वेबसीरीज – राजकीय नाटय़

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>>तरंग वैद्य

राजकीय नाटय़ाने नटलेली ‘महारानी’ ही वेबसीरिज म्हणजे वीस भागांचे राजकीय नाटय़. बिहारचे पूर्व मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव आणि  त्यांच्या पत्नी राबडीदेवी या दोघांच्या आयुष्याशी साधर्म्य दाखवणारे कथाबीज असणारी ही वेबसीरिज राजकारणातला सत्तासंघर्ष दशर्वते.

‘महारानी’…असं वाटतं, आपण कुठली तरी ऐतिहासिक किंवा पौराणिक विषयावर बेतलेली गोष्ट बघणार आहोत, पण पहिले दृश्य जेव्हा बिहारच्या एका गावातील दिसते तेव्हा लक्षात येते की, कथा आजचीच आहे. पहिल्या दृश्यात जेव्हा आपण बघतो की, राज्याचा मुख्यमंत्री गावातील आपल्या घरी आलाय. पुस्तकी भाषेत अशिक्षित, पण घरकामात वाघ असलेल्या बायकोला भेटतो तेव्हा असं वाटतं, अरे, ही कथा तर आपल्याला माहीत आहे आणि पटकन लक्षात येतं, की हे तर बिहारचे पूर्व मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव आणि या त्यांच्या पत्नी राबडीदेवी! कथाबीज या दोघांच्या आयुष्याशी साधर्म्य दाखवत असेल कदाचित, पण कथा पूर्णत काल्पनिक आहे.

राजकीय नाटय़ाने नटलेली ‘महारानी’ ही वेबसीरिज सोनी लिव्ह या ओटीटी प्लॅटफॉर्मवर  मे 2021 मध्ये दहा भागांचा पहिला सीझन घेऊन आली आणि जुलै 2022 मध्ये परत सीझन दोन- दहा भागांची, असे एकूण वीस भागांचं राजकीय नाटय़. मुख्यमंत्री भीमा भारतींची जबरदस्त राजकीय पकड आहे. जेव्हा त्यांच्या लक्षात येतं की, त्यांच्यावरचे  भ्रष्टाचाराचे आरोप सिद्ध होणार आणि त्यांना जेलमध्ये जावं लागणार तेव्हा ते आपल्या खास माणसाला डावलून आपल्या अशिक्षित पत्नी रानी भारतीला मुख्यमंत्र्याच्या खुर्चीवर बसवून जेलमध्ये जातात… अगदी लालूप्रसाद यांनी जुलै 1997 मध्ये केलं होतं तसंच. पुढे बळजबरीने झालेल्या अशिक्षित मुख्यमंत्री बाई आपल्या स्वीय सचिवाच्या मदतीने स्वतला सावरतात. हळूहळू सत्ता चालवायला शिकतात (अर्थात सत्ता भीमा भारती म्हणजेच त्यांचे पतिदेव जेलमधून चालवत असतात, या फक्त सह्याजीराव). ही आहे पहिल्या दहा भागांची कथा.

मुख्यमंत्री म्हटलं की, लोकांच्या भेटीगाठी आल्याच, राज्याचा दौरा करणं क्रमप्राप्त, विरोधकांच्या आरोपांना उत्तर देण्यासाठी त्या आरोपांची सत्यता पडताळणं आवश्यक. हे सर्व करत असताना नकळतच रानी भारतीच्या लक्षात येतं की, बिहारमध्ये ‘जंगल राज’ आहे आणि हे एक कटुसत्य आहे. मुख्यमंत्री या नात्याने या ‘जंगल राज’ची ती राणी आहे आणि या अराजकतेची संपूर्ण जबाबदारी तिची आहे. ती हे ‘जंगल राज’ संपवण्यासाठी पुढाकार घेते. चार पावलं पुढे गेल्यावरच रानीला कळतं की, या अराजकतेच्या मागे तिचाच नवरा आहे, पण ती आता मागे हटत नाही आणि आपल्या नवऱयाच्या समोर खंबीरपणे उभी राहते.

