
>> अनिल दत्तात्रेय साखरे
पोलंडवरील रशियाच्या ड्रोन हल्ल्यामुळे नाटो राष्ट्रांमध्ये खळबळ माजली आहे. एकीकडे मागील साडेतीन वर्षांपासून सुरू असलेल्या रशिया-युव्रेन युद्ध समाप्तीसाठी चर्चा चाललेल्या असताना दुसरीकडे रशिया मोठय़ा प्रमाणावर युव्रेनवर ड्रोन हल्ले करत आहे. त्यासोबतच रशियाने आता युद्धक्षेत्र वाढविण्यासाठी पोलंडवर पण काही ड्रोन हल्ले केले आहेत. अमेरिकाप्रणीत दुसऱया महायुद्धानंतर स्थापित झालेल्या नाटो संघटनेचा पोलंड सदस्य आहे आणि नाटो संघटनेच्या वेगवेगळ्या कलमांनुसार कुठल्याही नाटो संघटनेतील राष्ट्रावर हल्ला झाला, तर तो नाटो संघटनेवरील हल्ला मानून संघटनेतील सर्व देश प्रत्युत्तर द्यायला बांधील आहेत. साहजिकच नाटो राष्ट्रांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटली असून रशियाविरोधात हालचाल सुरू झाली आहे.
पहिले महायुद्ध
युरोपमध्ये बाल्कन युद्ध संपल्यावर जरी शांतता प्रस्थापित झाली तरी युरोपमधील प्रत्येक राष्ट्र आता आपल्याला लष्करीदृष्टय़ा बलिष्ठ कसे होता येईल याचा विचार करू लागले होते. विशेषतः रशिया, जर्मनी आणि फ्रान्स यांनी तर युरोपमध्ये यापुढे युद्ध होणारच असे गृहीत धरून युद्धाची पूर्वतयारी चालवली होती. त्यातच ऑस्ट्रिया आणि सर्बिया या दोघांमध्ये संघर्ष निकराला पोहोचलेला होता. रशियाला सर्बियाबाबत विशेष आत्मीयता होती. त्यातच बाल्कन युद्धामुळे बर्लिन बगदाद असा रेल्वेमार्ग बांधण्यात अडचणी आल्या. अशा परिस्थितीमध्ये ऑस्ट्रिया व जर्मनी एका बाजूला, तर रशिया आणि सर्बिया दुसऱया बाजूला असे विभाजन झाले होते. दोन्ही गट एकमेकांवर वार करण्याची संधी शोधत होते. युरोपमधील वातावरण विलक्षण तणावाचे असताना एक भयंकर घटना घडली आणि दारूच्या कोठाराला एकाएकी आग लागावी तसा युद्ध भडका युरोपमध्ये उडाला. ती घटना म्हणजे ऑस्ट्रियाचा राजपुत्र फ्रान्सिस फर्डिनांड व त्याची पत्नी हे दोघेही बोस्निया प्रांतामध्ये गेलेले असताना भररस्त्यावर त्यांचा खून करण्यात आला आणि या खुनामागे सर्बियाचा हात आहे असा पुरावा पुढे आला. त्यामुळे मग ऑस्ट्रियाने 28 जुलै 1914 रोजी सर्बियाविरुद्ध युद्ध पुकारले आणि पहिल्या महायुद्धास तोंड फुटले.
