
>> मोहन एस. मते
जुलैच्या उत्तरार्धात पडलेल्या घमासान मान्सूनने राज्यातील काही धरणांची पाणीपातळी उंचावली खरी, परंतु गेल्या 25 दिवसांपासून पावसाने पुन्हा दडी मारली आहे. ऑगस्ट–सप्टेंबर या महिन्यात चांगले पर्जन्यमान न झाल्यास आज जी धरणे भरली आहेत ती तशीच पुढील सहा–आठ महिने कायम राहतीलच असे सांगता येत नाही. निम्मा पावसाळा संपत आला तरी सरासरीपेक्षा 20 टक्के पाऊस कमी असेल तर तिथल्या शेतीवर आणि पिण्याच्या पाण्याच्या समस्येवर निश्चितच गंभीर परिणाम होऊ शकतो. हे लक्षात घेऊन आतापासूनच जलनियोजनावर भर देणे गरजेचे आहे. अन्यथा धरणे भरल्याचा आनंद औटघटकेचा ठरून टंचाईच्या झळांना सामोरे जावे लागू शकते.
संपूर्ण देशभरात यंदा मान्सूनच्या लहरीपणाची बोलकी झलक दिसून आली आहे. एकीकडे हिमाचल प्रदेशामध्ये सातत्याने अतिवृष्टी, ढगफुटी होत आहे, तर दुसरीकडे जुलै महिन्यात काही दिवस घमासान बरसून गेलेला मान्सून महाराष्ट्रातून गायब झाला आहे. मुळात यंदा मान्सूनचे आगमनच उशिरा झाले आणि जून महिना तर पूर्णपणाने कोरडा गेला. मान्सूनच्या अभ्यासकांच्या मते आणि शेतीक्षेत्राच्या दृष्टीने जून-जुलै हे पावसाळय़ाचे दोन महिने अधिक महत्त्वाचे असतात. कारण खरिपाच्या पेरण्या या काळात होत असतात, पण यंदा हे दोन्ही महिने शेतकऱ्यांची चिंता वाढवणारे ठरले. पावसाचे एकंदर ऋतूमान बदलत चालले आहे हे आपण अलीकडे अनुभवतो आहे. सलग कोरडय़ा दिवसांचा मोठा पट्टा आणि नंतर तीव्र मुसळधारांचा कमी काळात आक्रमक वर्षाव असे हे पावसाचे नवे वर्तन आहे.
राज्यात 1 जून ते 8 ऑगस्ट या कालावधीत कोकण किनारपट्टीवरील जिल्हे वगळता अन्य भागांत पावसाचे एकूणच प्रमाण कमी असल्याचे निदर्शनास आले आहे. राज्यातील एकूण जिल्हावार विचार केला तर महाराष्ट्रातील 30 ते 35 टक्के भाग अजूनही कोरडा आहे. शेतीसाठी पाऊस आवश्यक मानला जातो तेवढा तिथे झाला नसल्याने शेतकरी वर्ग आज चिंताक्रांत आहे. अनेक जिह्यांत सरासरीच्या 25 ते 30 टक्क्यांहून कमी पाऊस झाला आहे. राज्यातील 36 जिह्यांपैकी 22 ते 24 जिह्यांत सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. 20 टक्क्यांहून कमी पाऊस झालेले जिल्हे सरासरीपेक्षा कमी पावसाचे म्हणून जाहीर केले जातात. त्यानुसार नगर, सांगली, सातारा, संभाजीनगर, हिंगोली, जालना आणि अमरावती या जिह्यांत 20 ते 22 टक्क्यांहून कमी पाऊस झाला आहे.
कोकण किनारपट्टीवर पावसाने सरासरी गाठली आहे. किनारपट्टीवरील अन्य जिह्यांत सरासरीच्या 20 टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस झालेला नाही. देशाचा विचार करता 7 जून ते 10 ऑगस्ट या काळात देशात सरासरी 518.3 मिमी पाऊस पडतो. यंदा 524.3 मिमी म्हणजे सरासरीपेक्षा एक टक्का पाऊस जास्त झाला. राज्यात या काळात सरासरी 622.7 मिमी पाऊस पडतो, तो यंदा 641.1 मिमी म्हणजे सरासरीपेक्षा तीन टक्के जास्त पाऊस झाला आहे. पण विभागनिहाय विदर्भात दोन टक्के, मराठवाडय़ात चार टक्के, मध्य महाराष्ट्रात नऊ टक्के पाऊस कमी झाला आहे. कोकण विभागात सरासरीच्या 20 टक्के पाऊस झाला आहे.
आजघडीस महाराष्ट्रातील धरण साठय़ामध्ये अशी थोडी तूट दिसत असली तरी नागपूर, मुंबई, कोल्हापूर, ठाणे, नाशिक या शहर आणि परिसरांना वर्षभर पाणी पुरवणारी धरणे सध्या सुस्थितीत आहेत, पण परंपरेनुसार चालत आलेली शहरांची जलवापर संस्कृती आणि प्रचंड पाणी लागणारी शेतीपिके यांचा विचार करता ही सुस्थिती पुरेशी नाही.
