वैज्ञानिक गुरू, संशोधन गुरू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> शैलेश माळोदे

अणुशास्त्रज्ञ डॉ. आर. चिदंबरम. अणुऊर्जेतील विविध शोध आणि त्यांचा समाजासाठी उपयोग हेच यांच्या कार्याचे गमक….

बईचा सुप्रसिद्ध लॅण्डमार्क म्हणजे गेटवे ऑफ इंडिया. तिथल्या अणुशक्ती भवन या हिंदुस्थानच्या अणुऊर्जा विभागाच्या मुख्यालयातून अणुऊर्जा आयोगाच्या प्रशस्त दालनातून अरबी सागर आणि गेटवे ऑफ इंडियाचं अगदी मनोहारी दर्शन होतं. या दालनात दिलखुलास हास्य असलेल्या अणुऊर्जा शास्त्रज्ञाशी संवाद साधण्याची संधी प्राप्त झाली. हे शास्त्रज्ञ म्हणजे दस्तुरखुद्द डॉ. आर. चिदंबरम. अणुऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष आणि हिंदुस्थानचे माजी प्रमुख वैज्ञानिक सल्लागार.

हिंदुस्थानच्या अण्वस्त्र कार्यक्रमात महत्त्वाची भूमिका असलेल्या डॉ. राजगोपाला चिदंबरम यांनी 1974च्या आणि 1998च्या अशा दोन्ही अणुचाचणीत महत्त्वाची भूमिका बजावलीय. हिंदुस्थानी भौतिकशास्त्रज्ञ म्हणून डॉ. आर. चिदंबरम यांचं संशोधन क्रिस्टलोग्राफी क्षेत्रात आहे. हिंदुस्थानला राष्ट्रीय सुरक्षा आणि ऊर्जा सुरक्षा पुरविण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱया डॉ. चिदंबरम यांनी भाभा अणुसंशोधन केंद्राचे संचालक म्हणूनही कार्य केलेलं आहे.
आपल्या शैक्षणिक पायाविषयी बोलताना डॉ. चिदंबरम म्हणाले, ‘‘माझं सुरुवातीचं शिक्षण मीरत (यूपी) आणि चेन्नईत झालं. पदार्थ विज्ञानात 1956 साली मी बी. एस्सी पदवी संपादन करताना विद्यापीठात (चेन्नई)द्वितीय क्रमांक प्राप्त केला. 1958 मध्ये एम.एस्सी पदवी त्याच विषयात प्राप्त केली. त्याचवेळी मी प्राथमिक भौतिकशास्त्र अभ्यासक्रम शिकवीत होतो. त्याचप्रमाणे मी ऍनालॉग कॉम्प्युटरर्सविषयी मूलभूत प्रबंध लिहिला. त्यानंतर मी इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्समध्ये पीएचडीसाठी प्रवेश घेऊन 1962 साली डॉक्टरेट मिळविली. माझं संशोधन आण्विक चुंबकीय रेझोनन्सविषयी होतं. त्या विषयीच्या माझ्या पीएचडी प्रबंधाला मार्टिन फॉस्टर मेडल प्राप्त झालं. त्यानंतर माझा आण्विक भौतिकशास्त्रातील रस घटला आणि मी क्रिस्टलोग्राफी आणि कन्डेन्स्ड मॅटर फिजिक्समध्ये संशोधन करू लागलो.’’ त्यांनी प्रकाशित केलेल्या अनेक शोधनिबंधांनी आधुनिक मटेरियल सायन्सची पायाभरणी केली. डॉ. चिदंबरम पुढे म्हणाले, ‘‘1974च्या पोखरण अणुचाचण्यानंतर मी उच्च दाब भौतिकशास्त्रात संशोधन सुरू केलं. त्यासाठी आवश्यक उपकरणं स्वतः तयार केली.’’ त्यांनी पदार्थांबाबतच्या संशोधनाविषयी सैद्धांतिक मांडणी करण्याचं महत्त्वपूर्ण कार्य पार पाडलं. त्यांच्या शोधनिबंधांचं ‘सायटेशन’ बऱयाच जणांनी केलंय. त्यांचं वर्णन हिंदुस्थानचा एक द्रष्टा वैज्ञानिक असं केलं जातं. ते एक उत्तम वक्तेदेखील आहेत.

