प्रणाम वीरा- शौर्याची परिसीमा

>> रामदास कामत

अतिशय प्रतिकूल वातावरणातून सलग पाच दिवस चालल्यानंतर कमांडो मधुसूदन सुर्वे यांना एका घरावरील झेंडे पाहून या घरात दहशतवादी असल्याची खात्री झाली. त्यांनी त्या घरावर ग्रेनेडचा मोठा स्फोट घडवून आणला आणि त्या घरात असलेल्या जवळपास आठ-नऊ दहशतवाद्यांना यमसदनी धाडले. त्यांच्यावर 11 गोळय़ांचा वर्षाव झाला. पायाला लागलेल्या गोळय़ांचे विष शरीरात पसरू नये म्हणून त्यांनी त्यांचा पाय कुकरीने कापला. त्या परिस्थितीत दहशतवाद्याला कंठस्नान घातले. त्यांच्या या शौर्याचा बहुमान म्हणून त्यांना तत्कालीन राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या हस्ते ‘शौर्यचक्र’ देऊन सन्मानित करण्यात आले.

‘शौर्य’ या शब्दाची नेमकी व्याख्या सांगता येत नसली तरी शौर्याची परिसीमा काय हे जाणून घ्यायचे असेल तर एका युद्धवीराबद्दल जाणून घ्यायलाच हवे. तो शौर्ययोद्धा आहे कमांडो मधुसूदन सुर्वे.

मधुसूदन सुर्वे यांचा जन्म खेड जिह्यातील शिवतर या  गावात झाला, जिथे प्रत्येक घरात सैनिक जन्माला येतो. सुर्वे यांच्या अनेक पिढय़ा भारतमातेच्या संरक्षणासाठी आयुष्यभर लढत आल्या. त्यांच्या पणजोबा-आजोबांपासून सुरू असलेला हा वारसा त्यांचा मुलगादेखील पुढे घेऊन जात आहे. सुर्वे अवघे सहा महिन्यांचे असताना वडील युद्धात कामी आलेले. पितृछत्र हरपलेले तरीही मातेने आपल्या भावाच्या मदतीने त्यांना मोठे केले. सांगणे फक्त एकच. मोठा होऊन वडिलांच्या बलिदानाचा बदला तुला घ्यायचाय. शालेय शिक्षण गावातच. बारावी झाल्यावर वयाच्या 19व्या वर्षीच कुलाब्यातील मराठा इन्फन्ट्रीमध्ये ते दाखल झाले.

जिद्दीने त्यांनी सैनिकी शिक्षण पूर्ण केले. पुढे जाऊन ‘पॅरा कमांडो ट्रेनिंग’देखील त्यांनी घेतले. आसाममधल्या पहिल्या मोहिमेपासून प्रत्येक मोहीम त्यांनी फत्ते केली. उल्लेखनीय म्हणजे, ‘ऑपरेशन रायनो’नंतर जम्मू-कश्मीरमध्ये झालेले ‘ऑपरेशन रक्षक’ आणि 1999 सालचे कारगीलमधील ‘ऑपरेशन विजय’, ज्यात तोलोलिंग टेकडीवर त्यांच्या युनिटने ‘21-पॅरा स्पेशल फोर्स’ने तिरंगा झेंडा फडकवला. त्यानंतरही जम्मू आणि कश्मीरमध्ये झालेले ‘ऑपरेशन पराक्रम,’ मणिपूर येथील ‘ऑपरेशन हिफाजत’ एक अशा कित्येक मोहिमांमध्ये आपल्या पराक्रमाने त्यांनी यशाचे ध्वज फडकवले आहेत.

राजस्थानच्या रणरणत्या उन्हात तसेच उणे 25-40  अंश तापमान असलेल्या प्रदेशात गस्त घालणे, रात्रंदिवस पाठीवर अनेक किलोंचे ओझे घेऊन डोंगरदऱया पार करत, ऊन-पावसाचा सामना करत, कधी उपाशीपोटी झोपून तर कधी राहायची योग्य सोय नसल्यामुळे एवढय़ा कमी तापमानात उघडय़ावर राहायचे अशा बिकट परिस्थितीला त्यांनी तोंड दिले आहे.  साल 1992 साली स्पेशल टास्क फोर्ससाठी नेपाळमध्ये नियुक्ती झाली. नऊ महिन्यांच्या अतिशय खडतर प्रशिक्षणात साधारण एक हजार मुलांमध्ये जेमतेम दहाबारा उत्तीर्ण होतात. त्यातही सगळ्यात प्रतिष्ठेची मरून कॅप मिळवली. त्यानंतर अनेक मिशनवर त्यांची नियुक्ती झाली.

परंतु या सर्वात धैर्य आणि धाडसाचा कळस ठरली ती मोहीम म्हणजे मणिपूर येथे झालेले ‘ऑपरेशन हिफाजत 2’! या मोहिमेची जबाबदारी थेट त्यांच्यावरच होती. अतिशय प्रतिकूल अशा वातावरणातून सलग पाच दिवस चालल्यानंतर सुर्वे यांना एका घरावरील झेंडे पाहून या घरात दहशतवादी आहेत याची खात्री झाली. त्यांनी त्या घरावर ग्रेनेडचा मोठा स्फोट घडवून आणला आणि त्या घरात असलेल्या जवळपास आठ-नऊ दहशतवाद्यांना यमसदनी धाडले, परंतु तेवढय़ात एक गोळी त्यांच्या एका साथीदारास लागली आणि त्याची मदत करायला जात असताना दुसऱया दहशतवाद्याने सुर्वे यांच्यावरच गोळीबार केला. त्यांच्या एका पायात सात गोळ्या घुसल्या. सुर्वे खाली कोसळले. खांद्यावर असलेला त्यांचा साथीदार खाली पडून गडगडत थेट नाल्यात गेला. एवढय़ात त्याच दहशतवाद्याने सुर्वेंच्या दुसऱया पायावर दोन आणि पोटात दोन अशा एकूण 11 गोळ्यांचा वर्षाव केला. आपल्या साथीदाराला त्यांनी आपला पाय कापून टाकण्याची विनंती केली की, जेणेकरून विष अंगात पसरू नये. पण साथीदार कचरल्याचे पाहताच त्यांनी स्वतःच कुकरीने आपला पाय कापून काढला. अशाही परिस्थितीत त्या दहशतवाद्याला सुर्वेंनी कंठस्नान घातले. या भीषण युद्धात सुर्वेंसह त्यांच्या साथीदारांनी 37 दहशतवाद्यांना संपवले. पोटातील आतडय़ा बाहेर आल्या होत्या. नंतर पोटात कृत्रिम आतडय़ा बसवण्यात आल्या. उजव्या पायात रॉड बसवला गेला. केवळ त्यांच्या जिद्दीनेच त्यांना मृत्यूच्या दाढेतून परत आणले होते.

त्यांच्या या शौर्याचा बहुमान म्हणून त्यांना तत्कालीन राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या हस्ते ‘शौर्यचक्र’ देऊन सन्मानित करण्यात आले. 2011 साली ते वर्दीतून निवृत्त झाले तरी आजही ते कार्यरत आहेत. त्यांची  पुढची पिढीही देशाची सेवा करण्यासाठी कार्यरत आहे. त्यांचा मुलगा एनडीएची तयारी करत आहे आणि मुलगी वैद्यकीय क्षेत्रात काम करत आहे. आज मधुसूदन सुर्वे यांच्यासारख्या कितीतरी सैनिकांनी देशाच्या रक्षणाचा विडा हाती घेतला आहे आणि त्यांचे ऋण कधीही न फिटणारे आहे.

z [email protected]