
>> डॉ. सरिता विनय भावे
पिवळ्याधम्मक फुलोऱयामुळे सोनमोहरला इंग्रजीत ‘यलोफ्लेम ट्री’, ‘यलोफ्लॅमबॉयन्ट’, ‘यलोपोईनसियाना’ असे नावाजले जाते. याची पाने गुलमोहरासारखी असल्याने हिंदीत याला ‘पीला गुलमोहर’ म्हणतात. याच कारणामुळे ‘ऑस्ट्रेलियन गुलमोहर’ आणि सोनेरी फुलांमुळे ‘सोनमोहर’ असे मराठी नामकरण केले आहे.
मे महिन्याच्या रणरणत्या उन्हात काळपट गर्द हिरव्या पर्णसंभाराने सुखावणारा, विपुल फुलांनी सजलेला, हमखास लक्ष वेधून घेणारा वृक्ष म्हणजे ‘सोनमोहर.’ नावावरूनच या झाडाची फुले सोनपिवळी असतील आणि ते गुलमोहरच्या प्रजातीतले असेल याची कल्पना येते. हा मूळचा अंदमान, विषुववृत्तीय आग्नेय आशियातील देशांचा (श्रीलंका, मलेशिया, इंडोनेशिया, थायलंड इ.) आणि उत्तर ऑस्ट्रेलियाचा रहिवासी. पण आता बरीच वर्षे आपल्याकडे स्थिरावला आहे. हिंदुस्थानात याचे आगमन आग्नेय आशियातील देशांतून प्रथम तामीळनाडू आणि आंध्र प्रदेश येथे झाले होते.
वनस्पतीशास्त्रात सोनमोहरला ‘Peltophorum pterocarpum हे नाव प्राप्त झाले आहे. भरगच्च पिवळ्याधम्मक फुलोऱयामुळे याला इंग्रजी भाषेत ‘यलोफ्लेम ट्री’, ‘यलोफ्लॅमबॉयन्ट’, ‘यलोपोईनसियाना’ असे नावाजले जाते. याची पाने गुलमोहरासारखी असल्याने हिंदीत याला ‘पीला गुलमोहर’ असे म्हणतात. याच कारणामुळे आपण त्याचे ‘ऑस्ट्रेलियन गुलमोहर’ आणि सोनेरी फुलांमुळे ‘सोनमोहर’ असे मराठी नामकरण केले आहे. एखादी हौशी नगरपालिका, रस्त्याच्या कडेला सावलीसाठी आणि शोभेसाठी, गुलमोहराच्या झाडांबरोबर आलटून पालटून यांची लागवड करते आणि बहराच्या दिवसांत लाल आणि पिवळ्या फुलांच्या ‘हळदी-कुंकवाची’ मेजवानी जनतेच्या वाटय़ाला आल्याने त्यांच्या कौतुकास पात्र ठरते!
हा पानगळीचा वृक्ष असला तरी फारच थोडा काळ निष्पर्ण राहत असल्याने वर्षभर सदाहरीतच वाटतो. झाड उंच, भरगच्च आणि डेरेदार असते. खोडाची साल खवल्याखवल्यांसारखी असते. झावळ्यांसारख्या पानांना असलेल्या पर्णिकांची रचना द्विसंयुक्त पद्धतीची असते. मार्च ते मे आणि सप्टेंबर ते डिसेंबर असा वर्षातून दोन वेळा हा वृक्ष बहरतो. बहराच्या काळात तांबूस-तपकिरी, वाटोळ्या कळ्यांचे तुरे उमलतात आणि त्यातून पिवळीजर्द, क्रेपच्या कागदासारख्या पाच पाकळ्यांची, भरपूर पुंकेसर असलेली, मंद गंधाची फुले बाहेर येतात. तुऱयातील फुले खालून वर अशी उमलत जातात. हळूहळू सगळे झाड पानोपानी सोनेरी पुष्पसंभार मिरवू लागते. कालांतराने झाडाच्या अंगांगावर पिवळी फुले आणि तळाशी गळून पडलेल्या पिवळ्या फुलांची पखरण असे मनोहारी दृश्य दिसायला लागते. विशेषतः उद्यानांमध्ये सावलीसाठी लावलेल्या या झाडाच्या पिवळ्या फुलांचा सडा उद्यानाच्या हिरव्या तृणांच्या गालिचावर निरतिशय मनमोहक वाटतो आणि समस्त पुष्परसिकांच्या आकर्षणाचे केंद्र ठरतो.
फुलांचा बहर ओसरल्यावर झाडाला येणाऱया शेंगा तांब्याच्या रंगाच्या असतात, म्हणून या झाडाला इंग्रजीत ‘कॉपरपॉड’ आणि मराठीत ‘ताम्रशिंबी’ म्हणतात. अशी नुसती अगणित शेंगा लटकलेली झाडेही मस्त दिसतात! झाडावरून खाली रस्त्यावर पडलेल्या शेंगांमधील मण्यांसारख्या बिया उन्हाने वितळलेल्या डांबरात रुतून टचटचीत दिसतात (त्यांना तसे बघणे मजेशीर वाटले तरी रस्ता खराब होतो हे ही खरे!). जळणासाठी, हलक्या बांधकामात आणि कॅबिनेट बनवण्यासाठी लाकडाचा आणि चारा म्हणून याच्या पानांचा उपयोग होतो. ‘बाटीक’ प्रकारातील कापडाच्या रंगकामात वापरला जाणारा विशिष्ट पिवळट तपकिरी रंग खोडापासून काढतात. सूज, मुकामार, जखमा बऱया करण्यासाठी, वेदनाशामक म्हणून याचा अर्क गुणकारी असतो. असा आहे हा हिरवी पाने, तांबूस कळ्या, पिवळी फुले, तांबूस शेंगा अशा उठावदार रंगसंगतीची निसर्गाने लयलूट केलेला आणि उपयुक्त असणारा सोनमोहर!





























































