ठसा – विवेक भगत

7499

>> बाळासाहेब दारकुंडे

21व्या शतकातील आधुनिक शहर म्हणून उदयाला आलेल्या नवी मुंबईत सुमारे 45 वर्षे नाटय़ चळवळ चालवून शेकडो सर्वसामान्य कलाकारांच्या कलागुणांना वाव देणारे ज्येष्ठ नाटय़कर्मी विवेक भगत यांचे नुकतेच निधन झाले. नवी मुंबईतील कलाकारांसाठी भगत हे एक विद्यापीठ होते. त्यांच्या तालमीत तयार झालेले अनेक कलाकार चित्रपट आणि नाटक क्षेत्रांत यशस्वी झाले आहेत. भगत यांच्या आकस्मित जाण्याने नवी मुंबईच्या नाटय़ क्षेत्राची कधीही भरून न येणारी हानी झाली आहे.

विवेक भगत यांचा जन्म 18 जानेवारी 1963 साली गोरेगाव येथे झाला. त्यांनी दादर येथील छबीलदास विद्यालयात शिक्षण घेतले. पुढे ते आपल्या कुटुंबासह 1975 च्या आसपास नवी मुंबईत आले आणि त्यांच्यातील नाटय़कर्मी जागा झाला. भगत यांनी रसायनशास्त्र्ाामध्ये पदवी घेतली होती. मात्र त्या क्षेत्रात ते रमले नाही. सुरुवातीला त्यांनी समन्वयक या संस्थेच्या माध्यमातून सामाजिक कार्य सुरू केले. पुढे शहरात नाटय़ चळवळ रुजविण्यासाठी भगत यांनी नवी मुंबई म्युझिक आणि ड्रामा सर्कल या संस्थेची स्थापना केली. ही संस्था नवी मुंबईत कलेची आवड असणाऱया तरुणांसाठी एक हक्काचे व्यासपीठ बनली. सुरुवातीला भगत यांनी नाटकांमध्ये अभिनय केला. मात्र नंतर ते दिग्दर्शन, रंगमंच, रंगमंचावरील सजावट याकडे वळले आणि त्यांच्यातील दिग्दर्शक उदयाला आला. बंगाली लेखक बादल सरकार यांची पु. ल. देशपांडे यांनी अनुवादित केलेल्या नाटकांबरोबर विजय तेंडुलकर आणि महेश एलकुंचवार यांनी लिहिलेल्या नाटकांचेही भगत यांनी दिग्दर्शन केले. स्त्री मुक्ती संघटनेचे ‘मुलगी झाली’ या नाटकाच्या दिग्दर्शनाबाबत त्यांना अनेक पुरस्कार मिळाले. राज्य सरकारच्या नाटय़ स्पर्धेमध्ये त्यांनी दिग्दर्शन केलेल्या दहा बालनाटय़ांचा विशेष सन्मान झाला आहे.

भगत यांनी संपूर्ण आयुष्य नाटय़ चळवळीला वाहून घेतले. ते गेल्या काही महिन्यांपासून आजारी होते. मात्र या शारीरिक त्रासाची पर्वा न करता ते प्रत्येक दिवशी नाटकांची तालिम घेण्यासाठी उपस्थित राहत असत. आयुष्यात अनेक वेळा त्यांना आर्थिक अडचणींचाही सामना करावा लागला. मात्र त्याचा कोणताही परिणाम त्यांनी नाटय़ चळवळीवर होऊ दिला नाही. काही वेळा नाटकाची तामिल त्यांनी सकाळी साडेसहा वाजता इमारतीच्या टेरेसवर घेतलेली आहे. ते जेव्हा आयसीयूमध्ये शेवटच्या घटका मोजत होते, त्यावेळी त्यांनी दिग्दर्शित केलेल्या एका बालनाटय़ाचा प्रयोग वाशी येथील साहित्य मंदिर सभागृहात सुरू होता. या शेवटच्या क्षणीही त्यांनी हा प्रयोग कसा झाला याची त्यांच्या पत्नी वासंती भगत यांच्याकडे मोठय़ा अस्थेने चौकशी केली होती. भगत यांनी फक्त मराठीच नाही तर हिंदी नाटकेही राज्य सरकारच्या स्पर्धेसाठी पाठवली आहेत. संपूर्ण आयुष्य नाटय़ क्षेत्राला अर्पण करणारे विवेक भगत यांचे निधन हे नवी मुंबईकरांच्या मनाला चटका लावणारे आहे.

आपली प्रतिक्रिया द्या