लेख – विठाई माऊली

570

>>  दिलीप जोशी

मृगाचा पाऊस सुरू होऊन पेरण्या झाल्या की शेतकरी आषाढी यात्रेची तयारी करू लागतो. शेकडो वर्षांची ही ‘दिंड्या पताकांचा गजर’ करीत जाण्याची भक्तिरसात न्हालेली ‘वारी’ म्हणजे महाराष्ट्राचं सांस्कृतिक संचित. डोईवर तुळशी वृंदावन घेतलेल्या महिला, गळ्यात टाळ, मृदंग अडकवून त्याच्या तालावर धरलेलं पाऊल, नादमय, लयबद्ध चालीने विठ्ठलनामाचा जयघोष करीत जाणारी दिंडी पाहणंसुद्धा मन प्रसन्न करणारं. मग स्वतः त्यात सामील होऊन चालण्याचा आनंद केवळ ब्रह्मानंदच अशी अनुभूती मराठी मुलुख हजारांहून अधिक वर्षे घेत आहे. अनेक राजवटी आल्या आणि गेल्या. कित्येक पिढय़ा काळाआड झाल्या, पण भागवताची पताका मागच्या पिढीकडून पुढच्या पिढीकडे अव्याहत येत राहिली.

वारीमध्ये चालणारे विठ्ठलाच्या भजनात रंगतात, गोड गळ्याची मंडळी अगदी सुरेल स्वर लावतात. कुशल वादकांची यांना साथ मिळते आणि समूहगानातून अवघा आसमंत भारावून जातो. त्यातच फुगडय़ांसारखे खेळ, रांगोळय़ांची नक्षी आणि ‘माऊली’ असे सुहास्यवदनाने म्हणत ही पदयात्रा अनेक संतश्रेष्ठांच्या पालख्या घेऊन पंढरीच्या वाळवंटी एकवटते.

अशाच एका दिंडीचा अनुभव वीस-पंचवीस वर्षांपूर्वी घेतला होता. रात्री कारने जेजुरीला पोहोचलो. पहाटे खंडोबाचं दर्शन करून पुन्हा दिवेघाटाकडे निघालो. आमच्या छोटय़ा पथकात काही डॉक्टर होते. ज्ञानोबांची पालखी घेऊन येणार्‍या दिंडय़ांचं स्वागत करण्यासाठी बरेचजण स्वयंसेवी कार्य करीत होते. आम्हीही सोबत केळय़ांचे घड, बटाटय़ाच्या चिवड्याची पाकिटे वगैरे सुका आहार घेतला होता आणि तिथेच रस्त्यालगतच्या छोटय़ाशा गुहेत साबुदाण्याची खिचडी बनवण्याचं काम सुरू होतं. भल्या सकाळी दिंड्या येऊ लागल्या. अनेकजण ‘माऊली’ म्हणत परस्परांना नमस्कार करीत होता. सकाळपासून संध्याकाळी पाच वाजेपर्यंत आम्ही जमेल तितक्या मंडळींना सर्व खाद्यपदार्थांचं वाटप करीत होतो. त्यावेळी त्यांनी ‘माऊली’ म्हणताना केलेलं प्रसन्न, सात्विक स्मित मनाला अधिक उभारी देत होतं. इतक्या हजारो जणांची एकाच दिवशी  निरपेक्षपणे, सुस्मित वदनाने झालेली भेट आयुष्यातला आनंदाचा चिरंतन ठेवा होता. पंढरपुरी, चंद्रभागेतही विटेवर युगे अठ्ठावीस उभ्या ठाकलेल्या ‘समचरणा’चं म्हणजे विठुरायाच्या दोन  पावलांचं डोळे भरून दर्शन घ्यायला निघालेली किमान तीन-चार लाख पुण्यपावलं त्या दिवशी पाहायला मिळाली. हे सारं अद्भुत होतं. ‘वारी’चं वर्णन शेकडो वर्षांपासून आधुनिक काळापर्यंत अनेक प्रतिभावंतांनी केलंय.  त्या संध्याकाळी ज्ञानोबांच्या कथापाठोपाठ चार पावलं चालताना जी अनुभूती लाभली ती विलक्षण होती.

