आभाळमाया – कापूस-ग्रह?

381

>> वैश्विक / [email protected]

पंचवीस वर्षांहून अधिक काळ ‘हबल स्पेस टेलिस्कोप’ अवकाशात भिरभिरत आहे. पृथ्वीच्या वातावरणाचा आडपडदा नसलेल्या जवळजवळ निर्वात पोकळीत ही अंतराळ दुर्बीण कार्यरत असल्याने विश्वाचा वेध घेताना अनेक गोष्टींचा शोध त्यातून लागला आहे. मुख्य म्हणजे या दुर्बिणीच्या शक्तिशाली कॅमेऱयांनी माणसाच्या अंतराळी डोळय़ासारखी अद्वितीय कामगिरी बजावली असून अगदी ‘जे न देखे रवी’ इतक्या दूरच्या अंतरावरच्या ग्रह-ताऱयांचे आणि विविध दीर्घिकांचे, तेजोमेघांचे हजारो फोटो आतापर्यंत आपल्याकडे पाठवले आहेत.

एडविन हबल या शास्त्र्ाज्ञाच्या नावाने अवकाशात गेलेली ही दुर्बीण अनेक दुरुस्त्या पचवून नित्यनवं विश्वरूप दर्शन घडवत आहे. त्यामुळे व्यावसायिक आणि हौशी खगोल अभ्यासकांचीही मोठीच सोय झाली आहे. हा अवकाशी फोटोंचा अमूल्य खजिना नेटवर उपलब्ध असतो.

विराट विश्वाचा व्याप, त्याची मोजदाद, त्याचा नकाशा आणि दूरस्थ ग्रहताऱयांचं निरीक्षण करताना ‘हबल’ला अनेक विस्मयकारी गोष्टी दिसल्या. त्या त्याने टिपल्या आणि आपल्यापर्यंत पाठवल्या. त्यापैकीच एक आहे ‘कापसासारखा’ ग्रह! असा हा एकच ग्रह नसून असे कापसाच्या गोळय़ासारखे अनेक ग्रह अवकाशात आढळल्याने ग्रहांच्या प्रकारामध्ये नवी भर पडली आहे.

आपल्या ग्रहमालेतल्या विविध प्रकारच्या ग्रहांवरून आपल्याला एखाद्या ताऱयाभोवतीच्या ग्रहरचनेची कल्पना येईल. सूर्यापासून सर्वात जवळचा बुध घट्ट आणि तप्त आहे. शुक्र ग्रहावर कार्बन व सल्फरचं आवरण असल्याने सूर्याचा प्रकाश जास्त परावर्तित होऊन तो तेजस्वी दिसतो. पृथ्वी हा आपला ‘ब्लू प्लॅनेट’ म्हणजे पाण्याचा प्रचंड साठा असलेला ग्रहमालेतील एकमेव ‘पाणीदार’ ग्रह. मंगळ लोहयुक्त लाल आणि कोरडा. गुरू गाभ्याशी घट्ट, पण परिघावर वायुरूप. शनी कडी असलेला वगैरे.

अब्जावधी ताऱयांच्या विश्वात सूर्य नावाच्या एका साधारण ताऱयाभोवतीची ही विविधरूपी ग्रहांची आरास तर विश्वात अन्यत्र असलेल्या ताऱयांभोवतीचे ग्रह कसे असतील? या आणि अशाच प्रश्नांची उत्तरं हबल दुर्बीण शोधत असते. या दुर्बिणीने आजवर जे जे पाहिलं ते ते सारं पृथ्वीवर पृथक्करणासाठी पाठवलं. त्यातूनच अनेक दीर्घिका (गॅलॅक्सी), तेजोमेघ (नेब्युले) आणि इतर ताऱयांभोवतीच्या अनेक ग्रहांचं अंतरंग उलगडलं.

‘हबल’ने अलीकडेच जो नवा ‘डेटा’ पाठवला त्याचं विश्लेषण करताना ‘नासा’च्या वैज्ञानिकांना ग्रहांचा नवा ‘वर्ग’ (क्लास) सापडला. तेच कापूस ग्रह (कॉटन कॅन्डी). अशी ही कापूसकोंडय़ाची नव्हे, तर ‘कापूस कॅन्डी’ची गोष्ट! हे ग्रह कापसाच्या गोळय़ासारखे किंवा फुगीर का दिसतात याचं कारण म्हणजे त्यांच्यावरचं हायड्रोजन – हिलियमचं वातावरण फुगवटा निर्माण करतं. त्यामुळे त्यांचा आकार बाहेरून आपल्या गुरू ग्रहापेक्षा मोठा दिसत असला तरी त्यांचं वस्तुमान गुरूच्या 100 पट कमी भरतं. म्हणूनच शास्त्र्ाज्ञ या ग्रहांना कापूस ग्रह म्हणतात.

दगडमातीचे पृथ्वीसारखे घट्ट, गुरूसारखे वायुरूप आणि युरेनस – नेपच्यूनसारख्या बर्फाळ ग्रहांनंतर कापसाच्या गोळय़ासारख्या ग्रहांचा चौथा प्रकार आता ज्ञात झाला आहे. आपल्या सूर्यमालेपासून 2600 प्रकाशवर्षे दूर असलेल्या एका ताऱयाभोवती असे तीन कापूस ग्रह आढळले असून त्यांच्या वातावरणाची रासायनिक जडणघडण कशी आहे त्याची चिकित्सा सुरू आहे.

या प्रकारच्या ग्रहांचा सुगावा केप्लर दुर्बिणीलाही 2012 मध्ये लागला होता. त्यावर सातत्याने संशोधन होऊन आता त्यांच्या अस्तित्वाचा आणि स्वरूपाचा पुरावा गवसला. आपल्या शुक्राप्रमाणेच या ग्रहांचा बाह्य भाग दाट ढगांनी वेढलेला आढळला. या ग्रहांचा अभ्यास चालला होता तेथे जलकण आढळतात का ते शोधण्याचा, परंतु त्यातून वेगळंच सत्य समोर आलं. हे ढग मिथेन वायूचे असू शकतात.

विश्वाच्या अनंत रूपात किती आश्चर्यकारक गोष्टी दडल्या आहेत याचा यावरून अंदाज येतो. आपण पृथ्वी नावाच्या छोटय़ाशा ग्रहावर राहून अब्जावधी किलोमीटर दूर असलेल्या विश्वातील इतर गोष्टींचा वेध घेऊ शकतो, अभ्यास करू शकतो हीच केवढी महत्त्वाची गोष्ट! ‘हबल’कडून येणाऱया प्रत्येक फोटोची सखोल चिकित्सा संशोधकांना करावी लागते. तेव्हाच एखाद्या वैश्विक गोष्टीबद्दलचा निष्कर्ष जाहीर केला जातो. विश्व तर विराट आहेच, पण माणसाच्या मेंदूची आकलनशक्ती त्यालाही गवसणी घालतेय ही माणसासाठी अभिमानाची जाणीव आहे.

आपली प्रतिक्रिया द्या