
>> प्रतीक मोरे
गेली काही वर्षे रत्नागिरीतील लेन्स आर्ट हा ग्रुप चंपक मैदान आणि सभोवतालच्या परिसरातील जैवविविधतेचे चित्रण करत आहे. त्यांनी केलेल्या चित्रणातून या परिसराचे सौंदर्य अद्भुत दिसते. असा हा परिसर एखाद्या प्रकल्पाच्या उभारणीसाठी वापरला जाताना तिथली जैवविविधताही जपली जावी.
92 सालातली गोष्ट आहे. रत्नागिरी शहराच्या किनारी भागातली 200 हेक्टर जमीन एमआयडीसीने स्टरलाईटला कॉपर स्मेल्टिंग प्लॅन्ट उभारण्यासाठी दिली. 700 कोटींचा हा प्रकल्प वर्षात 60,000 टन तांबे तयार करणार होता. माडाच्या बनात समुद्राच्या सान्निध्यात रमणाऱया कोकणी माणसांना हा प्रकल्प फारसा काही रुचला नाही. आंबा, काजू आणि मासेमारीवर अवलंबून असणाऱया व्यापाऱयांनी याला विरोध करायला सुरुवात केली. आणि प्रस्तावित मिऱया बंदरामुळे किनाऱयाची धूप होणार हे लक्षात आल्यावर रत्नागिरीकर आंदोलनात सहभागी होऊ लागले. यावेळी मोठी अडचण अशी होती की, या प्रकल्पाने खरंच नुकसान होईल की नाही याची वैज्ञानिक माहिती आंदोलनकर्त्यांकडे उपलब्ध नव्हती. आंबा, काजूवर तापमानाचा परिणाम होणार आणि उत्पादन कमी होणार अशी अटकळ होती. प्रस्तावित मिऱया बंदरामुळे ब्रेक वॉल बांधावी लागणार आणि पाण्याचा करंट बदलून मासेमारी प्रभावित होणार असं जुन्या जाणत्या माणसांचं म्हणणं होत. स्थानिक ग्रामपंचायतीने कंपनीला काम करण्याची परवानगी नाकारली आणि संघर्षाची ठिणगी पडली. मग कोर्ट-कचेऱया चालू झाल्या मध्यंतरीच्या काळात पर्यावरणीय अहवाल ही करून घेण्यात आला. यात किनारपट्टीची होणारी धूप आणि प्रकल्पामुळे होणारे प्रदूषण आणि त्याचा इथल्या बागायतीवर होणारा दुष्परिणाम अधोरेखित करण्यात आला होता. एके दिवशी अशाच जमलेल्या जमावाने कंपनीचं काम बंद पाडलं आणि त्याचा परिणाम म्हणून तत्कालीन जिल्हाधिकाऱयांनी प्रकल्प स्थगित करत असल्याचे घोषित केले आणि कंपनीने इथून आपला गाशा गुंडाळला. अशा पद्धतीने प्रदूषणकारी प्रकल्प कोकणातून हद्दपार करण्यात लोकांना यश आले होते.
यानंतर ही जागा पडूनच होती. या जागेची भौगोलिक रचना पाहिली तर डोळ्यांसमोर येते ती कातळाचे सपाट मैदान. अधे मध्ये असलेली पाणथळ तळी आणि विस्तीर्ण गवताळ कुरणे. एका बाजूला नगर परिषदेने कचरा डंपिंग ग्राऊंड म्हणून वापर करत राहिली. बाकी सगळ्या जागा झुडपी जंगलाने आणि गवताने वेढल्या. दरवर्षीच्या पावसामध्ये इथे कातळ फुलं मोठय़ा प्रमाणावर उगवू लागली आणि तळ्यांमध्ये स्थलांतरित पक्ष्यांनी येणं सुरू केले. अशाप्रकारे एक परिपूर्ण प्रकारची इकोसिस्टीम काही वर्षांत इथे तयार झाली.
