी, कोय अगदी लहान. याचा एक प्रकार म्हणजे साल काळी आणि गोटीसारखा असलेला काळी गोटी आंबा.
गाढवमुत्या
तळहाताएवढा मोठा आंबा. हिरवी पातळ साल. फिकट पिवळा रस भरपूर पण पाण्यासारखा पातळ म्हणून त्याला हे नाव पडले.
खोबऱ्या
कोयरीच्या आकारासारखा. कैरीत आंबटपणा नाही. तिची चव खोबऱ्यासारखी म्हणून याचे नाव खोबऱ्या.
साखऱ्या
मध्यम आकारचा आणि साखरेसारखी गोडी असलेला पण याची जात आता फारशी सर्व ठिकाणी प्रचलित नाही.
हेलन, ऑस्किन, लीली (परदेशी आंबा)
परदेशात ज्या शेतकऱ्याच्या शेतात आंबा सापडतो त्याचे नाव त्याला मिळालेलं असतं. स्वामी ऍटकिन्स म्हणून जगातली सर्वात मोठी आंब्याची निर्यात आहे. त्यांच्या शेतात तो आंबा सापडला होता. ऑस्किन, हेलन, लीली ही परदेशात सापडलेल्या शेतकऱ्यांकडे आंब्यांना नावं दिली आहेत.
सिंधू
आकर्षक लाल रंगाची छटा असलेला सिंधू आंबा चवीला मधुर आहे. या आंब्यात कोय अत्यंत लहान असते.
कोकण रूची
कोकण रुची हा आंबा खास लोणच्यासाठी वापरला जातो. कारण यात आंबटपणा जास्त आहे. याशिवाय लोणच्यामध्ये हा आंबा जास्त टिकतो. या आंब्याचं वजन सर्वात जास्त म्हणजेच साधारण 300 ते 350 ग्रॅम आहे.
फुटय़ा
लोणच्यासाठी फोडावा लागतो म्हणून याचे नाव फुटय़ा.
राघ्या
याच्या कैरीच्या देठाच्या विरुद्ध बाजूला पोपटासारख्या चोचीचा आकार असतो म्हणून याला राघ्या आंबा म्हटले जाते.
नावात विविधता का?
आंब्याच्या नावातील विविधतेबाबात त्यांचे म्हणणे आहे, व्यावसायिक आंबे साधारण सत्तर जातींचे आहेत. वेगवेगळ्या प्रांतातल्या मिळून चौदाशेच्या आसपास जाती आहेत. काही जाती आता हळूहळू लुप्त होत आहेत. हापूस, पायरी, केशर याव्यतिरिक्त आज लोकांना आंबा माहीत नाही. कारण तो शहरातल्या लोकांपर्यंत पोहोचत नाही. परागीभवन हा आंब्याचा प्रमुख गुणधर्म आहे. त्याच्या प्रत्येक कोयीपासून नवीन आंबा तयार होतो. ज्या जाती तयार झाल्या त्याची निर्यात सुरू झाली, त्यानंतर कलमाची प्रक्रिया सुरू झाली. त्या आधी आंब्याचे कलम लावण्याची पद्धत नव्हती.




























































