
ज्यांच्या प्रत्येक नाटकाने मराठी रंगभूमी समृद्ध केली, मराठी नाटय़विश्वाला सोनेरी झळाळी दिली असे प्रतिभाशाली नाटककार, साहित्यिक प्रा. वसंत कानेटकर यांचे जन्मशताब्दी वर्ष 20 मार्चपासून सुरू झाले. मराठी रंगभूमीला दर्जेदार नाटकांची श्रीमंती बहाल करणाऱया वसंत कानेटकर यांच्या आठवणींना ज्येष्ठ अभिनेते, लेखक अशोक समेळ यांनी दिलेला हा उजाळा….
‘आकाशात चमकतायेत लक्षावधी तारका, पण त्यात एकच अढळपणे उभी आहे ती फक्त धुवाची चांदणी! या अगणित माणसांच्या दुनियेत मात्र एकच माणूस ठाऊक आहे, जो आपल्या जागेवर आजही ठामपणे उभा आहे, तो मी आहे. मी, मी आहे. विद्यानंद, मी आहे देवकीनंदन, मी आहे… संभाजी आणि मीच आहे नाटककार, कादंबरीकार, इतिहासकार वसंत शंकर कानेटकर आणि माझ्या हृदयाच्या गाभाऱयात आहे तो माझ्या गाजलेल्या सर्वच 41 नाटकांचा शब्दसंवाद! शब्द, शब्द आणि फक्त शब्द!’’
आज आपले तात्यासाहेब तथा वि. वा. शिरवाडकर तथा कुसुमाग्रज असते तर कानेटकरांबद्दल हेच उद्गार काढले असते! कारण कानेटकरांनी आपल्या 50 वर्षांच्या नाटय़ लेखनाच्या कारकीर्दीत 41 यशस्वी नाटके लिहिली, ज्यांची भुरळ आजही प्रेक्षकांवर तशीच आहे!
मार्च 20 त्यांच्या जन्मशताब्दी वर्षाचा प्रारंभ झाला आहे. यानिमित्ताने त्यांची स्नुषा अंजली प्रियदर्शन कानेटकर आणि नातू अंशुमान प्रियदर्शन कानेटकर यांनी मी त्याचा एक चाहता, मित्र म्हणून त्याच्या आठवणींवर लेख लिहिण्यास सांगितले आहे आणि ते माझे भाग्य आहे. कारण या महामानवाचा सहवास मला लाभला होता… त्याचा सुगंध आजही दरवळतोय व मला नाटक लिहिण्याची प्रेरणा पुनः पुन्हा देतोय!
1980 सालची ही घटना आहे. तेव्हा मी प्रत्यक्ष मराठी रंगभूमीवरच्या या महान नाटककाराला पाहिले. एके संध्याकाळी प्रभाकर पणशीकरांच्या केबिनमध्ये बसलो असताना प्रा. कानेटकर विजेसारखे आत आले आणि त्यांना ‘‘एका नाटकासंबंधी आपण चर्चा उद्या करू’’ असे सांगून त्याच विजेच्या वेगाने निघूनही गेले. त्यांना पाहून क्षणभर मी स्तब्ध झालो, भारावून गेलो होतो. हेच ते वसंतराव कानेटकर होते, ज्यांनी ‘अश्रूंची झाली फुले’सारखं नाटक 1966 साली भरभराटीला आणले. यश आणि पैसा नाटय़संपदेला प्रथम दाखवला तो वसंतराव कानेटकर यांनी. त्यांच्यामुळेच कै. प्रभाकर पणशीकर आणि त्यांची नाटय़संपदा ताठपणे उभी राहिली. याच नाटकात पुढे मला ‘शंभू महादेव’ ही भूमिका करायला मिळाली आणि नाटककार कानेटकरांना जाणण्याची त्यांचे नाटक शिकण्याची आणि भेटण्याचीही संधी वारंवार मिळाली. मी या नाटकाचे 700 हून अधिक प्रयोग केले तरी प्रत्येक प्रयोगात कानेटकरांचे संवाद हे वेगळेच वाटले. कारण या द्रष्टय़ा नाटककाराने कलाकारांसाठीही Between the Line सोडल्या होत्या!
कानेटकरांच्या डोक्यात एकाच वेळी अनेक नाटकांचे विषय घोळत असत. एकदा गप्पा मारताना त्यांच्या गाजलेल्या ‘लेपुरे उदंड झाली’ या नाटकाचा जो ढाचा ऐकवला तो ते नाटक लिहीपर्यंत पूर्णपणे बदलला होता! कानेटकर नाटकाचा शेवट हा नेहमी आधी लिहीत असत. दैवी प्रतिभा लाभलेला माणूसच हेच करू शकतो. कानेटकरांच्या नाटकात प्रकर्षाने जाणवणारा ‘नियतीशून्य’ माणूस हा त्यांच्या प्रत्येक नाटकात होता. कानेटकर साधारण दोन वर्षांना एक नाटक या गतीने लिहीत असत.
