
<<< वैश्विक >>>
‘अशक्त परि तू केलीस वणवण’ असं कविवर्य भा. रा. तांबे यांनी त्यांच्या ‘मावळत्या दिनकरा’ या कवितेत म्हटलंय ते सायंकाळी प्रकाश सौम्य झालेल्या किरणांच्या सोनेरी गोळ्याला. आपला सूर्य हा कवितेतला ‘सोन्याचा गोळा’ वगैरे भासत असला तरी विज्ञानात तो एक धगधगता वायुगोल आहे. त्याच्या संपूर्ण स्वरूपाविषयी नंतर एका लेखात वाचू या, पण सूर्य ही विराट विश्वातली एक ‘सूक्ष्म’ निर्मिती. आपल्यासाठी जनकतारा असलेला सूर्य विश्वाच्या तारामंडळातला तसा सामान्य तारा. कवीला तो मावळताना ‘अशक्त’ होताना दिसला.
माणसाने मात्र कमाल करून प्रकाशवेगाने एका दिवसात जाईल एवढं अंतर जवळपास गाठत असलेलं एक यान आपल्या बुद्धीच्या जोरावर निर्माण केलं. 7 सप्टेंबर 1977 रोजी ‘व्हॉएजर-1’ सुरुवातीच्या 470 वॉट पॉवरसह अवकाशात उडालं त्याला 5 सप्टेंबरला 48 वर्षे पूर्ण होतील. सतत 48 वर्षे वेगाने भिरभिरताना त्याची शक्ती क्षीण होत असली तरी ते नेटाने पुढे पुढे जात आहे. आपल्या सूर्यमालेचा पसारा केव्हाच मागे टाकून आता ते आंतरतारकीय (इंटरस्टेलर) भागात प्रवेशलं असून ताशी 61,198 किलोमीटर वेगाने प्रवास करत आहे. सेकंदाला त्याचा वेग 17 किलोमीटर असून ते पृथ्वीपासून एक प्रकाश दिवस अंतर पूर्ण करायला आणखी 14 महिने आहेत.
तेव्हा म्हणजे 2026 च्या नोव्हेंबरमध्ये त्याचं हे यश आपण उत्साहात साजरं करू. अमेरिकेतील ‘जेट प्रॉपल्शन लॅबोरेटरी’ने तयार केलेलं हे 815 किलो वजनाचं यान 1977 मध्ये ‘नासा’द्वारे केप कार्निव्हल येथून अवकाशात झेपावलं. गंमत म्हणजे त्याचं जुळं भावंडं असलेलं ‘व्हॉएजर-2’ या यानानंतर 16 दिवसांनी त्याचं प्रक्षेपण झालं. ‘व्हॉएजर-2’ चं उड्डाण 20 ऑगस्ट 1977 रोजी झालं होतं. तेसुद्धा सौरमाला ओलांडून पलीकडे गेलेलं आहेच. या यानांवरच्या जागतिक ध्वनीमुद्रित स्वरात केसरबाई केरकर यांच्या आवाजातली ‘जात कहां हो’ ही भैरवी रागातली नोंदसुद्धा आहे.
‘व्हॉएजर-2’ ने जवळपास 21 अब्ज किलोमीटर अंतर पार केलं असून वेगाच्या बाबतीत ते ‘व्हॉएजर-1’ च्या मागे पडलेलं दिसतं. कोणी म्हणेल, जर हे यान आदी उडवलं होतं तर ते मागे कसं रेंगाळतंय? त्यासाठी याची उड्डाणाची कक्षा (ट्रजेक्टरी) कशी ठरवली गेली हे लक्षात घ्यायला हवं. ‘व्हॉएजर-1’ ला दूरस्थ ग्रह असलेल्या युरेनस आणि नेपच्यून यांना फेरी घालून पुढे जायचं होतं. त्यात त्याचा बराच वेळ गेला. या उलट ‘व्हॉएजर-2’ ला गुरू आणि शनीची परिक्रमा केल्यावर शनी ग्रहाच्या गुरुत्वाकर्षणाचा फायदा घेऊन लगेच सौरमालेबाहेर जायची ‘परवानगी’ देण्यात आली. त्यामुळे ‘व्हॉएजर-2’ चं उड्डाण आधी होऊनसुद्धा ते ‘व्हॉएजर-1’ च्या बरंच ‘मागे’ पडलेलं दिसत असलं तरी प्रत्यक्षात त्याने त्याला दिलेली युरेनस व नेपच्यून यांचा वेध घेण्याची कामगिरी पूर्ण केली आहे.
