
>> प्रसाद ताम्हणकर
इंटरनेटवरील जगातले सगळ्यात मोठे आणि मुक्त व्यासपीठ म्हणून ओळखले जाणारे फेसबुक बघता बघता वीस वर्षांचे झाले आहे. एखाद्या जादुई दुनियेची सफर असावी असा हा काळ होता. मार्क झुकरबर्गने काही मोजक्या मित्रांच्या मदतीने लोकांना सहजपणे एकमेकांच्या संपर्कात राहता यावे यासाठी तयार केलेल्या या व्यासपीठाला आज 2 अरबपेक्षा जास्त युजर्स वापरत आहेत. इंटरनेटची व्याख्या बदलण्याबरोबरच फेसबुकने लोकांच्या आयुष्यातदेखील अनेक बदल घडवून आणले, त्यांच्या सवयी बदलल्या, इंटरनेटच्या वापराला एक वेगळे वळण दिले. एका बाजूला प्रचंड लोकप्रियता आणि दुसऱ्या बाजूला लोकांना व्यसनी बनवणारे, विनाशकारी अशी संभावना, अशा विचित्र पातून सध्या फेसबुकचा प्रवास सुरू आहे.
फेसबुक लोकांच्या खासगी आयुष्यात दखल देते असा कायम आरोप होत असतो. युजर्सच्या वैयक्तिक माहितीचा गैरवापर केल्याबद्दल, ही माहिती योग्य प्रकारे न हाताळल्याबद्दल फेसबुकला अनेक देशांत खटल्यांना आणि आर्थिक दंडालादेखील सामोरे जावे लागले आहे. 2014 च्या ‘केंब्रिज आनालिटिका’ प्रकरणात फेसबुकला 72 करोड
डॉलर्सचा दंड भरावा लागला होता, पण वैयक्तिक माहिती अथवा डाटा हा किती मौल्यवान असतो हेदेखील फेसबुकनेच जगाला दाखवून दिले आहे. आज फेसबुकचीच एक शाखा असलेली मेटा कंपनी आणि गुगल या जाहिरातीच्या जगाच्या राजा बनल्या आहेत. जगभरात जाहिरातींवर जितका खर्च केला जातो, त्यातील सर्वाधिक वाटा या दोन कंपन्या मिळवतात.
फेसबुकने जागतिक राजकारणालादेखील वेगळे वळण दिल्याचे इंटरनेट क्षेत्रातील तज्ञ सांगतात. टार्गेट ऑडियन्स आणि टार्गेट आडव्हर्टाइजच्या सुविधेमुळे फेसबुक हे जगभरातील निवडणुकांमध्ये प्रचाराचे प्रमुख व्यासपीठ बनले आहे. याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे अमेरिकेतील निवडणुका होय.
स्टॅटिस्टा रिसर्च या संस्थेच्या आकडेवारीनुसार 2020 मध्ये अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीला 5 महिने शिल्लक असताना डोनाल्ड ट्रम्प यांच्या निवडणूक टीमने फेसबुकवर जाहिराती करण्यासाठी 4 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त खर्च केला होता. अरब स्प्रिंगच्या वेळीदेखील फेसबुकच्या माध्यमातून मोठय़ा प्रमाणावर निदर्शने आयोजित करण्यात आली. महत्त्वाच्या घडामोडी लोकांपर्यंत पोहोचवणेदेखील सुकर झाले.
एका बाजूला हे सगळे होत असताना दुसरीकडे फेसबुकचा वापर हिंसा पसरवण्यासाठी, द्वेष पसरवण्यासाठी, दंगली घडवण्यासाठी, खोटय़ा बातम्या लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी होत असल्याचेदेखील सातत्याने समोर येत असते. 2018 मध्ये म्यानमारमधील रोहिंग्याविरुद्ध फेसबुकच्या माध्यमातून पद्धतशीरपणे हिंसा पसरवण्यात आली आणि अशा हिंसा पसरवणाऱ्या लोकांना फेसबुकचा वापर करण्यापासून रोखण्यात फेसबुक अपयशी ठरले असा अहवाल संयुक्त राष्ट्रांतर्फे देण्यात आला होता. तो फेसबुकने मान्यदेखील केला होता. फेसबुकच्या माध्यमातून मानवी हक्कांची पायमल्ली होत असल्याची टीकादेखील अनेकदा होताना दिसते.
दोन अरब लोकांशी जोडल्या गेलेल्या फेसबुकने या वीस वर्षांत मोठी झेप घेतली आहे. इन्स्टाग्राम, अॅक्युलस, व्हॉट्सअॅप अशा कंपन्यांना खरेदी करत स्वतचे एक सोशल मीडियाचे प्रचंड मोठे साम्राज्य उभे करण्यात फेसबुकला यश मिळाले आहे. 2022 मध्ये मग फेसबुकने आपले नाव बदलत ‘मेटा’ असे नवे नाव धारण केले. सध्या फेसबुकला कोणी मोठा स्पर्धक दिसत नसला तरी भविष्यातील वाटचाल खडतर असणार आहे हे नक्की. सध्या मोठय़ा प्रमाणावर लोक फेसबुकचा वापर थांबवत आहेत, अथवा इतर व्यासपीठांकडे वळत आहेत असे चित्र आहे. फेसबुकनेदेखील याची गांभीर्याने दखल घेतली आहे आणि युजर्सना अधिक सेवासवलती कशा देता येतील याचा विचार सुरू केला आहे.
मेटावर्स या आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या भव्य स्वप्नाला साकार करण्यासाठी सध्या फेसबुक धडपडत आहे. यासाठी त्यांची मुख्य स्पर्धा ही अॅपलसारख्या तगडय़ा कंपनीशी असणार आहे. येणाऱ्या काळात आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा जगाचे चित्र बदलण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडणार आहे हे नक्की. यादृष्टीने भविष्याचा वेध घेत फेसबुकने आताच यावर काम सुरू केले आहे. कौतुक आणि टीका अशा दुहेरी दोरीवरून चालताना फेसबुक भविष्यात काय वाटचाल करेल, हे बघणे मनोरंजक असणार आहे हे नक्की!




























































