आभाळमाया – शुक्र पुन्हा ‘चमकला!’

जूनच्या पहिल्या आठवडय़ापर्यंत आकाशात सर्वात तेजस्वी दिसणारा शुक्र ग्रह संध्याकाळी पश्चिमेला तळपत होता. वास्तविक साधारण पृथ्वीइतकाच व्यास असलेला हा ग्रह इतका तेजस्वी दिसण्याचे कारण नव्हते. कारण गुरू त्याच्यापेक्षा कैक पटींनी आकारमान असलेला ग्रह आहे; परंतु याला दोन कारणे आहेत. एकतर शुक्र पृथ्वीच्या खूप जवळ म्हणजे पाच कोटी किलोमीटर अंतरावर आहे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या ग्रहावर सल्फ्युरिक ऍसिड आणि कार्बनपासून तयार झालेल्या ढगांचे दाट आवरण आहे. सूर्यापासून तसा जवळ असल्याने शुक्रावरचे तापमान अर्थातच जास्त आहे. त्यातच त्यावरच्या सल्फर, कार्बनची वाफ त्याचे वातावरण व्यापून आहे. त्यामुळे शुक्रावर उभे राहिल्यास आपल्याला पृथ्वीवरून दिसते तसे ताऱयांनी चमचमणारे निरभ्र रात्रीचे आकाश कधीच दिसणार नाही. तिथे माणसाला वस्ती करणेही केवळ अशक्य. म्हणूनच आपल्या शास्त्रज्ञांची आणि व्यावसायिक अवकाश पर्यटन घडवू इच्छिणाऱयांची नजर केवळ मंगळाकडे लागलेली दिसते. आपल्या सूर्यमालेतील अन्य ग्रहांवर वस्ती करण्याची कल्पना प्रत्यक्षात उतरणारी नाही. ‘मंगळवारी’सुद्धा काही सोपी नव्हेच, पण प्रयत्न मात्र जोरदार चाललेत.

मंगळावर सजीव आहेत आणि ते त्याच्या पृष्ठभागाखाली राहतात अशी कल्पना करून एच.जी.वेल्स यांनी ‘लिटिल ग्रीन मेन’ ही कथा रचली. कथेनुसार हे ‘मंगळे’ कधीतरी पृथ्वीवर हल्ला करतील असे चित्र रंगवले गेले. बऱयाच अमेरिकन किंवा पाश्चात्त्य अंतराळ कथानकात ‘ते’ कोणीतरी परग्रहवासी आपला नायनाटच करायला येतील असे का रंगवतात, ठाऊक नाही. ते मैत्री करायला येणार नाहीत कशावरून? जाऊ द्या. तो आजचा विषय नाही.

मग आता शुक्राचा विषय कसा चर्चेत आला? मंगळावर सहज एखादे यान उतरवून तिथल्या खडक-मातीचा, वातावरणाचा अभ्यास करणे जितके सोपे आहे, तितके शुक्राबाबत नाही. 1962 मध्ये मरिनर-2 हे यान बुधाकडे जात असताना त्याने शुक्राला परिक्रमा केली. त्याला फ्लाय-बाय म्हणतात, तर त्या जवळच्या शुक्रदर्शनात मरिनरने त्याचे तापमान मोजले होते. ते 800 अंश सेल्सियस असल्याचे लक्षात आले. या वातावरणात कोणी सजीव जगले म्हणजे आश्चर्यच!

परंतु 1920 पर्यंत शुक्राबद्दलच्या ज्या कल्पना होत्या, त्यात शुक्र ग्रह पृथ्वीसारखाच असून तिथे नक्की सजीव असतील असा विचार पुढे आला. मात्र कालांतराने अवकाश तंत्रज्ञानात प्रगती झाल्यावर आपली याने थेट या ग्रहांपर्यंत जाऊ लागली आणि त्यांचे खरे रूप समजू लागले.

याशिवाय पृथ्वीवर जशी सजीवांची वस्ती आहे, तशी शुक्रावर असल्याचे म्हटले तर त्या सजीवांना वातावरणाचा प्रचंड दाब सहन करावा लागेल. पृथ्वीवरचा आपल्या प्रत्येकाच्या डोक्यावरच्या वातावरणीय दाब एक मानला तर शुक्रावर तो त्याच्या 75 ते 100 पट असेल. इतका दाब आपल्याकडे पॅसिफिक किंवा अन्य खोल सागरांच्या तळाशी असतो आणि त्याचा हिशेब करूनच पाणबुडय़ांचे वेश बनवलेले असतात. अशा या शुक्राजवळून 15 ऑक्टोबरच्या सुमारास बेपिकोलंबो हे यान जाईल तेव्हा त्याच्या वातावरणाची अधिक माहिती मिळेल. 1978 मध्ये पायोनिअरने दिलेल्या शुक्राविषयीच्या माहितीमध्ये मोलाची भर पडेल.

शुक्रावरच्या सल्फरच्या ढगांमुळे तिथल्या पृष्ठभागावर ‘ग्रीन हाऊस’ (हरितगृह) परिणाम होऊन तापमान प्रचंड असते. पृथ्वीवरच्या प्रदूषणामुळे तसा होणारा परिणाम आपल्याला आताच त्रासदायक वाटू लागलाय. मग शुक्रावर उतरण्याची बातच दूर! निर्मनुष्य यान मात्र तिथे जाऊ शकते.

पृथ्वी स्वतःच्या अक्षाशी साडेतेवीस अंशाचा कोन करते तर शुक्र 177 अंशाचा कोन करतो. म्हणजे जवळ जवळ उलटाच! त्यामुळे शुक्रावर सूर्योदय आपल्या संदर्भात पश्चिमेला होता आणि सूर्यास्त पूर्वेला. याव्यतिरिक्त शुक्राचा दिवस म्हणजे स्वतःभोवती फिरण्याचा काळ त्याच्या सूर्याभोवतीच्या परिक्रमेपेक्षा जास्त आहे. दिवस मोठा, वर्ष लहान असा हा प्रकार. शुक्र तेजस्वी दिसण्याचे कारण त्याच्यावरील ढगांवर पडणाऱया सूर्यप्रकाशाचे मोठय़ा प्रमाणावर विकिरण होऊन तो परावर्तित प्रकाश आपल्याला लोभसवाणा वाटतो. त्यामुळे जगातल्या सर्व काव्यांमध्ये ग्रहांपैकी फक्त शुक्राचेच वर्णन आढळते. आता ‘सजीव’ सापडल्याच्या बातमीने शुक्र वैज्ञानिक जगात आणि मीडियात पुन्हा चमकलाय.

आता प्रश्न असा की, तिथे सजीव आहे का? कारण तिथल्या वातावरणातील फॉस्फिन या घटकात काही सूक्ष्म सजीव सापडल्याचे प्रसिद्ध झाले आणि शुक्र पुन्हा चर्चेत आला, पण इतके सूक्ष्म जीव म्हणजे ‘जीवसृष्टी’ वगैरे नाही, तर हळूहळू आकाश मेघमुक्त होत असताना पहाटे जाग आली आणि घरातूनच पूर्वक्षितिज दिसत असेल तर सूर्योदयापूर्वी तेजाळ शुक्र जरूर पहा. खेडोपाडय़ांत हे शक्य आहे. महानगरांमध्ये इमारतींच्या उंचीत हरवलेले क्षितिजच आधी शोधावे लागेल!

आपली प्रतिक्रिया द्या