
>> ममता क्षेमकल्याणी
ऐन किशोर वयात केवळ उत्सुकतेपोटी गरम पाण्याबरोबर घेतलेली चमचाभर ब्रँडी आपल्या पुढच्या आयुष्याला व्यसनाचा विळखा घालेल अशी पुसटशी कल्पनादेखील त्या अल्लड वयाच्या मनाला नव्हती. पण पुढे संधी मिळाली आणि मद्यपानाने एका हुशार शिक्षकाचे आयुष्य अक्षरशः पोखरून गेले. नशीब बलवत्तर म्हणून पुण्यातील मुक्तांगणचे मार्गदर्शन मिळाले आणि हाडाचा, हुशार शिक्षक व्यसनमुक्त झाला. त्यांची ही यशोगाथा!
सांगली जिल्ह्यातील जत या गावातील सधन म्हणावं अशा कुटुंबातील विनायक तल्लख बुद्धिमत्ता आणि संगीत, गायन, काव्यलेखनातही निपुण. प्रेमळ पण आदर्श विचारांचे अनुसरण करणाऱया वडिलांची छत्रछाया लाभलेल्या विनायकने शालेय शिक्षणात अव्वल नंबर कधी सोडला नाही. विनायक यांच्या शेजारी राहणाऱया एका कुटुंबातील पालक थंडी वाढली की त्यांच्या मुलाला गरम पाण्याबरोबर चमचाभर ब्रँडी देत. असे केल्याने नेमके काय होते या उत्सुकतेपोटी विनायक यांनीदेखील चमचाभर ब्रँडी घेऊन पाहिली. त्या वेळी आलेल्या ऊबदार अनुभवाने पुढे लगेच डोके वर काढले नाही. मात्र पुढच्याच काही वर्षांत म्हणजे विनायक कॉलेजच्या पहिल्या वर्षाला असताना नेमकी ती संधी मिळाली आणि एका हुशार विद्यार्थ्याची वाताहत होण्यास सुरुवात झाली. त्या वेळी विनायक यांनी त्यांच्या मित्रांबरोबर एक ऑर्केस्ट्रा सुरू केला होता. ऑर्केस्ट्राचे हे कलाकार अनेक ठिकाणी उत्तम कार्यक्रम करीत.
ऑर्केस्ट्राचा एक कार्यक्रम रात्री उशिरापर्यंत सुरू होता आणि कडाक्याची थंडी जोर धरत होती. अशातच ऊब देणाऱया ब्रँडीची आठवण त्यांना आली. ब्रँडीची ही ऊबदार सोबत पुढे वरचेवर डोके वर काढू लागली आणि घरात काहीही कळू न देता रात्रीचा ‘कार्यक्रम’ उरकून विनायक घरी येऊ लागले. मोठय़ा मनाच्या वडिलांनी समजुतीच्या चार गोष्टी सांगून झाल्या. मुलाच्या तरुण वयातला हा एक टप्पा आहे, अशी स्वतःची समजूत घातली. मुलाच्या या वर्तनाचा त्यांनाही त्रास होऊ लागला. आपल्या मुलाला आपण वेळीच रोखले नाही याचा त्यांना पश्चात्ताप होऊ लागला. मुलाचे लक्ष शिक्षणात लागावे यासाठी त्याला इंग्रजी विषयात एम.ए. आणि बी.एड. करायला लावले. या दोन्ही पदव्या विनायक यांनी उत्तम मार्कांनी प्राप्त केल्या, पण मद्यपानाच्या सवयीने नोकरीच्या अनेक संधींवर पाणी फिरवले.
सांगली जिह्यातल्या चांगल्या शिक्षण संस्थांमध्ये नोकरी मिळूनदेखील व्यसनामुळे विनायक आपली कोणतीच नोकरी टिकवून ठेवू शकले नाहीत. उपजत हुशारी, इंग्रजी विषयावरील प्रभुत्व आणि शिकवण्याची हातोटी यामुळे ‘शिक्षक’ म्हणून विनायक यांना नाव ठेवायला कुठेही जागा नव्हती. मात्र व्यसनामुळे एक हाडाचा शिक्षक बदनाम झाला.
