व्हॉट्सऍप – उघड आणि छुपे धोके

>> अतुल कहाते

फेसबुकच्या धर्तीवर आता व्हॉट्सऍपद्वारे आपल्या गोपनीय माहितीवर नजर ठेवण्यात असल्याचे जाहीर करण्यात आले आणि जगभरातील व्हॉट्सऍप वापरकर्त्यांमध्ये याबाबत गोंधळ सुरू झाला आहे. आता आपली कोणतीही माहिती खासगी राहणार नाही. आपल्यावर पाळत ठेवण्यासाठी हे एक साधन आहे, अशा अनेक शंका उपस्थित केल्या जात आहेत ज्या रास्त आहेत, परंतु त्याबरोबरच याला प्रत्यय काय आणि असलाच तर तो कितपत खात्रीशीर आहे याचाही शोध घ्यावा लागेल.  

इतके दिवस फेसबुक आणि इतर कंपन्या चोरून आपली माहिती वापरत होत्याच. 2016 साली डोनाल्ड ट्रम्पसारखा माणूस अमेरिकी राष्ट्रपतीपदावर पोहोचण्यामागे फेसबुक कंपनीने ‘केम्ब्रिज ऍनॅलिटिका’ या कंपनीला मदत करण्याचा मुद्दा होता. म्हणजेच जागतिक पातळीवरच्या उलथापालथी घडवू शकण्याची क्षमता या कंपन्यांमध्ये होतीच. फक्त त्याची व्हॉट्सऍपपुरती अधिकृत कबुली देण्याचा प्रश्न होता तो आता सुटला. जगभरात आणि खास करून हिंदुस्थानात ‘व्हॉट्सऍप विद्यापीठ’ मोठय़ा प्रमाणावर कार्यरत असते हे आता लोकांना काही प्रमाणात समजायला लागले आहे. बेमालूम खोटय़ा बातम्या पसरवणे, द्वेष पसरवणे, ठरावीक नेत्यांची प्रतिमा उजळवणे, इतरांवर तुटून पडणे, बोगस खाती काढून ‘लाईक्स’ मिळवणे हे प्रकार हिंदुस्थानामध्ये मोठय़ा प्रमाणावर सुरू असतात. याची कबुलीसुद्धा काही नेत्यांनी अगदी अभिमानाने दिलेली आहे. एकीकडे अक्षरशः आपली बुद्धी गहाण टाकल्याप्रमाणे लोक या माध्यमांना शरण जात असताना आता व्हॉट्सऍप त्यांची माहिती मिळवणार आणि साठवणार यात आक्षेपार्ह वाटण्यासारखे काहीच नाही असेही खेदाने म्हणावेसे वाटते. कळपातल्या मेंढय़ांना कोण खाणार, एवढाच तो प्रश्न आहे.

आपली बरीच खासगी माहिती आता व्हॉट्सऍप गोळा करणार या बातमीमुळे सगळीकडे एकच खळबळ माजली आहे. यामुळे नेमके काय होणार याविषयी उलटसुलट प्रकारची माहिती येत असल्यामुळे सगळ्यांचा अजूनच गोंधळ होत आहे. एकीकडे अशी माहिती गोळा केली जाणार याचे फार काही विशेष सोयरसूतक नसलेली मंडळी आहेत, तर दुसरीकडे यामुळे आपण व्हॉट्सऍप वापरणे बंद करून टाकणार अशी घोषणा करणारेही लोक आहेत. साहजिकच याविषयी अचूक माहिती मिळवणे आणि आपल्या दृष्टीने वैयक्तिक पातळीवर योग्य निर्णय घेणे गरजेचे झाले आहे.

मुळात व्हॉट्सऍपसारख्या सुविधा फुकटात उपलब्ध करून दिल्या जातात, त्याच लोकांची माहिती मोठय़ा प्रमाणावर गोळा करण्याच्या उद्देशाने. गुगल, फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर आणि अशा सगळ्या सुविधांच्या मुळाशी हेच धोरण असते, अन्यथा या कंपन्या चालूच शकणार नाहीत. कारण या कंपन्यांनी काहीही विकले नाही तर त्यांना उत्पन्न कुठून मिळणार? यामुळे अत्यंत चतुरपणे या कंपन्या आपल्या अतिशय उपयुक्त आणि अक्षरशः व्यसन लावतील अशा सुविधा फुकट उपलब्ध करून देतात. लोक त्या वापरायला लागल्यावर या कंपन्यांकडे खूप मोठय़ा प्रमाणावर माहिती गोळा होत राहते. आजच्या जगामध्ये माहितीचे महत्त्व प्रचंड वाढल्यामुळे ही माहिती या कंपन्या वापरतात तसेच ही माहिती त्या इतरांना विकतातही. याच माहितीच्या आधारे जाहिराती दाखवण्यापासून निवडणुका जिंकण्यापर्यंतच्या असंख्य गोष्टी साध्य होतात. हे सगळं फुकट उपलब्ध असल्याच्या भ्रमात लोक या सुविधा अधिकाधिक प्रमाणात वापरत जातात आणि शेवटी या सुविधा उपलब्ध नसणे किंवा त्या बंद होणे म्हणजे जणू अन्न-पाणी किंवा प्राणवायू नसल्याप्रमाणे त्यांची कुंठित अवस्था होते. म्हणूनच व्हॉट्सऍप काही मिनिटे जरी बंद पडले तरी त्याची जागतिक पातळीवरची बातमी होते.