1957 साली त्यांचे ‘वेडय़ाचे घर उन्हात’ हे नाटक पुण्याच्या प्रोगेसिव्ह ड्रमॅटिक असोसिएशनला (PDA) दिले आणि 1964 साली संगीत ‘मत्स्यगंधा’ हे अविट गोडीचे नाटक ‘द गोवा हिंदू असोसिएशन’ने केले. विषय पौराणिक होता, पण त्याच्या संवादाचा बाज आजचा होता. या काळात कानेटकर एचपीटी कॉलेजमध्ये प्राध्यापक होते. कॉलेजच्या आवारात त्यांचा टुमदार बंगला होता. पहिल्या मजल्यावर त्यांची लिखाणाची खोली होती. लिखाणासाठी खास बनवून घेतलेल्या डेस्कवर समोर मांडी घालून कानेटकर लिखाण करीत असत.कानेटकर नाटक अत्यंत उत्तम वाचत. त्यांच्या आवाजाला एक धार होती! खरं तर त्यांना उत्तम चेहरा, उत्तम शरीरयष्टी लाभली होती. आवाजातही एक नाद, लय होती. ते उत्तम नट बनू शकले असते, पण प्राध्यापक बनले. आपल्या लेखनाची सुरुवात त्यांनी कादंबरीकार म्हणून केली होती. त्यांच्या कादंबऱयाही संवादप्रधान होत्या.
अतिशय सुरेख संवाद लिहिणं हे आपले शस्त्र आणि नाटय़ात्मक द्वंद्व हे आपले अस्त्र आहे आणि उत्तम क्राफ्टस्मनशिपची शैली ही जन्मजातच त्यांना अवगत होती. त्यामुळे नाटक आपण सुटसुटीत लिहू शकतो याची खात्री पटल्यावर त्यांनी आपला चेहरा जो नाटकाकडे वळवला तो आजतागायत कुणी पुसूच शकला नाही!
1960 नंतर मराठी नाटय़ व्यवसायाने जास्तीत जास्त प्रयोग त्यांच्या नाटकाचे केले. त्यांच्या नाटकावर अनेक नाटय़ संस्थांनी आपल्या गुढय़ा उभारल्या!
कानेटकरांची नाटय़ लेखनाची आणखी एक खासीयत होती. त्यांच्या नाटकात संवादामध्ये पंस असायचे. त्यात पात्राची ाहूब्, ाxग्t, नेपथ्याविषयी सूचना, लेखक म्हणून आपणाला काय अभिनय अपेक्षित आहे याचाही मोठा पंस असायचा. कानेटकर नाटकाचे वाचन वाचताना नाटक डोळय़ांसमोर उभे करीत! त्यावर ते नेहमी म्हणायचे, ‘‘अहो, आधी मला नाटक दिसले पाहिजे. म्हणजे ते प्रेक्षकांना दिसेल!’’ कानेटकरांचे प्रत्येक नाटक हे एवढे चिरेबंदी असायचे की, त्यात नखभरही ते टीकेची जागा ठेवत नसत. कारण ते स्वतःच आपल्या नाटकाचे कठोर टीकाकार होते आणि दुसऱया त्यांच्या पत्नी सिंधूताईही!
‘अश्रूंची झाली फुले’ या नाटकामध्ये कानेटकरांना एकदा काही चौकस टीकाकारांनी प्रश्न विचारला की, प्रा. विद्यानंदासारख्या तेजस्वी विद्वान प्राध्यापकाचे इतर प्राध्यापक सहकारी इतके फालतू कसे? त्यावर कानेटकरांनी तेजस्वी उत्तर दिले, ‘‘अहो, अशा प्राध्यापकांच्या सहवासात मी गेली अनेक वर्षे वावरतोय. यातले काही नमुने मी पेश केले!’’ यावरून माझ्या शंभू महादेव व्यक्तिरेखेचा किस्साही ऐकण्यासारखा आहे. एकदा कानेटकर ‘अश्रूंची झाली फुले’ या नाटकाच्या प्रयोगाला बालगंधर्वमध्ये पुण्याला येऊन बसले. पणशीकर म्हणाले, ‘‘अशोक, त्यांना तुझा शंभू महादेव बघायचा आहे.’’ मला प्रचंड टेन्शन आले. पहिला अंक झाला आणि साक्षात नाटककार कानेटकर धावत ग्रीन रूममध्ये आले आणि प्रचंड प्रेमाने मला मिठी मारून पणशीकरांना म्हणाले, ‘‘पंत पणशीकर, हा माझा खरा शंभू महादेव, माझा बालमित्र.’’ शंभू महादेव ही व्यक्तिरेखा त्यांचा शाळकरी मित्र होता. माझ्या आयुष्याचे अभिनेता म्हणून सार्थक झालं. कारण त्यांच्या मिठीत त्यांना जसा माझ्या रूपाने त्यांचा बालमित्र भेटला, तसा मला आभाळाएवढा नाटककार भेटला…अंतःकरणापासून! या नाटकातला आम्हा सर्वांचा आणि कानेटकरांचा एक संवाद त्यांना आदरांजली म्हणून अर्पण करतो!