शिवाय आपल्यातील या गुणांची जाणीव असल्यामुळे विनायक यांच्या वर्तनात एक प्रकारचा अहं निर्माण झाला. आपल्याला नोकरीची गरज नाही, क्लासचा एक बोर्ड लावला तर विद्यार्थ्यांची रांग लागेल, हा समज अनेक चांगल्या नोकऱयांवर पाणी सोडायला कारणीभूत ठरला. पहिली नोकरी सोडल्यानंतर विनायक यांनी इंग्रजी विषयामुळे दहावीत नापास झालेल्या दोन विद्यार्थ्यांना घेऊन आपल्या क्लासचा श्रीगणेशा केला. विनायक यांच्याकडे रिपिटर्स मुलांची खरोखरच रांग लागली. एकेका वर्षात दोनशे-अडीचशे मुले अगदी लांबून लांबून त्यांच्याकडे येत.
मात्र यशाच्या या प्रवासातही व्यसनाची सोबत होतीच. व्यसनाचा आलेख चढताच होता. अशातच कधी नोकरी, तर कधी खासगी शिकवणी अशा मार्गावर विनायक यांचा प्रवास सुरू होता. त्यांच्या पत्नी श्रद्धा यादेखील शिक्षिका. त्यांनाही पतीच्या या वर्तनाचा अनेकदा त्रास व्हायचा. दोन मुलींच्या जन्मानंतरही परिस्थिती बदलली नाही.
विनायक यांना त्यांची मद्यपानाची आवड पूर्ण करणारे मित्रमंडळ लाभले. अशातच एकदा विनायक यांना त्यांच्या एका मद्यपी मित्रानेच उपदेशाचे डोस पाजले. ‘‘तुम्ही शिक्षक असल्याने अशा प्रकारे मद्यपान करणे तुम्हाला शोभत नाही. तुम्ही मद्यपान सोडण्यासाठी पुण्याच्या मुक्तांगणला जा,’’ असे त्यांनी सांगितले. याच दरम्यान सांगलीतील मुक्तांगणच्या फॉलोअप सेंटरमध्ये डॉ. अनिल अवचट यांची भेट घेण्याची संधी त्यांना मिळाली. लगेच विनायक यांनी पुण्याच्या मुक्तांगणमध्ये प्रवेश मिळवला. पहिले एक-दोन दिवस विनायक यांना चांगले वाटले खरे. पण मद्यपानाची ओढ त्यांना स्वस्थ बसू देईना. याच दरम्यान नवीन नोकरीचा बहाणा करून विनायक यांनी मुक्तांगणमधून काढता पाय घेण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या पत्नीने त्यांना पुन्हा एकदा मुक्तांगणमध्ये दाखल केले. दुसऱयांदादेखील त्या वेळी असलेला 35 दिवसांचा कोर्स पूर्ण न करताच विनायक स्वगृही परतले.
15 ऑगस्ट 2003ची गोष्ट. एका शाळेत शिक्षक असलेले विनायक पांढराशुभ्र ड्रेस घालून ध्वजारोहणासाठी शाळेकडे निघाले होते. मात्र त्यांनी ध्वजारोहणाकडे पाठ फिरवली आणि आपल्या व्यसनाला प्राधान्य दिले. एक उत्तम शिक्षक असूनही आज आपण झेंडावंदनासाठी शाळेत गेलो नाही ही खंत विनायक यांच्या मनावर खोलवर रुजली. मद्यपानापासून स्वतः कायमचे दूर जाण्यासाठी त्यांनी 18 ऑगस्ट 2003 रोजी तिसऱयांदा मुक्तांगणमध्ये प्रवेश घेतला.