राजकारण म्हणजे एकेकाळी समाजसेवा समजली जायची. पण आज राजकारण म्हणजे नफ्याचा व्यवसाय. जिथे पैसा आहे आणि सत्ताही आहे. युद्धात आणि प्रेमात सर्व माफ हे सर्वश्रुत आहे. आजच्या राजकारणात खऱयाचं खोटं, खोटय़ाचं खरं करणं, स्वतच्या फायद्यासाठी दुसऱयाच्या तोटय़ाचा विचार न करणं, सत्तेच्या मोहापायी नातेसंबंध बाजूला सारणं, लोकांचा सर्रास वापर करणं, जातीचं राजकारण, वेळप्रसंगी हत्या… सर्वच माफ आहे.

एक स्त्राr जिचं विश्व घर आणि गावापर्यंतच मर्यादित असतं. तिला अचानक शहरात यावं लागतं, स्वप्नातही विचार न केलेल्या जबाबदाऱया पेलाव्या लागतात. तेव्हा तिची कशी तारांबळ उडते याचं उत्तम प्रदर्शन आपल्या आविर्भावाने आणि देहबोलीने रानी म्हणजेच हुमा कुरेशी या अभिनेत्रीने दाखवून दिलं आहे. मुख्यमंत्री झाल्यावर शपथविधी समारोहात शपथ घेताना आपल्याला नीट बोलताही येत नाही याची खंत आणि लोक आपल्याला हसत आहेत हे समजून लाजिरवाणे भाव हुमाची अभिनयातली ताकद दाखवून देतात. मुलांना जशी शाळेची भीती वाटते तेव्हा त्यांना बळजबरीने शाळेत नेलं जातं, अगदी तसाच प्रसंग रानीबरोबर चित्रित केला आहे. तिला जबरदस्तीने मंत्रालयात नेलं जातं. पुढे रानीला आपल्या पदाची गरिमा आणि जबाबदारीची जाणीव होते आणि मग ती आपलं सर्वस्व लावून राज्याच्या प्रगतीसाठी असे काही निर्णय घेते की, विरोधकांबरोबर तिचा नवराही अचंबित होतो.

एक करारी राजकारणी, ‘मीच सर्वकाही’चा अहंकार बाळगणारा मुख्यमंत्री सोहम शाहने छान साकारला आहे. राजकारण म्हटलं की, विरोधी पक्षनेते, पोलीस हे सगळे आलेच. अमित सियाल मुख्यमंत्रीपदाची महत्त्वाकांक्षा बाळगणारे विरोधी पक्षनेते आहेत. त्यांची ही इच्छा त्यांच्या डोळय़ांतून, वागण्यातून दिसून येते. कानी सुकृतीचा विशेष उल्लेख केला पाहिजे, जी या मालिकेत रानीची स्वीय सहाय्यक आहे. शिष्टाचार म्हणजेच

‘प्रोटोकॉल’ सांभाळणं आणि कधी प्रेमाने तर कधी रागाने रानीला घडवण्याचं काम तिने सहजतेने पार पाडलं आहे.

पुढे जेलमधून सुटून आल्यावर भीमा भारती अर्थातच सत्ता आपल्या हातात घेण्याचा प्रयत्न करतात. पण आता रानीची  महत्त्वाकांक्षाही वाढली असल्यामुळे ती खुर्ची सोडण्यास तयार होत नाही, शिवाय तिला सत्तालोलुप नवऱयाचं खरं रूप कळलेलं असतं. मग नवरा-बायकोमध्येच सत्तासंघर्ष सुरू होतो. इतर काही नेते यात तेल ओततात, तर काही आपली पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न करतात.  सत्तेसाठी कुरघोडी, पैसा, जातीचा वापर, दंगे, घोडेबाजार हे सगळं दाखवत मालिका संपते… पण तात्पुरतीच. कारण भीमा भारती की रानी भारती? हा प्रश्न प्रेक्षकांसमोर उभा राहतोच. त्यामुळे ‘भाग 3’ म्हणजेच ‘सीझन 3’ येणार हे नक्की. पहिल्या दोन सीझनमध्ये राजकारणातील हेवेदावे, गुणदोष, बारकावे खूप रंजक पद्धतीने चित्रित केलं असल्यामुळे मी या मालिकेत गुंतलो आणि म्हणूनच पुढच्या सीझनची आतुरतेने वाट बघतोय.

[email protected]

 (लेखक सिनेदिग्दर्शक व पटकथाकार आहेत)