
>> चंद्रसेन टिळेकर
विश्वातले एकजात आस्तिक-नास्तिक एकमेकांशी भांडत असतात ते एका गोष्टीवरून आणि ती म्हणजे या जगात देव आहे की नाही ! आस्तिकांच्या मते जगात देव आहे, किंबहुना हे विश्वही त्यानेच निर्माण केले आहे आणि त्याच्या इच्छेशिवाय झाडाचे पानही हलत नाही. याउलट नास्तिक छातीठोकपणे सांगताना दिसतात की, या विश्वात देव, ईश्वर, परमेश्वर, अल्ला या नावाची कुठलीच अलौकिक शक्ती नाही. त्यांच्या मते हे विश्व एका महास्फोटातून नैसर्गिकरीत्या निर्माण झालेले आहे. ज्याचे वैज्ञानिकांनी Big Bang theory असे नामकरण केलेले आहे.
आस्तिक व नास्तिक या दोन्ही गटांमध्ये एक मध्यममार्गी गट आहे, तो ‘देव असेलही आणि नसेलही’ अशी ‘नरो वा कुंजरो’ भूमिका घेतो. या कुंपणावर बसलेल्या मंडळींना ‘अज्ञेयवादी’ असे म्हणतात. सर्वसामान्यांना दुखवायचे नसेल तर सामाजिक बांधीलकी जपणारी अगदी बुद्धिवादी मंडळीही अज्ञेयवादी भूमिका घेताना दिसतात. कारण या अज्ञेयवादी भूमिकेचेही एक मोल असे आहेच. आपला देश पट्टीचा दैववादी आहे आणि हा दैववाद विकासाच्या आड येणारा मोठा अडसर आहे हेही तितकेच स्वच्छ आहे. देशाच्या विकासासाठी हा दैववाद संपवता आला नाही तरी निदान तो आटोक्यात रहावा यासाठी प्रयत्न करणाऱया समाजसेवकांना सर्वसामान्यांमध्ये जाऊन त्यांचे मन वळवावे लागेल आणि त्यांच्या कलाकलानेच घ्यावे लागेल.
बहुतांशी आपला हा समाज अंधश्रद्ध असल्यामुळे त्याच्या श्रद्धा एकदम दुखावूनही चालणार नाही. त्यामुळेच समाजातील अंधश्रद्धा जाव्यात म्हणून ‘परमेश्वराला रिटायर करा’ अशी बेधडक भूमिका डॉ.श्रीराम लागू यांनी घेतली, पण अंधश्रद्धेविरुद्ध समर्थ अशी चळवळ उभी करणाऱया डॉ.नरेंद्र दाभोलकरांना मात्र देवाच्या अस्तित्वाबद्दल वर उल्लेख केलेली ‘नरो वा कुंजरो’ अशी अज्ञेयवादी सावध भूमिका घ्यावी लागली. मुळावर घाव घालणे हा उपाय सरसकट सर्वच ठिकाणी उपयोगाचा नाही हे डॉ.नरेंद्र दाभोलकरांनी जाणले होते.