मुक्तांगणमधील या एक वर्षाच्या वास्तव्यानंतर घरी परतलेल्या विनायक यांनी प्रसाद ढवळे यांच्या मार्गदर्शनानुसार घरातूनच मुलांचे क्लास सुरू केले. पाहता पाहता पुन्हा विनायक यांच्या क्लासची ओळख दूरवर पसरली आणि एक हाडाचा शिक्षक नवीन पिढी घडविण्यासाठी झटून कामाला लागला. हळूहळू पुन्हा त्यांची लेखणी जोर धरू लागली आहे. मुक्तांगणच्या सांगलीच्या फॉलोअप सेंटरची जबाबदारीदेखील ते आज सांभाळत असून आपल्या व्यसनमुक्तीचे 99 टक्के श्रेय मुक्तांगणसह डॉ. अनिल अवचट, मुक्ता पुणतांबेकर, प्रसाद ढवळे आणि स्वतःच्या कुटुंबाला देतात. तर उरलेले 1 टक्का श्रेय आपल्या संयमाला देतात. आता त्यांनी कविता आणि गझल लिहिण्याकडे स्वतःचे लक्ष वळवले आहे.
खूप निर्धाराने सुरू असलेला व्यसनमुक्तीचा 18 वर्षांचा त्यांचा हा प्रवास निश्चितच इतरांना प्रेरणा देणारा ठरावा असाच आहे.
तिसऱया वेळी मात्र त्यांनी मुक्तांगणमधील सर्व गोष्टींचे काटेकोरपणे पालन केले. या काळात मुक्तांगणचे प्रमुख डॉ. अनिल अवचट, संचालक मुक्ता पुणतांबेकर आणि विनायक यांचे कौन्सिलर प्रसाद ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली विनायक यांनी व्यसनमुक्तीचा श्रीगणेशा केला. आपण केलेल्या चुका सलग तीन दिवस डायरीत लिहून मन मोकळे केले. याआधीचा विनायक यांचा अनुभव पाहता 35 दिवसांचा कोर्स पूर्ण केल्यानंतरही त्यांना घरी जाण्याची परवानगी देण्यात आली नाही. त्यांनी वर्षभर मुक्तांगणमध्ये राहून पुण्यात जमेल तिथे नोकरी करावी असे त्यांना सांगण्यात आले. त्या वेळी विनायक यांना विश्रामबाग वाडय़ाजवळ सहाशे रुपये पगाराची नोकरी मिळाली. मुक्तांगणपासून विश्रामबाग वाडय़ापर्यंतचे बसचे तिकीट सात रुपये होते. तेव्हा मुक्ता पुणतांबेकर त्यांना रोज जायचे सात आणि यायचे सात असे 14 रुपयेच देत. विनायक यांचा चहा, नाश्ता, जेवण आणि निवासाची सोय मुक्तांगणमध्येच करण्यात आली होती. त्यामुळे त्यांना जास्तीचे पैसे देण्याचा प्रश्नच नव्हता. लवकरच त्यांना आणखी एक नोकरी मिळाली आणि तिथेही त्यांनी काम सुरू केले. हा सगळा वर्षभराचा काळ विनायक यांना खूप काही शिकवून गेला. या काळात पत्नीनेही खूप चांगली सोबत केली. ‘फक्त आजचा दिवस’ हा मुक्तांगणचा मूलमंत्र त्यांनी कायम जपला आहे. म्हणजे ‘आज मी स्वच्छ राहीन’, ‘आज व्यसन करणार नाही’, ‘आज सगळ्यांशी नीट वागेन’ या वाक्यांनी त्यांना खूप आधार मिळाला. ‘मी दारूपासून लांब आहे आणि लांब राहीन’ हा त्यांचा निश्चय त्यांना बळ देणारा ठरतो आहे.





























































