ठसा : आशा अपराध

>> शीतल धनावडे

आशा अपराध या मराठी साहित्य क्षेत्रातील वास्तववादी लेखिकेने ‘भोगले जे दुःख त्याला…’ या आत्मचरित्रातून मुस्लिम स्त्रियांच्या वाटय़ाला येणारी परवड, मराठी मुसलमानांचे जग, स्त्रियांच्या आशा-आकांक्षा व त्यांची सुखदुःखे हे सारे परखडपणे मांडले आहे. त्यांच्या निधनाने एक संवेदनशील लेखिकेला व सामाजिक कार्यकर्तीला समाज पोरका झाला आहे. 14 एप्रिल 1952 साली कोल्हापुरात आंबेवाडी ता. करवीर या छोटय़ा गावात जन्मलेल्या आशा अपराध या काही दिवसांपासून आजारी होत्या. अखेर वयाच्या 67 व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. त्यांचा विवाह दस्तगीर यांच्याशी अगदी लहान वयातच झाला होता. संसारिक आयुष्यात त्यांनी अनेक यातना भोगल्या. अनेक रूढी, परंपरांना छेद देत, सुधारणावादी विचाराने त्या आपल्या चारही मुलींना वाढवत होत्या. मुस्लिम महिलांच्या प्रश्नांसाठी मुस्लिम सत्यशोधक समाजाच्या माध्यमातून उभारलेल्या चळवळीत काम केलेल्यांमध्ये आशा अपराध यांचाही विशेष उल्लेख करण्यात येतो. 1985-86 मध्ये कोल्हापूर ते नागपूर तलाकमुक्ती मोर्चात सहभागी झालेल्या कोल्हापूरच्याच कार्यकर्त्यां व लेखिका मुमताज रहिमतपुरे यांचे आकस्मिक निधन झाले. तेव्हा कोल्हापुरातील मुस्लिम लोकांनी त्या काफर आहेत, दफन करू देणार नाही अशी भूमिका घेतली होती. त्या वेळी झालेल्या चळवळीत आशा अपराध यांनी याविरोधात कणखर भूमिका घेत हा विरोध मोडून काढला होता.

कोल्हापुरात केएमसी महाविद्यालयात एक विद्यार्थीप्रिय प्राध्यापिका म्हणून त्या लोकप्रिय होत्या. राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून त्यांनी तळागाळातील विद्यार्थी-विद्यार्थिनींना पुस्तकी ज्ञानासह वास्तववादी ज्ञान देण्याचा प्रयत्न केला. विशेषतः मुलींनी आपल्या आयुष्यात कणखरपणे समाजात कसे राहिले पाहिजे आणि स्त्राr म्हणून समोर येणाऱ्या आव्हानांना तोंड कसे द्यायचे याची शिकवण त्या मुलींना देत असत. यामुळे त्यांच्याबद्दल विद्यार्थ्यांत खूप आदर होता. प्राध्यापकी पेशाबरोबरच सामाजिक जीवनामध्ये सुद्धा त्यांनी स्वतःला झोकून दिले होते. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते हमीद दलवाई यांच्या मुस्लिम सत्यशोधक चळवळीत त्यांनी अविरतपणे कार्य केले आहे. त्याचबरोबर कोल्हापुरातील महिला दक्षता समितीच्या माध्यमातून अनेक तुटलेले संसार जोडण्यासह अनेक स्त्रियांना त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी त्यांचे प्रबोधन आणि आवश्यक ती मदत त्यांनी वेळोवेळी केली आहे. शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या लीलाताई पाटील यांच्याबरोबरसुद्धा त्यांनी भरीव काम केले. ‘भोगले जे दुःख त्याला…’ हे आत्मचरित्र म्हणजे त्यांचे लहान वयात झालेले लग्न, पतीच्या आणि त्यांच्या वयात असणारी मोठी तफावत यातून झालेला मानसिक त्रास, शिवाय जन्मदात्या आईचा रोष आणि दुस्वास, अशा परिस्थितीतही आपल्या चारही मुलींना दिलेले शिक्षण असा त्यांचा चालताबोलता प्रवास आहे. या आत्मचरित्राला भैरूरतन दमाणी प्रतिष्ठानचा उत्कृष्ट साहित्यकृतीचा पुरस्कार मिळाला आहे. याच पुस्तकाला मुलुंड येथील महाराष्ट्र सेवा संघ तसेच महाराष्ट्र सरकारचा उत्कृष्ट वाङ्मय निर्मितीचा राज्य पुरस्कार यासह 15 हून अधिक पारितोषिके त्यांच्या साहित्यकृतीला मिळाली आहेत. महत्त्वाचे म्हणजे हे आत्मचरित्र सोलापूर विद्यापीठाच्या बीएच्या अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आले आहे. हे आत्मचरित्र लवकरच इंग्रजीतसुद्धा येणार आहे. याशिवाय अनेक नियतकालिके तसेच वर्तमानपत्रांतून त्यांनी स्फुट लेख लिहिले आहेत. आकाशवाणीवर त्यांचे अनेक प्रबोधनात्मक कार्यक्रम झाले आहेत. विशेष म्हणजे त्यांनी लिहिलेला ‘पन्हाळ्यावरील उरुस’ या विषयाचा लेख दहावी अभ्यासक्रमातून पाठय़पुस्तकात समावेश करण्यात आला होता. त्यांचे ऐनवेळी जाणे हे मराठी साहित्यसृष्टी व सामाजिक चळवळीसाठी मोठे नुकसान आहे.

आपली प्रतिक्रिया द्या