या ठिकाणी असा प्रश्न उभा राहतो की, ज्या ‘देव’ या संकल्पनेमुळे म्हणा किंवा वास्तवामुळे म्हणा, हा दैववाद फोफावला, त्या देवाबद्दल सातशे वर्षे भक्तीची परंपरा जपणाऱया आमच्या संतांची काय भूमिका होती? संतांनी निर्माण केलेले प्रासादिक साहित्य वाचले की, संतांनी भक्तिमार्गाचा महिमा मुक्तहस्ते आणि मुक्तकंठे गायला आहे हे मान्यच करावे लागते. भक्तीची ही पाठराखण अर्थातच त्यांनी देव मानला म्हणूनच केली हे उघड आहे. मग काही मंडळी आपल्याला प्रश्न विचारतात की, संतांनी जर देव मानला आहे तर आपल्याला आस्तिक असायला काय हरकत आहे? आपण भाविक, धार्मिक असायला कोणाची आडकाठी आहे? जे नास्तिक आहेत ते काय या संतांपेक्षा अधिक ज्ञानी, अधिक प्रज्ञावान आहेत काय? हा तर भावनेला हात घालणारा प्रश्न आहे. व्यक्ती कितीही थोर असो, संत असो अथवा महापुरुष असो, त्यांना म्हणजेच त्यांच्या ज्ञानाला, शिकवणुकीला काळाची मर्यादा असते. म्हणजे त्यांच्या काळी त्यांना जे उपलब्ध ज्ञान असेल, साधने असतील, त्यांच्यावर विसंबूनच त्यांनी आपले विचार मांडलेले असतात. अशा महान व्यक्तींचे विचार काळाच्या कसोटीवर टिकतीलच असे नाही. म्हणजेच त्यांनी सांगितलेले सत्य त्रिकालाबाधित असू शकत नाही आणि याला आपले संतही अपवाद नाहीत. तेव्हा कालबाह्य झालेल्या विचारांना आपल्याला तिलांजली द्यावी लागेल. मग ते कितीही महनीय, पूजनीय व्यक्तींनी उपदेशिलेले असोत. त्या जागी अद्ययावत असे ज्ञान प्रस्थापित करावे लागेल. असे केल्याने संतांचा किंवा दुसऱया कुठल्याही महापुरुषांचा अवमान आपण मुळीच करत नाही याची खात्री बाळगली पाहिजे. अर्थात संतांच्या मांदियाळीत संत तुकाराम आपल्या विवेकी साहित्यकृतीतून उठून दिसतात हेही इथे मान्य करावे लागेल. त्यांचे देवाबद्दलचे अभंग तर कुणी नास्तिकाने तर लिहिले नाहीत ना, अशी शंका येते. एका अभंगात तुकोबा म्हणतात, ‘करिता देवार्चन । घरा आले संतजन। देव सारावे परते । संत पुजावे आरते ।’ दुसऱया एका अभंगात, ‘देही असोनिया देव, वृथा फिरतो निर्देव’ असे खडसावतात. एके ठिकाणी तर तुकोबा थेटपणे सांगतात की, ‘देव आहे ऐसा वदवावा वाणी। नाही ऐसा मनी अनुभवावा।’ इथे तर तुकोबा सरळ सरळ डॉ. लागूंप्रमाणे देवाला रिटायरच करून टाकतात.
मात्र तुकोबांचा हा देवभक्तीचा जल्लोष करणाऱया भक्तांना रुचत नाही. त्यांना कर्मकांडे करायला लावणाऱया, मुक्या प्राण्यांचा बळी मागणारा असा देव आवडतो. आमचा देव नवसाला पावतो ही आश्वासने अनेक सार्वजनिक गणेशोत्सव देतात आणि त्यावर विसंबून आबालवृद्धांची अशा गणेशापुढे झुंबड उडते हे कशाचे लक्षण आहे?
आज आपल्या सुधारक अशा महाराष्ट्रातही जो धार्मिक उन्माद दिसतो आणि परिणामी विकासाची जी गती मंदावली आहे त्याचा दोष काही विचारवंत संतांना देताना दिसतात. प्रसिद्ध इतिहासकार वि.का.राजवाडे ‘संतांनी महाराष्ट्राला टाळ कुटायला शिकवलं’ असा दोष त्यांना देतात तर आणखी एक संत अभ्यासक श्री. शंकरराव सावंत आपल्या ग्रंथात संतांना दोष देताना म्हणतात, “अवतीभवती मोगलांनी एवढा अत्याचार चालवला होता, पण संतांनी एक ओळही त्याबद्दल आपल्या साहित्यात लिहिली नाही की कसली जागृती केली नाही. केवळ गाढ भक्तीत समाजाला गुंगवून ठेवले.’’ विचारवंतांनी संतांबद्दल जी नाराजी व्यक्त केली आहे, तिचा आदर करूनही एक सत्य माझ्यासारख्याला सांगावेसे वाटते ते म्हणजे पाचएक शतकांपूर्वी कसलीही आजच्यासारखी करमणुकीची साधने उपलब्ध नव्हती. तेव्हा शेती किंवा आपले दिवसाचे काम उरकल्यावर समाज चैनबाजीकडे, विशेषतः व्यसनाकडे वळण्याचा धोका होता. त्यापासून दूर करण्यासाठी संतांना समाजाला भक्तीकडे वळवणे भाग पडले असे आपण का समजू नये?
(लेखक वैज्ञानिक व वैचारिक विषयाचे अभ्यासक असून विवेकवादी चळवळीशी निगडित आहेत.)