वेबसीरिज – रहस्याचा मागोवा

>> तरंग वैद्य

गुन्हेगारांनीच गुन्हेगाराला शोधायचे अशा उत्कंठावर्धक प्लॉटवर बेतलेली रंजक मालिका ‘अपहरण’. अपहरणकर्त्यांची आणि पोलिसांची कार्यपद्धती दाखवणारी, रहस्य-रोमांचाने भरलेली ही मालिका नक्की बघावी अशी आहे.

सत्तर-ऐंशीच्या दशकात किडनॅपिंग म्हणजेच अपहरण या गुह्याचे प्रमाण खूप जास्त होते. श्रीमंतांच्या पोरांचे अपहरण करायचे आणि बक्कळ पैसे मागायचे… रक्कम नाही दिली आणि पोलिसांत गेलात तर मुलाला मारून टाकू अशी धमकी दिली असल्यामुळे बरेच लोक पोलिसांच्या फंदात न पडता परस्पर पैसे देऊन आपल्या मुलाची सुटका करून घ्यायचे. हा विषय घेऊन बालाजी टेलिफिल्म्सने त्यांच्या ओटीटी प्लॅटफॉर्म अल्ट बालाजीवर 14 डिसेंबर 2018 साली ‘अपहरण’ नावाची वेब सीरिज आणली, जी आपण जिओ सिनेमावरही बघू शकता.

या वेब सीरिजचे कथानक खूप वेगळे आहे. एका अपहरणाबद्दल पोलिसांना समजते आणि त्यांचा सक्षम अधिकारी रुद्र श्रीवास्तव घटनास्थळी पोहोचतो. किडनॅपर्सना याचा सुगावा लागतो आणि ते मुलाला परत न करता त्याची हत्या करून तेथून पळ काढतात. ठपका रुद्रवर येतो आणि कसलीही चूक नसताना त्याला तीन वर्षांची शिक्षा होते. शिक्षा पूर्ण झाल्यावर रुद्रकडे काहीच काम नसतं. पुढे काय करावं या विवंचनेत असताना मधु त्यागी एक प्लॅन घेऊन त्याच्याकडे येते. मधु उद्योगपती त्यागीची बायको असते. प्लॅन साधासोपा असतो. रुद्रने तिच्या सावत्र मुलीचे अपहरण करायचे आणि 2 कोटींची मागणी करायची. पैसे मिळाले की, त्याचा हिस्सा घेऊन गप्प व्हायचे.

प्लॅन सोपा अशासाठी असतो. कारण त्यात घरचीच व्यक्ती सहभागी असणार असते. ‘हो’-‘नाही’ म्हणत रुद्र होकार देतो आणि तो त्या मुलीचे अपहरण करतो. इथे त्यागी पोलिसांत जातो आणि सोपं काम कठीण होऊन जातं. पुढे ही मुलगी अनपेक्षितरीत्या आत्महत्या करते. मुलीचा सुगावा लागत नाही हे बघून त्यागी पोलिसांवर दबाव टाकतो आणि मग पोलिसांचे उच्च अधिकारी त्यांच्या ‘अपहरण स्पेशालिस्ट’ अधिकाऱयाला म्हणजेच रुद्रला नोकरीवर रुजू करत त्याच्या खांद्यावर ही केस टाकतात. गुन्हेगारांनीच गुन्हेगाराला शोधायचे. आहे ना इंटरेस्टिंग! 22 ते 27 मिनिटांच्या 12 भागात फुलवलेली ही कथा रंजक व उत्कंठा वाढवणारीही आहे.

रुद्र श्रीवास्तवच्या भूमिकेत उंचपुऱया अरुणोदय सिंगने कमाल केली आहे. एक प्रामाणिक अधिकारी असूनही शासन तंत्राचा बळी पडून हतबल झालेला, पुढे परिस्थितीमुळे गुन्हेगार झालेला आणि मग नोकरीत रुजू झाल्यावर गुन्हेगाराला म्हणजेच स्वतला वाचवायचे की नोकरीतील निष्ठा कायम ठेवायची ही संभ्रमावस्था…हे सर्व दाखवणे सोपे काम नाही. माही गिलने काहीशी नकारात्मक असलेली भूमिका उत्तमरीत्या निभावली आहे. इतर कलाकारांमध्ये वरुण बडोला, सानंद वर्मा, मोनिका चौधरी, निशा सिंगसारखी नावं आहेत.

मालिकेचे वैशिष्टय़ किंवा वेगळेपण म्हणजे त्याचे पार्श्वसंगीत. सत्तर-ऐंशीच्या दशकांतील सिनेमातील हिट गाणी आणि त्यांचे संगीत खूप सुपीक डोक्याने वापरले आहे. अशा पार्श्वसंगीतामुळे वेब सीरिज न बघता आपण सिनेमा बघतोय असा फील येतो. प्रत्येक भागाला शीर्षक दिले आहे, जे सिनेमाचे नाव किंवा गाणे आहे, जसे एपिसोड 1 चे नाव आहे ‘एक हसीना थी, एक दिवाना था’, तर भाग 8 ‘गुमनाम है कोई!’

मालिकेची पार्श्वभूमी उत्तर प्रदेश, आताचा उत्तराखंड आहे. तेथील परिसराचे आणि विशेषकरून हरिद्वार, गंगा नदीच्या घाटांचे, हृषिकेश येथील लक्ष्मण झुला परिसराचे चित्रीकरण खूप छान आणि प्रभावी पद्धतीने केले गेले आहे. त्यासाठी छायाचित्रकाराचे कौतुक आहे. पाठलागांचे प्रसंग आपल्याला गुंतवून ठेवतात. संवाद प्रभावी आहेत, अपशब्द कमी वापरता आले असते तर बरे झाले असते.

अपहरण या गुह्याने एक काळ गाजवला होता. त्यामुळे अपहरणकर्त्यांची आणि पोलिसांची कार्यपद्धती दाखवणारी, रहस्य-रोमांचाने भरलेली ही मालिका नक्की बघा आणि जर आवडली तर 2022 मध्ये आलेला याचा पुढचा भाग ‘अपहरण-2’ पण बघा.

[email protected]

 (लेखक सिनेदिग्दर्शक व पटकथाकार आहेत)