प्रॉमिसिंग – योग्य संधी महत्त्वाची

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> गणेश आचवल

सध्या कलर्स मराठीवर ‘रमा राघव’ ही मालिका खूप लोकप्रिय होत आहे. या मालिकेत राघवची भूमिका करणारा अभिनेता म्हणजे निखिल दामले… एक प्रॉमिसिंग चेहरा.

निखिलचे शालेय शिक्षण पुण्यामध्ये झाले, तर महाविद्यालयीन शिक्षण गरवारे कॉलेजमधून झाले. मास मीडियामध्ये त्यांनी पदवी मिळवली आणि सध्या तो वेलींकर इन्स्टिटय़ूटमधून मास्टर्स करत आहे. अभिनेते प्रशांत दामले यांच्या ट्रेनिंग इन्स्टिटय़ूटमधून निखिलने अभिनयाचे प्रशिक्षण घेतले आहे. ‘अशा या दोघी’ या नाटकात तसेच विवेक बेळे लिखित ‘सोळा एके सोळा’ या नाटकातदेखील त्याची चांगली भूमिका होती. याच नाटकानंतर त्याच्या आयुष्यात एक वेगळं वळण आलं. मुंबईत ‘सोळा एके सोळा’ या नाटकाचा प्रयोग सादर झाल्यानंतर निखिलला एका ठिकाणी ऑडिशनसाठी बोलावलं होतं. त्याने ऑडिशन दिली आणि काही कालावधीतच त्याला कळलं की, तो प्रमुख भूमिकेसाठी निवडला गेला आहे. ती मालिका होती सोनी मराठीवरील ‘हृदयात वाजे समथिंग.’

आपल्या स्ट्रगलविषयी बोलताना निखिल म्हणाला, या क्षेत्रात स्ट्रगल हे सतत चालूच असतं. भूमिका मिळवण्यासाठी तुमच्याकडे टॅलेंट हवे हे सत्य आहेच, पण त्याचबरोबर योग्य वेळी योग्य ठिकाणी त्या कलाकाराचं उपस्थित राहणं हेदेखील गरजेचं असतं. याचा अर्थ असा की, सध्या अनेक चॅनल्स आहेत, अनेक वेब सीरिज आहेत, अनेक मालिका आहेत, पण त्या सर्व प्रोजेक्टच्या ऑडिशन्स नेमक्या कधी, कुठे होत आहेत, हे समजून घेऊन ऑडिशन देत राहणं, ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. योग्य वेळी योग्य संधी मिळणं हे कलाकाराच्या दृष्टीनं खूप महत्त्वाचं असतं.

झी युवावरील ‘ऑल मोस्ट सुफळ संपूर्ण’ या मालिकेत त्याच्या भूमिका होत्या. काही जाहिरातींमध्येसुद्धा निखिलने काम केले आहे. स्टार प्लसवरील ‘विद्रोही’मध्ये त्याची भूमिका होती. त्याच्या आयुष्यातील टर्निंग पॉइंट म्हटला जाईल अशी भूमिका म्हणजे ‘रमा राघव’मधील राघवची भूमिका. निखिल म्हणतो, ‘‘मी साकारत असलेला राघव पुरोहित हा पौरोहित्य करणारा मुलगा आहे. सर्वांशी मिळून मिसळून राहणारा तसेच शांत स्वभावाचा असा हा राघव आहे. त्याला सहसा राग येत नाही. देवाधर्माचे करायला त्याला खूप आवडते. रमा ही मोठय़ा घरातील मुलगी आहे. ती आजच्या काळातली आधुनिक विचारांची मुलगी आहे. तसेच चिडचिड करणारी आहे. राघव आणि रमा या दोन भिन्न स्वभावाच्या व्यक्तिरेखा आहेत आणि त्यांच्यातील प्रेम कहाणी या मालिकेतून तुम्हाला बघायला मिळते आहे. मी साकारत असलेल्या या भूमिकेचे कौतुक होत आहे ही आनंदाची गोष्ट आहे.’’