‘घुमे गजर हरिनामाचा, भक्त नामात रंगला’ अशा भावनेने लीन आणि तल्लीन होऊन जाणार्‍या वारीतलं  टाळीचं कीर्तनही संतश्रेष्ठ नामदेव महाराज म्हणतात तसं ‘नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी’ असंच असतं. स्वतः नामदेवही विठ्ठलभक्तीची पताका घेऊन पंजाबपर्यंत गेले. आता तर जगभर प्रसिद्ध झालेल्या ‘वारी’त परदेशी पाहुणे कुतुलहाने सामील होतात.

… परंतु गेल्या काही महिन्यांत ‘कोरोना’चं भयंकर ग्रहण लागलं. माणसाने माणसाजवळ जाणंच त्याने रोखलं, पण हस्तांदोलन, गळाभेट तर दूरचीच गोष्ट. आपल्याच माणसाच्या बर्‍या-वाईटप्रसंगी जिव्हाळा, साहनुभूती दाखवण्यापासूनही माणसं पारखी झाली. कधी नव्हे ते अवघ्या जगाचे व्यवहार थांबले. घरी बसणे गरजेची, सुरक्षेची आणि कर्तव्याची गोष्ठ ठरली. अनेक महिने सर्वांनीच ‘लॉक डाऊन’चा पूर्वी कधी न घेतलेला अनुभव घेतला. या सार्‍याचा परिणाम  सगळ्याच सामूहिक उपक्रमांना झाला. आषाढीची यात्राही याला अपवाद कशी ठरणार? जनता आणि सरकार सर्वांचाच नाइलाज आणि भक्तांची अगतिक भावना विठू माऊली निश्चितच समजून घेईल.

उद्याच्या आषाढी एकादशीला भीमेकाठी भक्तीचा फुललेला मळा सावळ्या विठुरायाला पाहायला मिळणार नाही. संतांच्या पादुका घेऊन मोजकीच मंडळी पंढरीला विठ्ठलाचं दर्शन घेतील. शिस्त, संयम पाळून परंपरा अखंड राहील. सरकारने यासाठी सर्व व्यवस्था केली आहे.

वारीला ज्यांना ज्यांना शक्य झालं झालं नाही त्यांनी उद्या मनोमन विठ्ठलाचे स्मरण करायचं. ‘हेची दान देगा देवा’ म्हणताना त्याच्याकडून आत्मबळ मागायचं. कारण बहिणाबाई चौधरी यांनी कवितेत म्हटल्याप्रमाणे ‘त्याने’ दोन डोळे दहा बोटं आधीच दिली आहेत. शिवाय समस्त विचार करण्याची शक्तीही विराटकाराकडून लाभली आहे. यावेळी भक्त पुंडलिकाची गोष्ट आठवावी. माता-पित्याच्या सेवेचं कर्तव्य पार पाडत असताना त्याने विठ्ठलाला थांबायला सांगितले. तेव्हापासून तो भक्तांसाठी विटेवर उभा आहे. कार्तिकी एकादशीपर्यंत सर्व संकटाचं मळभ दूर झालं की अधिक जल्लोषात ‘पाऊले चालती पंढरीची वाट’ असं दृश्य दिसेल. तोपर्यंत कर्तव्य महत्त्वाचे. विठ्ठल भक्तांसाठी तिष्ठत राहतोच. तेव्हा पुंडलिकासाठी थांबला आणि आताही त्यांच्या लाखो भक्तांची ओढ त्यालाही आहेच की. शेवटी ती ‘विठाई माऊली’ आहे.

आपली प्रतिक्रिया द्या