
अनेक ज्येष्ठ रंगकर्मींचा ठसा मराठी रंगभूमी अभिमानाने मिरवते आहे. विजय तेंडुलकर. तेंचे नवे नाटक येतंय.
मानवी नातेसंबंधांचा वेध घेणारे, भावभावनांचे अनेक कंगोरे आपल्या लेखणीद्वारे समाजासमोर मांडणारे, समाजातील परस्परविरोधी रंग, मानवी संबंधातील नाजूक, हळवा पोत उलगडणाऱया अनोख्या नाटय़शैलीसाठी प्रसिद्ध असणारे नाटककार, लेखक, पटकथालेखक विजय तेंडुलकर यांच्या कथेवर आधारित ‘आमच्यावर कोण प्रेम करणार?’ हे नाटक लवकरच रंगभूमीवर येत आहे.
विवाहासाठी मुलीला येणाऱया नकाराबाबत समाजाची मानसिकता, रंगरूप, शिक्षण स्वातंत्र्य, विचारस्वातंत्र्य, मुलीला गृहित धरणे, या मुद्दय़ांवर भाष्य करणारं हे नाटक आहे. या नाटकाची कथा वाढत्या वयाचा मुलगा, त्याची आई, लग्नासाठी इच्छुक मुलगी अशी तीन पात्रांवर आधारित आहे. लेखक प्रवीण धोपट यांनी याबाबत बोलताना सांगितले की, कोणत्याही स्त्र्ााrच्या म्हणण्याकडे दुर्लक्ष करण्याऐवजी तिला तिचं म्हणणं मांडण्याचं स्वातंत्र्य द्यावं, हा विषय या नाटकातून अधोरेखित होते. एका लग्न न ठरलेल्या मुलीची गोष्ट या नाटकात प्रेक्षकांना पाहायला मिळते. एक स्थळ तिच्यासाठी येतं आणि तिचं लग्न ठरतं, पण मुलाच्या लक्षात येतं की, ती सुंदर नाही. या विचाराने तो तिला नकार देतो. या मुलीची होणारी कोंडी गमतीशीर रूपात नाटकात मांडण्यात आली आहे. त्यामुळे कथेचा विषय गंभीर असला तरीही हलकंफुलकं प्रेक्षकांना हसवणारं हे नाटक आहे.
गंभीर विषयात रंजकता
तेंडुलकरांची नाटकं एखाद्या प्रश्नाचा वेध घेणारी, धारदार भाषा असणारी आहेत. त्याप्रमाणे या नाटकातही मुलीचं शिक्षण, तिला वाढवण्यासाठी तिच्या आई-वडिलांनी घेतलेले कष्ट, मुलींच्या स्वातंत्र्याविषयी असणारे समाजाचे विचार अशा महत्त्वाच्या आणि गंभीर मुद्दय़ांचा विचारही रंजकतेने केलेला आहे. शिवाय भाषाही हलकीफुलकी असल्यामुळे रसिक प्रेक्षकांना नाटक पाहताना नक्कीच मजा येईल असेही प्रवीण धोपट सांगतात.
कथेचं नाटय़रूपांतर…
कथेचं नाटय़रूपांतर करण्याविषयी लेखक प्रवीण धोपट सांगतात, ‘आमच्यावर कोण प्रेम करणार ?’ ही विजय तेंडुलकरांची कथा आहे. या कथेचं नाटय़रूपांतर करताना लेखक म्हणून त्यातला काही काळ मला वाढवावा लागला. यामध्येही नाटककार, लेखक म्हणून विजय तेंडुलकरांचं नाव फार मोठं आहे. त्यामुळे त्यांच्या कथेतील विषय आणि आशयाला कुठेही धक्का न लागणार नाही याची लेखक म्हणून काळजी घेण्यात आली आहे. त्याकरिता कोणत्याही प्रकारचं स्वातंत्र्य घेण्यात आलेलं नाही. कथेतला काळ जुना असला तरीही नाटक लिहितानाही कथेतील काळ जशाच्या तसाच ठेवलेला आहे.

























