व्हॉट्सऍप ही मूळची स्वतंत्र कंपनी होती. आपल्याला अवाक करून सोडणाऱया मूल्याला फेसबुक कंपनीने ती गिळंकृत करून टाकली. इन्स्टाग्रामचेही तेच. सुरुवातीपासूनच फेसबुक कंपनीची धोरणे ही अधिकाधिक माहिती गोळा करत राहणे, आपली एकाधिकारशाही वाढवणे अशाच प्रकारची राहिलेली आहेत. वरवर आपण लोकशाहीवादी असल्याचे आणि आपल्या माध्यमातून जगातल्या कानाकोपऱयांमधल्या लोकांना आवाज मिळवून देत असल्याचे फेसबुक म्हणत असले तरी प्रत्यक्षात हे उदात्त विचार निव्वळ कागदोपत्री प्रकारचेच आहेत. याचे अनेक दाखले आजवर मिळालेले आहेत. आपल्याला व्हॉट्सऍप, इन्स्टाग्राम यांसारख्या कंपन्या जोरदार टक्कर देऊ शकतात हे लक्षात आल्यावर साम-दाम-दंड-भेद वापरून फेसबुकने या कंपन्या विकत घेऊन टाकल्या आणि आपली धोरणे त्यांच्यावर हळूहळू लादायला सुरुवात केली. स्वाभाविकपणे कधी ना कधी मुक्त समजले जाणारे व्हॉट्सऍप हे फेसबुकच्या धर्तीवर आपल्यावर पाळत ठेवण्यासाठीचे तसेच आपला फक्त वापर करून घेण्यासाठीचे साधन म्हणून वापरले जाणार हे उघडच होते. त्याचाच ताजा आविष्कार आपल्याला आता बघायला मिळतो आहे. आपली आधीची भूमिका बदलून व्हॉट्सऍपने आता आपण आपल्या वापरकर्त्यांच्या जवळपास सगळ्याच माहितीवर नजर ठेवणार असल्याचे जाहीर करून टाकले आहे.

काही लोक याची गल्लत ‘‘एण्ड टू एण्ड एक्रिप्शन’’ संपणार असे म्हणून करतात, पण ते चुकीचे आहे. व्हॉट्सऍपचा संदेश तो संदेश पाठवणारा आणि ज्याला तो पाठवला आहे तो माणूस या दोघांमध्ये प्रवास करत असताना ‘च’च्या भाषेमध्ये म्हणजेच ‘एक्रिप्ट’ करून सुरक्षित केलेले असतात. त्यात काहीही बदल होणार नाही. बदल होणार आहे तो या संदेशव्यतिरिक्त माहितीच्या बाबतीत. उदाहरणार्थ, आपण कुठे आहोत हे आपल्या फोनच्या लोकेशनवरून किंवा आयपी ऍड्रेसवरून व्हॉट्सऍपला आताही कळू शकते, पण सध्या व्हॉट्सऍप त्याकडे दुर्लक्ष करते असे अधिकृतपणे सांगितले जाते. आता मात्र व्हॉट्सऍप त्याकडे नजर ठेवून त्याची नोंद करणार. आपल्या फोनमधल्या इतरही अनेक गोष्टी व्हॉट्सऍप आता स्वतःकडे नोंदवणार. तसेच इतरांनासुद्धा ही माहिती उपलब्ध करून देणार. साहजिकच आपल्याविषयीची बारीसारीक माहिती व्हॉट्सऍप आणि व्हॉट्सऍपमुळे आपल्या फोनमध्ये अवतरलेल्या इतर कंपन्या यांना मिळू शकणार आहे आणि आपण ही माहिती आता वापरणार आहोत अशी जाहीर कबुली ते देत आहेत.