पुढे ते विविध गुप्त प्रकल्पांमध्ये एक प्रमुख अणुशास्त्रीय म्हणून सहभागी होते. 1967 साली त्यांनी त्यांच्या सहयोगी शास्त्रज्ञांसोबत अण्वस्त्रांच्या निर्मितीसाठी धातूशास्त्र आणि भौतिकशास्त्रविषयक कार्याचं नियोजन केलं. डीआरडीओ आणि बीएआरसीमधील घनिष्ट परस्पर सहकार्यात ते अग्रणी होते. त्यांचे माजी राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम यांच्याशी खूपच घनिष्ट संबंध होते. 1990 साली ते बीएआरसीचे संचालक बनले आणि 1994 साली अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष झाले. त्यांनी त्यांच्या अध्यक्षपदाच्या कारकीर्दीत (2000 सालापर्यंत) अणुऊर्जा वीज निर्मितीस प्राधान्य दिलं. मार्च 2018 मध्ये कृष्णस्वामी विजयराघवन भारत सरकारने प्रमुख वैज्ञानिक सल्लागार होईपर्यंत डॉ. चिदंबरम त्या पदावर कार्यरत होते. तसेच ते केंद्र सरकारच्या वैज्ञानिक सल्लागार मंडळाचे अध्यक्षदेखील होते. त्यांनी प्रमुख सल्लागारपदाच्या कारकीर्दीत त्यांनी अनेक नवे उपक्रम सुरू करण्यात पुढाकार घेतला. त्यात वाहन क्षेत्रासाठी संशोधन सल्लागार परिषदेचं गठन करून शैक्षणिक संस्था आणि उद्योगांत परस्पर सहकार्य वाढवणं, ग्रामीण भागासाठी सटॅग्जची स्थापना करून ग्रामीण क्षेत्राला उपयुक्त तंत्रज्ञान गरजेनुसार विकसीत करून पोहचविणे यासारख्या गोष्टींचा समावेश होता. त्यांच्या कारकीर्दीच्या शेवटच्या काही वर्षांमध्ये त्यांनी नॅशनल इन्फॉर्मेटिक्स सेंटरच्या सहयोगाने देशातील 1500 शैक्षणिक संस्था आणि संशोधन उपक्रमांना जोडून ‘राष्ट्रीय ज्ञान नेटवर्क’ स्थापन करण्याचं काम केलं.

हिंदुस्थानच्या राष्ट्रीय अभियांत्रिकी अकादमी आणि इतर अनेक प्रोफेशनल सोसायटींनी त्यांना विविध पुरस्कार आणि जीवनगौरव पारितोषिक देऊन सन्मानीत केलंय. परंतु संशोधनकार्य ही त्यांची खास आवड होती. त्याकरिता योग्य धोरणं ठरविणं हे श्रेष्ठ शास्त्रज्ञांचं मूळ काम असून नवीन पिढीला हे काम पुढे नेण्यासाठी मार्गदर्शन करणं ही त्यांची जबाबदारी आहे. असं ते महनतात. ते यासंदर्भात म्हणाले, ‘‘स्वतःहून प्रेरित होत मूलभूत संशोधन करणं आवश्यक आहे. केवळ ठरलेलं भौतिक संशोधन पुरेसं नाही. दोन्ही परस्परपूरक असल्यामुळे हातात हात घालूनच पुढे जायला हवं. या क्षेत्रातील संधी मंदी आली तरी कमी होत नाहीत. हे वास्तव असून नोंदलेला इतिहासदेखील आहे.’’

[email protected]