आता या सगळ्याची आठवण होण्याचे कारण म्हणजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नुकत्याच झालेल्या सिंधुदुर्ग दौऱयामध्ये त्यांनी या जागेवर मरीन पार्क किंवा मँगो पार्क उभा करण्याची केलेली घोषणा. कोकणामध्ये सध्या रोजगार निर्मितीसाठी मोठय़ा प्रमाणावर विविध प्रकल्प आणले जात आहेत. मग नानारची रिफायनरी असेल किंवा जिंदालच्या औष्णिक विद्युत प्रकल्प असेल. या प्रकल्पांना स्थानिक जनतेकडून मोठय़ा प्रमाणावर विरोध होत आहे. इथल्या लोकांचा विकासाला विरोध नसून ज्या पद्धतीने हे विनाशकारी प्रकल्प लादले जात आहेत त्याला आहे. खरंतर इथले समुद्रकिनारे बाकीची पर्यटन स्थळ यांचा विकास करून मोठय़ा प्रमाणावर रोजगारनिर्मिती होऊ शकते. त्याऐवजी या प्रकल्पांना प्राधान्य दिले जात आहे. गेली काही वर्षे रत्नागिरीतील लेन्स आर्ट हा ग्रुप चंपक मैदान आणि सभोवतालचा परिसर इथे जैवविविधतेचे चित्रण करत आहे. त्यांनी केलेल्या चित्रणातून इथली जैवविविधता आज सर्वांसमोर आली आहे. रत्नागिरीमधला कोल्हापूर हायवे जिथून सुरू होतो तिथे आपण पोचलो की, समोर येतो तो हा चंपक मैदानाचा परिसर. साध्या नजरेला ही कातळ जमीन उजाड आणि वैराण वाटते. सुकलेले गवत आटलेले पाणी आणि भाजणाऱया उन्हाच्या झळा याचं रूपांतर वाळवंटात करतात. अशाच तप्त वातावरणात वर्षा ऋतूची चाहूल लागते आणि पहिल्या सरी या कातळावर बरसतात. इथूनच सुरुवात होते एका रूपांतरणाला. सीतेची आसव, आषाढ हबेआमरी, दीपकाडी या वनस्पती प्रकट होतात. जांभळा पांढरा गुलाबी रंगाची उधळण करत कातळ पठार अचानक रंगीबेरंगी गालीच्यामध्ये रूपांतरीत होत. तुतारी सोनकी कुर्डू भारंगी तेरडा अशा एकाहून एक वनस्पती आणि त्यांची रंगीबेरंगी फुलं पाहण्यात मन हरकून जातं. कासच्या पठराशी स्पर्धा करेल एवढय़ा जाती इथे आढळतात यात शंकाच नाही. मग स्थलांतरित पक्षी जसे की लेसर व्हिस्टलिंग टील आणि पिंटेल यासारखी बदकं, चातक पावशासारखे ककु इथ दिसू लागतात. घारी गाय, बगळे, करकोचे, टीटव्या, ल्हावे वेडा राघू इथले कायमचे रहिवासी. कोतवाल मैना, पोपट, मोर, खाटीक सहज दिसतात.
श्रावणमासात तर इथली हिरवळ आणि रंगीबेरंगी फुलं यांची रंगसगती अचंबित करणारी असते. गवत वाढायला लागलं की, मग हॅरियर इगल आणि ससाणे इथे घिरटय़ा घालू लागतात. गेल्या काही वर्षांत रेड नेकड फाल्कन, शाहीन फाल्कन, पेरिग्रिन फाल्कन, अमुर फाल्कन इथे आढळून आलेत. स्नाईप पलोवरसारखे किनारी पक्षी पण आपली हजेरी लावतात. असे तब्बल 90 पेक्षा जास्त प्रकारचे पक्षी 40 एक प्रकारची कातळ फुलं कोल्ह,s साळिंदरसारखे प्राणी फुलपाखरांच्या 30 एक प्रजाती इथे आढळल्याची नोंद आहे. असा हा जैवविविधतेने नटलेला परिसर लवकरच एखाद्या प्रकल्पाच्या उभारणीसाठी वापरला जाणार आहे.
खरं तर कोकणाला विकासाची गरज आहे हेही खरं, परंतु तो विकास हा चिरस्थायी असावा असं याप्रसंगी वाटत. ही सर्व जैवविविधता नष्ट न करता काही मार्ग काढता येईल का याची चाचपणी होण गरजेचं आहे. सद्यस्थितीत सरकारने इथल्या जैवविविधतेच मापन करावं आणि नंतर इथला प्लॅन ठरवावा अशी मागणी जोर धरू लागली आहे. कासच्या धर्तीवर जर इको पर्यटन करणं शक्य असेल तर तो मार्ग ही अवलंबला जावा. एमआयडीसीने यातील काही भाग जो इको सेन्सिटिव्ह आहे तो संरक्षित करावा आणि कोकणचा अनमोल ठेवा जपावा अशीदेखील अपेक्षा आहे.
(लेखक निसर्ग अभ्यासक आहेत)





























