दुसरे महायुद्ध
पहिल्या महायुद्धामध्ये जर्मनीवर खूप मोठय़ा प्रमाणावरती विजेत्या राष्ट्रांनी वेगवेगळ्या अटी लादून जर्मनीचे आर्थिक आणि सामाजिक दृष्टीने खच्चीकरण केले. यापुढे जर्मनी लष्करीदृष्टीने उभा राहू नये यासाठी जर्मनीचे तुकडे केले. करोडो डॉलरची जर्मनीवर युद्ध नुकसान भरपाई लादली. ज्याच्या ओझ्याखाली जर्मन राष्ट्र दबून गेले. जर्मनी पूर्णपणे कोलमडून गेला. लादलेल्या जाचक अटींचा बदला घेण्यासाठी जर्मनीला लष्करीदृष्टय़ा सामर्थ्यशाली बनवल्यावर हिटलरने प्रथम ऑस्ट्रिया आणि झेकोस्लोव्हाकिया जिंकून घेतले. यापुढील वाटचाल युरोपमध्ये आणखी हातपाय पसरवण्यासाठी हिटलरने 1 सप्टेंबर 1939 साली पोलंडवर आक्रमण केले. हिटलरच्या या लष्करी आक्रमणाचा विरोध करण्यासाठी इंग्लंड, फ्रान्स आणि इतर दोस्त राष्ट्रांनी जर्मनीविरुद्ध युद्ध सुरू केले. त्याचीच परिणीती दुसऱया महायुद्धात झाली. वेगवेगळ्या खंडांतील अनेक राष्टे प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष रीतीने या दुसऱया महायुद्धात सामील झाली. खऱया अर्थाने जमीन, पाणी आणि आकाश या सगळ्याच ठिकाणी हे युद्ध लढले गेले. हिरोशिमा आणि नागासाकी शहरे अमेरिकेने केलेल्या अणुबॉम्ब वर्षावात उद्ध्वस्त झाल्यावर जपानने शरणागती पत्करली आणि दुसरे महायुद्ध थांबले.
सध्याची अशांत परिस्थिती
आता पुन्हा एकदा रशियाने पोलंडवर केलेल्या ड्रोन हल्ल्यामुळे इतिहासाची पुनरावृत्ती होऊन संपूर्ण युरोपमध्ये वातावरण अशांत झाले असून महायुद्धाचे ढग आकाशामध्ये जमू लागले आहेत. नाटो देश आणि रशियामध्ये युद्ध भडका उडण्याची शक्यता आहे. त्यासोबत मागील दोन वर्षांपासून मध्य आशियामध्ये सुरू असलेला इस्रायल-हमास लेबनॉन संघर्ष, पुन्हा कधीही युद्ध भडका उडण्याची शक्यता असलेला भारत-पाकिस्तान संघर्ष, तैवानचा घास घेण्यासाठी टपून बसलेला चीन, उत्तर कोरिया-दक्षिण कोरियामधील अशांत परिस्थिती, स्वतःचे महत्त्व हरवून बसलेली संयुक्त राष्ट्र संघटना आणि या युद्धग्रस्त वातावरणामुळे जगभरातील विस्कळीत झालेले जलमार्ग, हवाई मार्ग, त्यासोबतच खूप मोठय़ा प्रमाणावर वस्तू व मालाच्या पुरवठय़ावर परिणाम झाला असून वेगवेगळ्या राष्ट्रांच्या अर्थव्यवस्थेवर त्याचे विपरीत परिणाम दिसत आहेत. त्यातच अमेरिकेने छेडलेल्या व्यापार युद्धामुळे जगभरातून अमेरिकेमध्ये आयात होणाऱया वस्तूंवर आयात कर वाढवले गेले आहेत. त्यामुळे देशोदेशींची निर्यात कमी होऊन मोठे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. नुकतेच चीनने केलेले त्यांच्या अजस्र लष्करी सामर्थ्याचे महाप्रदर्शन, पूर्वेला जपानपासून तर पश्चिमेच्या अमेरिकेतील वेगवेगळ्या राज्यांवर मारा करू शकणारी चीनची अजस्र क्षेपणास्त्रे, नेपाळ व फ्रान्समध्ये चाललेली सरकारविरोधी जन आंदोलने हे सगळे बघताना कुठेतरी सगळ्या जगाचीच वाटचाल तिसऱया महायुद्धाच्या दिशेने चाललेली आहे असे वाटते.