लेख : ठसा : प्रा. अविनाश डोळस

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> पंजाबराव मोरे

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या संभाजीनगरच्या नागसेनवनातील मिलिंद महाविद्यालयाच्या भट्टीत तावून-सुलाखून निघालेल्या अनेकांनी बाबासाहेबांच्या विचारांची पताका अटकेपार नेली. याच आंबेडकरी चळवळीच्या संस्कार केंद्रातून अनेक प्रतिभासंपन्न विद्यार्थ्यांची फौज निर्माण झाली. त्यात प्रा. अविनाश डोळस यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे खंदे अनुयायी असलेल्या दादासाहेब गायकवाड यांच्या नाशिकमधील आंबेदिंडोरी या लहानशा खेडय़ातून नागसेनवन या आंबेडकरी चळवळीच्या क्रांतिभूमीत आलेले प्रा. अविनाश डोळस लोकाभिमुख राहिले. मराठवाडा विद्यापीठातून एम. ए.ची पदवी मिळवतानाच त्यांनी नागसेनवनात राज्याच्या विविध प्रांतांतून येणाऱ्या गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी स्वतःला वाहून घेतले. पेशाने प्राध्यापक असलेल्या डोळस यांनी गरीब विद्यार्थ्यांच्या समस्यांकडे नेहमीच आस्थेने पाहिले. एवढेच नव्हे तर त्यांनी शिष्यवृत्ती, नामांतर लढय़ात इतर नेत्यांसेबत मोलाची भूमिकाही बजावली. सदैव हसतमुख आणि सर्वांशी मैत्रीपूर्ण संबंध असलेल्या डोळसांनी नामांतराच्या लढय़ात जात-पात-धर्म-पंथ, प्रांत आणि लिंग या भेदभावाच्या पलीकडे जाउन सर्वधर्मीयांची मोट बांधण्यात मोलाची भूमिका बजावली होती.

गावकुसातून आलेल्या विद्यार्थ्यांच्या गराडय़ात कायम राहणारे प्रा. डोळस विद्यार्थीप्रिय होते. विद्यार्थ्यांच्या व्यथा आणि अडचणी जाणून घेताना ते भावनाविवश होत असत. गावातील पाण्यासाठी होणारी बहुजनांची ससेहोलपट त्यांच्या नजरेतून सुटली नाही. यावर उपाय म्हणून ‘एक गाव एक पाणवठा’ यासारख्या सामाजिक उपक्रमात त्यांनी स्वतःला झोकून दिले. त्यांच्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाला युवक क्रांती दलाच्या माध्यमातून एक वेगळा पैलू प्राप्त झाला. बाबासाहेबांनी सांगितलेल्या सामाजिक परिवर्तनाच्या वाटेवर दीनदुबळ्यांसाठी आयुष्य वेचणाऱ्या डॉ. बाबा आढाव यांच्या विचारांनी प्रेरित होउन त्यांनी जाती-जातीत सलोखा निर्माण व्हावा आणि त्याची सुरुवात आपल्यापासून व्हावी या उद्देशाने त्यांनी आंतरजातीय विवाह केला. वैचारिक साहित्याच्या प्रांतातही प्रा. डोळस यांनी आपला वेगळा ठसा उमटवला. महासंगर, मराठी दलित कविता, आंबेडकर विचार आणि साहित्य, आंबेडकर चळवळ : परिवर्तनाचे संदर्भ, सम्यक दृष्टीतून या साहित्यकृतींमधून त्यांनी आपल्या विचारांची प्रगल्भता दाखवून दिली. क्रांतिभूमी नागसेनवनात घडणाऱ्या सामाजिक आणि सांस्कृतिक परिवर्तनाचे ते प्रमुख साक्षीदार आणि खंदे समर्थक म्हणून ठामपणे उभे राहिले. या परिसरात जन्मास आलेल्या दलित रंगभूमीला बाळसे देण्यात त्यांचा मोलाचा वाटा राहिला आहे. प्रकाश त्रिभुवन यांच्या परिवर्तनावर भाष्य करणाऱ्या ‘थांबा रामराज्य येतेय’ या नाटकाचे दिग्दर्शन करून डोळस यांनी आपल्या सामाजिक जाणिवेविषयीच्या डोळसपणाची जणू साक्षच दिली. समाज परिवर्तनाची नांदी ठरणारे हे नाटक प्रचंड गाजले. यातून त्यांच्यातील दिग्दर्शकही लोकांसमोर आला. डॉ. बाबासाहेबांच्या अप्रकाशित ग्रंथसंपदेच्या प्रकाशनासाठी त्यांनी अपार परिश्रम घेतले. डोळस यांनी बाबासाहेबांचे नातू ऍड. प्रकाश आंबेडकर यांच्या भारिप-बहुजन महासंघाशी स्वतःला बांधून घेतले. त्यांच्या सर्वात विश्वासू सहकाऱ्यांपैकी एक होते. प्रा. डोळस यांचा राजकारण, समाजकारण, साहित्य, धम्म चळवळ, सांस्कृतिक चळवळ आणि आंबेडकरी चळवळीत समांतर वावर होता. त्यांच्या जाण्याने या चळवळींचा एक महत्त्वाचा धागा तुटला असे म्हटल्यास वावगे ठरू नये.