
>> आशुतोष बापट, [email protected]
निसर्गाशी एकरूप झालेले समर्थ निसर्गात दडलेल्या घळीच्या सान्निध्यात रमत होते. चिंतन करत होते. समाजाला जागृत करण्याचे काम करत होते. त्यांच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या अजून काही रामघळी.
तोंडोशीची रामघळः या घळीलाच तारळ्याची घळ अथवा कळंब्याची घळ असेही म्हणतात. सातारा-कराड रस्त्यावर काशीळ गावापाशी खंडोबाच्या पालकडे जाणाऱ्या रस्त्यावर तारळे हे गाव लागते. इथून मुरुड आणि पुढे तारळी नदी ओलांडून तोंडोशीमार्गे रामघळीत जाता येते.
सज्जनगडची रामघळः परळीचा किल्ला किंवा आश्वलायनगड हा किल्ला समर्थ राहावयास आल्यावर सज्जनगड झाला. परळी गावातून गडाकडे जाणाऱ्या पायऱ्या चढून वर आलं की, गाय-मारुती नावाचे एक ठिकाण लागते. या गाय-मारुतीपाशी या घळीकडे जाणारी वाट फुटते. या घळीचे तोंड लहान असल्याने आतमध्ये जाण्यासाठी रांगतच जावे लागते. यानंतर पुन्हा पायऱ्या आणि मग आत ध्यानाला बसायला चांगली औरस चौरस जागा आहे. सज्जनगडच्या पोटातच असलेली ही घळ तशी दुर्लक्षितच.
जरंडय़ाची रामघळः रामायणात एका मोठय़ा अस्त्राच्या माऱ्याने लक्ष्मण बेशुद्ध पडला. त्याला शुद्धीवर आणायचे असेल तर हिमालयात असलेल्या द्रोणागिरी पर्वतावरील संजीवनी औषधी आणायला हवी होती. अर्थातच हे काम रामभक्त हनुमान याने आनंदाने स्वीकारले. त्याने तर अख्खा द्रोणागिरी पर्वतच उचलून आणला. त्याच द्रोणागिरी पर्वताचा एक तुकडा खाली पडला तो म्हणजे साताऱ्याजवळ असलेला जरांडेश्वराचा डोंगर अशी कथा आहे. त्यामुळे अर्थातच या गिरीशिखरावर मुख्य देऊळ हनुमंताचे. त्या मंदिरातील हनुमंताचे दर्शन घेतल्यावर समर्थांना तिथेच एक वीररसयुक्त काव्य स्फुरले – रामदूत वायुसूत भीमगर्भ जुत्पती। जो नरात वानरात भक्तिप्रेम वित्पती । दास दक्ष स्वामिपक्ष निजकाज सारथी। वीरजोर शीरजोर धक्कधिंग मारुती।।
याच मारुतीच्या पाठीमागे एक राममंदिर आहे. मंदिराच्या मागे काही पायऱ्या उतरल्यावर एक चौकोनी खोदीव खोबण आहे. आतमध्ये पादुका स्थापन केल्या आहेत. हीच ती जरांडेश्वराची समर्थांच्या वास्तव्याने पुनीत झालेली रामघळ होय.
हेळवाकची रामघळः उंब्रजहून चिपळूणला जायला लागले की, वाटेत हेळवाक हे गाव लागते. मुख्य रस्ता सोडून तिथे डावीकडे वळायचे. पूर्वी हा सगळा रस्ता चालत पार करावा लागत असे. आता मात्र गाडी जाईल असा कच्चा रस्ता तयार केला आहे. अनेक ठिकाणी हा रस्ता तीव्र चढाचा आहे, परंतु या रस्त्याने पुढे गेले की, कोंढावळे हे लहान वस्ती असलेले गाव येते. कोंढावळे ओलांडून झाडीतला चढून चढला पुढे जावे लागते. नंतर आपण डोंगराच्या पायथ्याकडे जाऊ लागतो. पाण्याचा प्रवाह आपल्याला सामोरा येतो आणि समोरच उंचावरून पडणारा एक धबधबा लागतो. त्याच्याच मागे लपली आहे ही रामघळ. धबधबा समोर ठेवून डावीकडच्या डोंगरावरून चढून आपण घळीच्या उंचीला येऊन पोचतो. उजवीकडे खोलात पाणी पडत असते आणि डावीकडे लांबच लांब पसरलेली घळ दिसते. आग्न्येयमुखी ही घळ समर्थांना फारच आवडे.
चंद्रगिरीची रामघळः उंब्रज, कराड आणि चाफळच्या त्रिकोणात चंद्रगिरीच्या डोंगरात ही घळ आहे. कराडवरून तळबीड या गावी जावे. त्यामागचा वसंतगड चढावा. किल्ला पाहून दुसऱ्या टोकाच्या दरवाजाने नाईकबाच्या खिंडीत उतरावे. तिथून विजेच्या तारा वाहणारे टॉवर साथीला ठेवून बरेच चालल्यावर वर उंच डोंगरात रामघळ दिसू लागते. एकुलतं एक झाड, पाण्याचा प्रवाह आणि दगडी चौकटीचं ठेंगण प्रवेशद्वार या इथे आहे. हा रस्ता फारच लांबचा आणि वेळखाऊ आहे. त्यामुळे इथे येण्यासाठी उंब्रज-चिपळूण मार्गावरील चरेगाव या गावी यावे. इथून डोंगराच्या पायथ्यापर्यंत रस्ता जातो. तिथून मग डोंगर चढून पलीकडच्या बाजूला काहीसे उतरले की, ही घळ लागते.
समर्थ वास्तव्याने पुनीत झालेल्या या सगळ्या घळी निसर्गरम्य आहेत. इथे चहूकडे सृष्टिसौंदर्य उधळलेले आहे.
ज्या ज्या ठिकाणी समर्थ गेले तिथे तिथे त्यांच्या मुखातून रामकृपेचे एवढे अनमोल साहित्य प्रसिद्ध झाले की, मग ते लवथळेश्वर मंदिरातील ‘लवथवती विक्राळा …’ ही शंकराची आरती असो वा कृष्णाकाठावरची ‘सुखसरिते गुणभरीते दुरिते निवारी…’ ही कृष्णामाईची आरती असो. पंढरीच्या विठोबाला पाहून ‘इथे का रे उभा श्रीरामा…’ हा सवाल असो वा प्रतापगडाच्या पायथ्याला पार गावात रामवरदायिनीला पाहून ‘देखिली तुळजा माता निवालो अंतर सुखे…’ अशी समर्थांची वाग्वैजयंती कायम प्रवाहित होत असे.



























































