जाता पंढरीसी, सुख वाटे जीवा…!

567

>> राजाभाऊ चोपदार
>> शब्दांकन – शुभांगी बागडे

‘पंढरीचा वास चंद्रभागे स्नान, आणिक दर्शन विठोबाचे’ या इच्छेपोटी वारकरी वारी चुकवत नाहीत अशी भागवत संप्रदायाची धारणा आहे. पंढरपूरच्या आषाढी वारीवर अनेक वेळा संकटे आली, पण हा वारकरी कधीच मागे हटला नाही. शेकडो वर्षे नित्यनेमाने वारी होत राहिली. या वर्षी मात्र कोरोनाच्या संकटाने शेकडो वर्षांची परंपरा मानसवारीच्या माध्यमातून पूर्ण करावी लागणार आहे.

पृथ्वीवरी तीर्थे असती अपार ।
परी पंढरीची सर । एकाही नाही!

अंगात पांढरा सदरा, पांढरा पायजमा आणि डोक्यावर टोपी घातलेल्या या वारकऱयांच्या खांद्यावर भगवी पताका, हाती चिपळ्या आणि खांद्यावर वीणा घेतलेला वारकरी… जणू आसमंतात रंग उधळत असायचा. ‘पंढरीचा वास चंद्रभागे स्नान, आणिक दर्शन विठोबाचे’ या इच्छेपोटी वारकरी वारी चुकवत नाहीत, अशी भागवत संप्रदायाची धारणा आहे.

पंढरपूरच्या आषाढी वारीवर अनेक वेळा संकट आली. कधी मुसळधार पाऊस झाला तर कधी दुष्काळाच्या सावटाखाली वारी निघाली; पण या वारीत सहभागी झालेला वारकरी कधीच मागे हटला नाही. या वर्षी मात्र कोरोनाच्या संकटाने शेकडो वर्षांची परंपरा खंडित केली. असं म्हणतात की ऊन, वारा, पाऊस असं काहीही वारकऱयांना वारीपासून वेगळे करूच शकत नाही. मात्र कोरोना काळ बनून वारीवर आला आणि आषाढी पायी वारी रद्द झाली. कोरोनामुळे यंदा आषाढी पायी वारी निघाली नाही. तुकोबांच्या पादुका देहूत, तर माऊलींच्या पादुका आळंदीतच आहेत.

आषाढी वारी ही महाराष्ट्राची अस्मिता आहे. पायी वारीची आपली परंपरा अगदी जुनी आहे. त्याबरोबरच पालखी सोहळय़ाची परंपरादेखील जुनीच आहे. 1685 साली तुकाराम महाराजांचे वंशज नारायण महाराज यांनी संत तुकारामांच्या आणि ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुका पालखीत घालून पंढरपुरास नेण्याचा प्रघात सुरू केला. त्याआधी पादुका घेऊन जाण्याच्या सोहळय़ाची प्रथा नव्हती; परंतु वारीची प्रथा मात्र खूप वर्षे आधीपासून सुरू आहे. पादुकांसहित वारीची प्रथा त्यानंतरच्या काळात सुरू झाली तरी तशी ती जुनीच म्हणायला हवी. पंढरीचे वारकरी असो व भक्तजन, साऱयांनाच या सोहळय़ाचे अप्रूप असते आणि यात सहभागी होण्याची आस त्यांना असते; परंतु या वर्षी मात्र या पारंपरिक प्रथा, रीती बाजूला ठेवाव्या लागणार आहेत.

जगभर कोरोना नामक विषाणूने थैमान घातले आहे. जगातील सर्व व्यवस्थांना या विषाणूने वेठीस धरले आहे. या आजाराचा सामना करायचा आणि माऊलीच्या भक्तांची सुरक्षा जपायची तर वर्षानुवर्षे सुरू असलेली पायी वारीची ही प्रथा थोडय़ा वेगळय़ा स्वरूपात अमलात आणायची या हेतूनेच यंदा पालखी सोहळा कमीत कमी लोकांच्या उपस्थितीत आणि शासकीय नियमांनुसार करण्याचे ठरले आहे. या कोरोना संसर्गाची व्याप्ती गर्दी झाली की वाढणार हे निश्चित आणि पायी वारी गर्दीशिवाय पार पडणं अशक्य. हे व्यस्त प्रमाण लक्षात घेऊनच शासनाने पुढाकार घेत काही सूचना दिल्या. शासनाने सध्या सर्वच जाती, पंथ, धर्म यांचे उत्सव थांबवले आहेत. महाराष्ट्रासाठी वारीचा सोहळा अत्यंत महत्त्वाचा आणि उत्साहाचा विषय. या पार्श्वभूमीवर वारीबाबत शासन काय निर्णय घेणार याची सर्वानाच उत्सुकता होती.