पिण्याच्या पाण्याची समस्या जुलैअखेरपर्यंतच्या पडलेल्या पावसामुळे झाली असे जरी वाटत असले तरी ऑगस्ट-सप्टेंबर या महिन्यातदेखील चांगला पाऊस पडणे गरजेचे आहे. अन्यथा आज जी धरणे भरली आहेत ती तशीच पुढील सहा-आठ महिने कायम राहतीलच असे सांगता येत नाही. पिण्याच्या पाण्याची समस्या विचारात घ्यायची असेल तर वर्षभरासाठी लागणारा आवश्यक असणारा पाणीसाठा गरजेचा आहे. देशात ऑगस्ट महिन्यात तब्बल 36 टक्के कमी पाऊस झाला, तर महाराष्ट्रातील पाऊसमान तब्बल 70 टक्क्यांपर्यंत कमी आहे. राज्यातील केवळ एक जिल्हा वगळता इतर जिह्यांमध्ये 90 टक्क्यांपेक्षा जास्त तूट आहे. हवामान खात्याने सांगितलेला अंदाज लक्षात घेतला तर ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यामध्ये दमदार पाऊस पडेल, असे दिसत नाही. एल निनो सक्रिय झाल्यामुळे या दोन महिन्यांच्या कालावधीत पावसाने दडी मारली तर मात्र पिकांसाठीच्या पाण्याची आणि पिण्याच्या पाण्याची समस्या भेडसावणार आहे.
गेल्या आठ-दहा दिवसांपासून पावसाने पुन्हा दडी मारल्याने शेतकरी आणि सामान्य नागरिक वरुणराजाची आतुरतेने वाट पाहत आहे. राज्यातील धरणांमधील एकूण सरासरी साठा गेल्यावर्षी 75.35 टक्के होता. यंदा 30 जुलै रोजी तो 59.40 टक्के होता. ही तूट आता ऑगस्ट निम्मा आणि सप्टेंबर पूर्ण अशा जवळपास दीड-दोन महिन्यांत भरून निघावी अशी अपेक्षा आहे. राज्य सरकारने प्राधान्याने या सगळय़ा परिस्थितीवर अत्यंत काटेकोरपणे बारीक नजर ठेवण्याची आवश्यकता आहे. केवळ धरणे भरली म्हणजे काही अडचण नाही या भ्रमात न राहता किंवा त्यावर फारसे समाधान न मानता जो पाणीसाठा आज आहे तो पुढील जूनपर्यंत टिकेल का? याचा विचार करणे अधिक आवश्यक ठरते. वाढत्या लोकसंख्येचा आणि नागरीकरणाचा विचार करता शहरांमधून पाण्याचा पुनर्वापर होत नाही ही अधिक चिंतेची बाब आहे. यातील दुसरा महत्त्वाचा आणि आवश्यक असणारा असा भाग म्हणजे पाण्याच्या शुद्धीकरणाचा आहे. राज्य सरकारने सहा वर्षांपूर्वी 2017 मध्ये पुनर्वापर तसेच जलप्रक्रिया धोरण जाहीर केले होते. त्यानुसार 160 ते 165 टीमसी पाणी हे घरगुती, तर 20 ते 22 टीएमसी पर्यंत औद्यौगिक वापरासाठी लागत होते. यातील 15 ते 20 टक्के पाण्यावरही प्रक्रिया होत नव्हती आणि आजही हे प्रमाण म्हणावे तसे वाढलेले नाही. जगातील काही देशांचा विचार करताना प्रामुख्याने इस्त्रायल हा एक लहान देश असूनसुद्धा त्या देशात जवळपास 90 ते 95 टक्के पाण्यावर अत्यंत काटेकोरपणे पाण्यावर प्रक्रिया करून ते अधिक शुद्ध करून त्याला वापरात आणले जाते. ते शेवटच्या थेंबापर्यंत पुनः पुन्हा वापरले जाते, अशी स्थिती आपल्याकडे कधी निर्माण होणार?
आजही महाराष्ट्रातल्या कितीतरी भागांत 50 टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस पडतो, परंतु जानेवारीमध्येच तेथे पाण्याची समस्या निर्माण होते आणि संबंधित प्रशासनाला पाणी कपात करणे भाग पडते. विशेष म्हणजे अनेक जिह्यांमध्ये चार ते आठ दिवसांतून एकदा पिण्याचे पाणी पुरवले जाते ही परिस्थिती अतिशय दुर्दैवी आहे. राज्य स्तरावरील, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या, जिह्याच्या तालुक्याच्या खेडय़ापाडय़ातील प्रशासकीय यंत्रणेच्या नियोजनशून्यतेचे निदर्शक आहे. पावसाचा हा परिणाम सर्व बाजूंनी विचारात घेऊन उपाययोजना कराव्या लागतील.
महानगरे किंवा शहरांना पाणी पुरविणारी धरणे भरल्याचा जो आनंद सर्वांना होतो, तो स्वाभाविक असला तरी आपण पाणी आणि जलसंस्कृती हा विषयच गंभीरपणे घेत नाही. त्याचे परिणाम किंवा फटके कधी अवर्षणाने बसतात, तर कधी गावा-शहरांना पुरांचे तडाखे बसून सोसावे लागतात. सबब, पाण्याचे नियोजन किंवा जलसाक्षरता वाढवण्यातच शहाणपण आहे.
(लेखक मुक्त पत्रकार आहेत)



























































