
>> अभय मोकाशी
जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ)चे सरचिटणीस तेद्रोस अधनोम घेब्रेयेसुस यांच्या मते आरोग्य हा मानवी अधिकार आहे, कोणी गरीब आहे अथवा कोणापर्यंत सेवासुविधा पोहोचत नाही म्हणून कोणी आजारी पडू नये किंवा मरू नये. असे विचार त्यांनी मांडले असले तरी जगभरात लाखो लोक विविध कारणांमुळे आरोग्य सेवांपासून वंचित आहेत. परिणामी जगभरात आरोग्यासंबंधी अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. हिंदुस्थानातदेखील तसेच चित्र आहे.
अशा रोगांच्या वाढीला बदलते राहणीमान, तणाव आणि पर्यावरणातील बदल हे सर्व कारणीभूत आहे, असे आरोग्य क्षेत्रातील तज्ञांचे मत आहे. जगभरात लाखो लोकांचे आरोग्य बिघडत आहे हे लक्षात घेऊन जागतिक आरोग्य संघटनेने या वर्षीपासून पुढील पाच वर्षांत अमलात आणण्यासाठी काही कार्यक्रम हाती घेतले आहेत. याअंतर्गत आतापेक्षा अधिक तीन अब्ज लोकांना फायदा होणार आहे. एक अब्ज लोकांना सार्वत्रिक आरोग्य सेवेचा लाभ होईल, एक अब्ज लोकांचा आरोग्यातून निर्माण होणाऱया आपत्कालीन परिस्थितीपासून बचाव होईल तर एक अब्ज लोकांना चांगले आरोग्य आणि सुदृढता लाभेल.
सध्याच्या परिस्थितीत जगात दहा प्रकारच्या आरोग्यासंबंधी प्रश्नांकडे विविध देशांतील आरोग्य संस्थांनी आणि जागतिक आरोग्य संघटनेने लक्ष देणे आवश्यक आहे असे या ‘डब्ल्यूएचओ’चे मत आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या मते प्रदूषण आणि वातावरणातील बदल यामुळे होणाऱया आजारांकडे लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. या संघटनेच्या मते प्रदूषण आरोग्यासाठी सर्वात मोठा धोका आहे. हवेचे प्रदूषण करणारे सूक्ष्म घटक श्वसन आणि परिसंचरण प्रणालीमध्ये जाऊन फुप्फुस, हृदय आणि मेंदूत जातात ज्यामुळे दरवर्षी 70 लाख लोकांचा अकाली मृत्यू कर्करोग, स्ट्रोक तसेच फुप्फुस आणि हृदयरोगाने होतो. जागतिक आरोग्य संघटनेच्या मते यापैकी 90 टक्के मृत्यू कमी आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांत होते.
‘डब्ल्यूएचओ’ या संघटनेच्या अंदाजाप्रमाणे 2030 आणि 2050 या काळात वातावरणातील बदलामुळे होणाऱया कुपोषण, मलेरिया, अतिसार आणि उष्णतेमुळे होणाऱया तणावाने दरवर्षी 2.5 लाख अधिक मृत्यू होतील. जगभरातील 70 टक्के मृत्यू म्हणजेच 4.2 कोटी मृत्यू कर्करोग, हृदयविकार आणि मधुमेह अशा असंसर्गजन्य रोगांमुळे होतो. असे मृत्यू अकाली असतात आणि ते 30 ते 69 या वयोगटातील व्यक्तींचा होतो. जागतिक आरोग्य संघटनेच्या पाहणीनुसार यापैकी 85 टक्के मृत्यू कमी आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांत होतात. अशा मृत्यूला कारणीभूत असलेले रोग होण्याची प्रमुख कारणे म्हणजे तंबाखूचे सेवन, शारीरिक हालचालीचा अभाव, दारूचे दुष्परिणाम, चुकीचा आहार आणि प्रदूषण. याबरोबर मानसिक आजार आणि त्यामुळे होणाऱया आत्महत्या याची दखल घ्यावी लागेल. वयाच्या 14 व्या वर्षांपासून मानसिक तणाव सुरू होतो. त्याचे निदान होत नाही किंवा त्यावर उपचार केला जात नाही, परिणामी 14 ते 19 या वयोगटातील युवक आत्महत्या करतात याबद्दल जागतिक आरोग्य संघटनेने चिंता व्यक्त केली आहे.