आम्ही रूढी, प्रथा, परंपरा मानणारे लोक आहोत. पण वारीबाबतचा निर्णय शासनाने घ्यावा असे आमचे मत ठरले. याबाबत शासनाने बैठक घेतली. त्यात पालखी सोहळय़ाच्या प्रतिनिधींना बोलावण्यात आले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या बैठकीत आळंदी, देहू, सासवड, पंढरपूर या संस्थांचे प्रमुख आणि वारकऱयांच्या वतीने मी असे सहभागी होतो. या बैठकीत देवस्थान समितीच्या वतीने प्रस्ताव देण्यात आले; मात्र याबाबत शासन जो निर्णय घेईल तो आम्हाला मान्य असणार होता कारण, शेवटी लाखो भक्तांच्या आरोग्याशी निगडित असा हा प्रश्न आहे. आपल्यामुळे इतरांना त्रास व्हावा अशी शिकवण कोणत्याही संतांनी दिलेली नाही आणि त्यामुळे आमच्या एकत्र येण्याने त्रास वाढणारा असेल तर आम्हाला शासनाचा निर्णय मान्य असेल हीच समस्त वारकऱयांची भूमिका आहे. परंतु याबरोबरच वारीची परंपराही अखंडित, अबाधित राहिली पाहिजे अशीही मागणी होती.

या सगळय़ातून मार्ग काढता सद्य परिस्थिती आणि होऊ घातलेली परिस्थिती यांचा अंदाज घेऊनच निर्णय घेणं गरजेचं होतं. कारण एकदा का पालखी निघाली, की भक्तांना आवरणं कठीण होणार. कमीत कमी लोकांनी उपस्थित राहण्याची मर्यादा घातली तरी पायी वारीत अनेक गावांशी संपर्क येणार. याचा ताण प्रशासन, पोलीस व्यवस्था यांच्यावर येणार हे उघडच. या सगळय़ा गोष्टी लक्षात घेत महाराष्ट्रातील कोणत्याही पायी वारीला परवानगी नाकारली गेली. मानाच्या सात पालख्यांपैकी संत नामदेव महाराजांची पालखी पंढरपुरातूनच निघते. उर्वरित सहा पालख्या दशमीला पंढरपुरास घेऊन जाण्याची आणि एकादशी दिवशी त्यांची पांडुरंगाशी भेट घडवून आणण्याची जबाबदारी शासनानेच घेतली. त्याची संपूर्ण व्यवस्था शासन पाहणार असून पालखी सोहळय़ाचे काही प्रतिनिधी यात सहभागी असतील. सामान्यजन, भक्तजन यांच्यासाठीच हा निर्णय आहे हे आपण समजून घेतले पाहिजे.