व्हॉट्सऍप ही माहिती आता मिळवणार असेल तर त्याला पर्याय काय? टेलिग्राम, स्नॅपचॅट, सिग्नल अशा काही पर्यायांकडे काही लोक वळतील. त्यांच्याविषयीची हमी कशी द्यायची? भविष्यात त्यामधलेही कुणी कुणाला विकले गेले, कुणी आपली धोरणे बदलली तर काय, हा प्रश्न आहेच. साहजिकच काही जणांना आपणही ‘आत्मनिर्भर’ होऊन हिंदुस्थानातच याला पर्याय शोधावा असे वाटते. त्यात थोडे फार तथ्य असले तरी मुळात या पर्यायामागचे हेतू उदात्त असतील का? एकेदिवशी अचानकपणे ‘आरोग्य सेतू’ ऍप अवतरले, त्याचा वापर अनिवार्य झाला आणि नंतर ‘‘तो मी नव्हेच’’ असे म्हणत सरकारने त्याची जबाबदारी एकदम झटकून टाकली. अगदी आधारकार्डाच्या बाबतीतसुद्धा हाच प्रकार घडलेला आहे. स्वाभाविकपणे हिंदुस्थानमध्ये व्हॉट्सऍपला पर्याय उभा राहिला तरी त्यावर भोळेपणाने विसंबून राहणे हे कदाचित जास्त धोकादायक ठरू शकेल. याचे कारण म्हणजे हा पर्याय सुरक्षित कशावरून, या पर्यायाचे जनक कोण, त्यातून गोळा होत असलेली माहिती कुठे जाणार, ती कोण आणि कशासाठी वापरणार, त्या माहितीच्या आधारे लोकांवरच पाळत कशावरून ठेवली जाणार नाही अशा अनेक प्रश्नांची ठाम उत्तरे ‘‘आम्ही सांगतो म्हणून…’’च्या पलीकडे मिळतील असे वाटत नाही. अगदी लांबच कशाला जायचं, काही वर्षांपूर्वी इस्रायलच्या ‘पिगॅसस’ नावाच्या सायबर हल्ल्याने हिंदुस्थानमधल्या अनेक राजकीय नेत्यांच्या व्हॉट्सऍपमधली माहिती भेदून ती कुणाला विकली या प्रश्नाचे उत्तरही आपल्याला अजून मिळालेले नाही!

आपण जितके समाज माध्यमांमध्ये गुंतून राहू आणि त्यातच गुरफटून जाऊ तितकी आपली विचारशक्ती खुंटत जाईल. त्याच्या जोडीला आता अधिकृतपणे आपली माहितीसुद्धा वापरली जाईल अशी जाहीर कबुली व्हॉट्सऍपने दिली आहे. एकीकडे लोकशाही, विचारस्वातंत्र्य याविषयीच्या बाता मारायच्या आणि दुसरीकडे प्रत्यक्षात याच्या अगदी उलट कृती करायच्या हेच या सर्व कंपन्यांचे धोरण आहे. व्हॉट्सऍप ही एकमेव कंपनी त्याला जबाबदार नाही. गुगलच्या सर्च इंजिनवर आपण काहीही शोधल्यावर आपल्याला नेमके काय हवे यापेक्षा गुगलला आपण काय बघणे जास्त फायदेशीर आहे याचा विचार केलेला असतो. ट्विटरवर खोटा मजकूर, खोटी खाती यांची रेलचेल असते. हे सगळे अंधपणे बघत राहणे आणि फक्त व्हॉट्सऍपने आता आपल्या नियमावलीमध्ये बदल केले म्हणून आरडाओरडा करणे हा दुटप्पीपणा नाही तर दुसरे काय?

थोडक्यात सांगायचे तर, व्हॉट्सऍपने आपली माहिती जास्त प्रमाणात गोळा करणे, ती साठवणे, विकणे हे आजच्या भांडवलशाही आणि एकाधिकारशाही यांनी व्यापून टाकलेल्या समाजाचे प्रतीकच आहे. आपल्याला व्हॉट्सऍपने हे कळवले म्हणून आपण त्याविषयी इतकी चर्चा करतो, पण दुसरीकडे आपल्याला आपल्या डोळ्यांदेखत अनधिकृतपणे वापरत असलेल्यांच्या बाबतीत आपल्याला काहीही म्हणावेसे वाटत नाही ही यामधली खरी शोकांतिका आहे!

[email protected]

(लेखक माहिती तंत्रज्ञान तज्ञ आहेत.)

आपली प्रतिक्रिया द्या