‘व्हॉएजर-1’ हे दोन शेवटचे ग्रह टाळून पुढे जात राहिल्याने ते ‘व्हॉएजर-2’ पेक्षा तीन अब्ज किलोमीटर जास्त अंतर कापून आंतरतारकीय भागात भ्रमण करताना दिसतं. ‘नासा’च्या ‘डीप स्पेस नेटवर्क’द्वारे या यानांशी संपर्क केला जायचा. ‘व्हॉएजर-2’ च्या संपर्कात काही अडथळा निर्माण झाला. ‘व्हॉएजर-1’ चा संपर्क मात्र व्यवस्थित असून पृथ्वीवरून त्याकडे आणि तिथून पृथ्वीकडे संदेश पोहोचायला आता (एकतर्फी संदेश वहनाला) 24 तास लागतात. म्हणजे ‘व्हॉएजर-1’ वरून ‘हॅलो’ शब्द उमटला तर तो इथे 24 तासांनी समजेल.
या यानांपैकी ‘व्हॉएजर-1’ चं काम आहे सौरमालेपलीकडचं सौरमंडल (हेलिओस्फिअर) आणि आंतरतारकीय माध्यमाचं संशोधन जाणून घेणे. ही दोन्ही यानं 2030 पर्यंत कार्यरत असतील. पृथ्वी आणि सूर्य यांच्यातील सुमारे 15 कोटी किलोमीटर अंतराला एक अॅस्ट्रॉनॉ-मिकल युनिट किंवा ‘एयू’ म्हणतात. या परिमाणाने ‘व्हॉएजर-1’ हे यान 167 ‘एयू’पेक्षा जास्त प्रवास करून गेलेलं आहे, तर ‘व्हॉएजर-2’ हे यान 139 ‘एयू’एवढं अंतर पार करून हळूहळू पुढे जातंय.
‘व्हॉएजर-1’ यानापासून पृथ्वीपर्यंत प्रकाश येण्यास 23 तास 10 मिनिटं लागतात, तर ‘व्हॉएजर-2’ पासून प्रकाश 22 तास 35 मिनिटांत पृथ्वीपर्यंत पोहोचतो. प्रकाशाचा वेग सेकंदाला तीन लाख किलोमीटर एवढा असतो. त्याचा 24 तासांतला वेग नोंदला तर तो एक ‘प्रकाश दिवस’ ठरेल. इथे एक गोष्ट लक्षात घेऊ, ‘व्हॉएजर-1’ आणि ‘व्हॉएजर-2’ ही दोन्ही यानं ‘प्रकाश दिवसा’च्या अगदी जवळ पोहेचली आहेत. एक प्रकाश सेकंद म्हणजे तीन लाख किलोमीटर, प्रकाश मिनिट म्हणजे 17987547 किलोमीटर, एक प्रकाश दिवस म्हणजे सुमारे 26 अब्ज किलोमीटर आणि एक प्रकाशवर्ष म्हणजे 9460 अब्ज किलोमीटर.
यापैकी ‘व्हॉएजर-1’ आणि ‘व्हॉएजर-2’ ही मानवनिर्मित दोनच यानं 1977 पासून अथक प्रवास करत ऊर्जेच्या व गतीच्याही बाबतीत थोडीशी ‘अशक्त’ झाली असली तरी त्यांची चिकाटीने चाललेली वणवण थांबलेली नाही. दोन्ही यानं एका प्रकाश दिवसाजवळ येऊन ठेपलीयत हे निश्चितच कौतुकास्पद! ही यशस्वी विज्ञानभरारी आहे.