कोरोनाचे संक्रमण आपल्या देशात आणि आपल्या राज्यात झाल्यापासून प्रत्येक एकादशीला पंढरीच्या चार पायी वाऱया झाल्या. यात वारकऱयांनी कोणतीही आगळीक केल्याची एकही तक्रार नाही. यामुळे वारकरी संयमित राहून खूप भक्ती दर्शवू शकतात हेच दिसत आहे. संतांनी शिकवल्याप्रमाणे ‘पंढरीचा वारकरी। वारी चुकू न दे हरी!’ यावर आमचा विश्वास आहे. वारी चुकू न देण्याची धारणा असणारे आम्ही वारकरी संतांचं दुसरं वचनही अमलात आणत आहे ते म्हणजे ’ठायींच बैसोनि करा एकचित्त । आवडी अनंत आळवावा!’ एकाच जागी थांबून भगवंताला आळवता येते, त्याची भक्ती करता येते हेच संतांनी शिकवलं आहे. या माध्यमातून आम्ही समस्त वारकरी मानसवारी करत आहोत. पंढरपूरचा वारकरी आणि त्यांच्या उपासनेचा मार्ग म्हणजे वारकरी पंथ. वारी केल्यास अनेक लाभ पदरी पडतात, निष्ठा बळकट होते. अंतरीचा प्रेमा वर्धिष्णू होतो. संत सज्जनाच्या भेटी होतात. वारी हे देव आणि भक्ताचे उच्च पातळीवरील स्नेहसंमेलनच असते. वारीतून या संप्रदायाची सामाजिकता आणि समाजाभिमुखता स्पष्ट होते. वारीची परंपरा सर्व संतांनी जतन केली आहे.

सध्या माऊलींच्या पादुका आजोळघरात गांधीवाडा- देऊळवाडय़ात मुक्कामी आहेत. तिथे त्यांची षोडशोपचारे पूजा केली जाते. अभिषेक, जागर, कीर्तनसेवा, भजनसेवा तिथे पार पडत आहेत. आता आषाढ शुद्ध नवमीपर्यंत पादुका तिथे असतील. आषाढ शुद्ध दशमीस शासन जे वाहन पाठवेल आणि जी वेळ कळवेल त्या वेळेनुसार आम्ही पंढरपुरास जाऊ. वाखरीच्या पुढे प्रथेनुसार पालखी पायी नेली जाईल. तिथे मानाच्या पालख्यांचा औपचारिक सोहळा होईल. पंढरपुरात प्रवेश करून दशमीला तिथे राहून एकादशीला चंद्रभागा स्नान केले जाईल आणि पौर्णिमेला काला करून पालखी परत येईल. येतानाही परतवारी न करता अशीच वारी केली जाईल. प्रथेनुसार पादुकांची ही औपचारिक वारी केली जाईल.

वारकरी ही एक संस्था

आजही कोरोनाच्या संसर्गाने वारी होऊ शकली नसली तरी या समस्त वारकऱयांनी मानसवारीच्या पर्यायाला सर्वार्थाने साथ दिलेली आहे. संतांची शिकवण, संयम या निमित्ताने खऱया अर्थाने वारकरी आचरणात आणत आहेत. या माध्यमातून वारकऱयांनी जगासामोर वेगळा आदर्श ठेवला आहे असंच म्हणावं लागेल. त्यांनी दाखवलेला समंजसपणा, त्यांचं सामाजिक भान याचे मानावे तितके आभार कमीच आहेत.

वारी, रिंगण आणि अश्व

वारी म्हटलं की, पालखी सोहळय़ाबरोबरच आठवण येते ती माउलींच्या अश्वांची आणि रिंगणाची. वारीच्या वाटेने चालताना दोन उभी रिंगणे तर चार गोल रिंगणे रंगतात. माऊलींच्या सोहळय़ात दोन अश्व असतात. एक स्वाराचा अश्व. त्यावर शितोळे सरकारांचा स्वार विराजमान असतो. दुसरा माऊलींचा अश्व. या अश्वावर माऊलींची गादी असते. रिंगणामध्ये माऊली या अश्वावर विराजमान होते अशी भाविकांची श्रद्धा आहे. त्यामुळे पालखीत माऊलींच्या पादुकांचे दर्शन झाले नाही तरी भाविक या अश्वांचे दर्शन घेतात. रिंगणाच्या अश्वांच्या फेऱया झाल्या की, या अश्वांच्या टापाखालची माती कपाळी लावण्यासाठी भाविकांची झुंबड उडते. यंदाच्या वर्षी हा सुखसोहळा नाही. दरवर्षी आम्ही वारीसाठी प्रस्थान करतो; परंतु या वर्षी हे शक्य नाहीच. याबाबत लोकांच्या भावना जपण्याचा प्रयत्नही आम्ही करत आहोत. लोकांनी मानसवारी करण्याचं ठरवलं आहे आणि आम्ही त्यात सहभागी आहोत. – शितोळे सरकार

आपली प्रतिक्रिया द्या