जगभरात इन्फ्लुएन्जाची (फ्लू) महामारी होईल असे ठाम मत या संघटनेने मांडले आहे, मात्र ही महामारी केव्हा आणि कधी सुरू होईल हे ‘डब्ल्यूएचओ’ सांगू शकत नाही. ‘डब्ल्यूएचओ’च्या पुढाकाराने 114 देशांत 153 संघटना फ्लूच्या विविध व्हायरसवर लक्ष ठेवून आहेत. फ्लूची लागण होताच ताबडतोब त्यावर उपाय व्हावे यासाठी ‘डब्ल्यूएचओ’ने कार्यक्रम आखला तयार केली आहे आणि हा कार्यक्रम प्रामुख्याने विकसनशील देशांत लागू होणार आहे. या कार्यक्रमात निदान करणे आणि प्रतिबंधनात्मक लसीकरण याचा समावेश आहे. दुष्काळ, संघर्ष (सामाजिक आणि राजकीय), स्थलांतर यामुळे जगातील 22 टक्के लोकसंख्या म्हणजेच 1.6 अब्ज लोक, बाधित आहेत आणि त्यांना योग्य आरोग्य सेवा मिळत नाही. यामुळे इतर आरोग्य सेवांबरोबर महिला आणि बालसंगोपन याकडे दुर्लक्ष केले जाते.
ऑण्टिबायोटिकचा अनेक बॅक्टेरिया, व्हायरस आणि परजीवी कमी परिणाम होताना दिसत आहे. यामुळे न्यूमोनिया आणि क्षयरोग यावर नियंत्रण करणे कठीण झाले आहे. क्षयरोगावर रिफाम्पिसीन हे फार प्रभावशाली औषध होते, मात्र आता मोठय़ा प्रमाणात क्षयरोगींवर त्याचा परिणाम होताना दिसत नाही. तसेच मल्टिड्रग रेझीस्टंट क्षयरोग म्हणजेच अनेक औषधे एकत्र देऊनसुद्धा परिणाम न होणाऱया क्षयरोग ‘डब्ल्यूएचओ’ला चिंतेचे कारण झाले आहे.
जनतेकडून मोठय़ा प्रमाणात आणि डॉक्टरांच्या मार्गदर्शनाअभावी होणाऱया ऑण्टिबायोटिक्सच्या वापरामुळे बॅक्टेरिया, व्हायरस आणि परजीवी औषधांना प्रतिकार करत आहेत.
‘एबोला’ची लागण अजून होऊ शकते अशी भीती ‘डब्ल्यूएचओ’ने व्यक्त केली आहे. हा रोग प्रामुख्याने कांगो आणि इतर काही आफ्रिकी देशांमध्ये आढळला असला तरी अनेक प्रवासी विविध देशांत फिरत असतात आणि त्यांच्यामुळे हा रोग इतर देशांत पसरू शकतो. ‘एबोला’बरोबर ‘झिका’, ‘डेंग्यू’ आणि ‘सारस’सारख्या रोगांचा धोका जगभरात असल्याचे संकेत ‘डब्ल्यूएचओ’ने दिले आहेत. डेंग्यूचा धोका हिंदुस्थान, बांगलादेश आणि नेपाळ या देशांमध्ये पसरू शकतो. एचआयव्ही/एड्स रोखण्यात मोठय़ा प्रमाणात यश मिळाले असले तरी त्याचा धोका टळला नाही, असे ‘डब्ल्यूएचओ’चे मत आहे.
‘डब्ल्यूएचओ’मध्ये हिंदुस्थानची महत्त्वाची भूमिका आहे आणि नवीन सरकारने ‘डब्ल्यूएचओ’ने मांडलेल्या आरोग्यविषयक धोक्याकडे बारकाईने लक्ष देणे आवश्यक आहे. दिल्ली आणि मुंबईमध्ये मोठय़ा प्रमाणात प्रदूषण होताना दिसत असून त्यावर ठोस उपाय करणे गरजेचे आहे. सध्या मुंबईत दिल्लीइतके प्रदूषण नसले तरी त्यात मोठी वाढ होणार हे निश्चित. कारण एकीकडे स्वयंचलित वाहनांच्या संख्येत वाढ होत आहे, तर दुसरीकडे त्यापेक्षा अधिक प्रमाणात वृक्षतोड होत आहे. ‘खेलो इंडिया’सारख्या कार्यक्रमातून जनतेला हालचाल आणि व्यायाम करण्यास प्रोत्साहन दिले जात आहे, पण मोठय़ा शहरांमध्ये खेळांची मैदाने आणि उद्याने फारच कमी आहेत. स्वतःचे मैदान नसतानादेखील शाळा सुरू करण्यास परवानगी कशी दिली जाते, हा गहन प्रश्न आहे.
मानसिक आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी शाळेपासूनच योग्य प्रशिक्षण देणे आवश्यक आहे, त्याचबरोबर परीक्षेचा तणाव होऊ नये आणि झालच तर तो कमी कसा करता येईल याकडे शाळा व्यवस्थापन आणि पालकांनी लक्ष देणे महत्त्वाचे आहे. ‘स्वच्छ भारत’सारख्या योजनेतून देशात स्वच्छता आणून डेंग्यू आणि इतर रोगांवर मत करणे आवश्यक आहे. ‘उत्तम आरोग्य हीच देशाची संपत्ती’ हे लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे.
(लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत.)





























