विद्यानंद शंभू महादेवाला म्हणतो, ‘‘शंभू, वेडय़ा, तू मला विचारतोयस खरं काय आणि खोटं काय? अरे, माझे मी जसा मला वाटतो,जसा दिसतो तो तरी खरा आहे. या कोनातून पहा, तुला मी दिसेन मी पराक्रमी, पुण्यश्लोक नायक, पण त्या कोनातून बघशील तर म्हणशील हाच तो दुष्ट खलनायक, पण जरा स्थितप्रज्ञ होऊन आणि नेमका समोरचा मध्य गाठून पाहशील तर तुला खात्रीच होईल, तुझ्यासमोर नाचतो आहे एक मजेदार रक्तबंबाळ विदूषक! खरं काय आणि खोटं काय? (हसतो). अरे खऱयांची झलक पाहिली, आता खोटय़ाची मजा बघतोय मजा! पुण्यातली चव गेली, आता पाप कशाशी खातात ते शोधतो आहे. जगण्याचा सोहळा संपला तेव्हा आपुले मरण मी याचि देही याचि डोळा न्याहाळतो आहे (खळाळून हसतो). खरं काय आणि खोटं काय?’’
वा! वसंतराव कानेटकर, आपले हे मोत्याचे दाणे उधळत कुणीही मोठा नट होईल. नट घडवण्यासाठी लेखक प्रचंड मोठा हवा!
त्यानंतर माझा संबंध आला तो ‘इथे ओशाळला मृत्यू’ या नाटकात. कविकलश या पात्राची मी replacement केली. पुन्हा एकदा कानेटकरी ऐतिहासिक बाजाने मी हादरून गेलो. केवढा व्यासंग, संशोधन आणि नाटकाची जाण..थोर नाटककार!
एकदा कानेटकर मुंबईला एका महिला अनाथाश्रमात एका समारंभाला गेले असताना त्यांना एका नाटकाची कथा गवसली. ते नाटक म्हणजे ’मला काही सांगायचे आहे’. सुधा करमरकर, प्रभाकर पणशीकर आणि काशीनाथ घाणेकर अशी नामवंत कलाकार मंडळी होती. प्रत्येक प्रयोग हाऊसफुल्ल गेला. यात पुढे मलाही ‘बाप्पाजी’ ही खलनायकाची भूमिका पुढे मिळाली आणि पुन्हा एकदा कानेटकरांच्या अधिक जवळ नाटककार म्हणून आलो. त्यात डॉ. घाणेकर हे न्यायाधीशाची भूमिका करणारे जज देवकीनंदन यांचे मवाली चिरंजीव दाखवले आहेत, पण हाच कानेटकरांचा राहुल डॉ. काशीनाथ घाणेकर (शेवटी) म्हणतो.
‘‘पपा, असं म्हणतात की दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं, पण हे अर्धसत्य आहे. पपा, खरं सत्य हे आहे की माणसाने जसं दिसावं त्यावर सर्व जगानं फसावं यासाठी जो आजन्म धडपड करतो, त्याचं नाव माणूस असतं पपा, त्याचं नाव माणूस!’’
वा कानेटकर! तुमची नाटकं उराशी घेऊन काळजात जपत मराठी माणूस मोठा झाला.. आणि संस्कृतीसंपन्न झाला. तुमची उणीव आजही कायम आहे. तुमची सर्वच नाटकांची यादी देणे अशक्य आहे, पण प्रत्येक नाटकाने मराठी रंगभूमी समृद्ध केली, श्रीमंत केली!
आपल्या या 20 मार्चपासून सुरू झालेल्या जन्मशताब्दी वर्षाचा हा आरंभ आहे. आम्ही आमच्या पुवतीप्रमाणे तुम्ही लावलेला हा नाटय़तेजाचा दीप तेवत ठेवू! एवढीच नम्र आदरांजली!




























































